६ सप्टें, २०१२

कुरुंदकरांचा अकबर

त्यांच्या चश्म्यातून 
माझ्या लहानपणी मिस्टर इंडिया नावाचा एक सिनेमा आला होता. हातात वैज्ञानिक जादूचे घड्याळ बांधून अनिल कपूर अद्रुष्य व्हायचा. काहि केल्या तो मोगँबोला दिसायचा नाही. मग मोगँबो लाल काचेच्या चश्म्यातून बघायचा. अनिल कपूर दिसायचा. आपण चश्म्याचा रंग बदलला की नजरेसमोरचे दृष्य बदलते. कविळ झालेल्याला पिवळे दिसते म्हणतात. परकाया प्रवेश करून - दुसर्‍याच्या नजरेतून तिसर्‍याकडे पहाण्याची तर मजाच काही और आहे. असे करताना लेखकाने लिहिलेल्या शेकडो पानातून त्याचा द्रुष्टीकोन समजून थोडक्यात मांडणे आणी मूळ लेखकाच्या / विचारवंताच्या खुसखुशीत शैलीला धक्का लागू न देणे; ह्या दोन्ही जवाबदार्‍या पार पाडण्याचा आमचा मानस आहे.
 त्यांच्या चश्म्यातून - भाग १. -

**********************************************************************************************************

त्यांच्या चश्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर

(संदर्भ : आकलन, जागर, शिवरात्र)
धर्मवेडा तुर्की बाबर पनिपताची पहिली लढाई जिंकला. संग्रामसिंग विरुद्धच्या या लढाईला तो जिहाद म्हणत असे. आपला इस्लाम धर्म इतरांच्यावर लादणे हा त्याला आपला हक्क वाटत असे. हिदुस्थानचा हा पहिला तुर्की राजा. त्यामागे त्याचे बावळट पोर हुमायुन गादीवर बसले. राज्य संभाळता न आल्याने ते आपला जिव वाचवत पळत होते. त्या धवपळीच्या कालखंडात १५४२ साली त्याला मुलगा झाला. अबुल मुताह जलालुद्दीन महमद अकबर.


 


या परदेशी रक्ताच्या अकबराचे अनघा नावाच्या भारतीय दाईने संगोपन केल्याची नोंद आहे. १३ व्या वर्षी तो राजा झाला. पण राजधानीच न्हवती. दिल्लीचा ताबा त्यावेळी हिमू या पराक्रमी हिंदू राजाकडे होता. तो स्वत:ला विक्रमादित्य म्हणवून घेत असे. त्याने स्वतःचे हिंदू राज्य निर्माण केले होते. अकबराचा आणि त्याचा संघर्ष अटळ होता. पनिपतचे दुसरे युद्ध झाले. केवळ दैवयोगाने अकबराने ही लढाई जिंकली. हीमू काफराचे स्वतःच्या हाताने मुंडके उडवले. काफिरांना ठार करणारा धर्मयोद्धा म्हणून - गाझी - ही इस्लामी धर्मशास्त्रातली पदवी स्वतःला लावून घेतली. त्यावेळी अकबराचा मार्गदर्शक होता. - बहरामखान.


अकबर हा काही दयाळू संत न्हवे. सदगुणांचा पुतळा ही न्हवे. तो मध्ययुगातला विचारी राजा आहे. आणी नव्या अनुभवानी.... नव्या विचारानी माणसे बदलतात.... याचे उदाहरण आहे.


 पुढे मार्गदर्शक बहरामखानाशी अकबराचे वाजले. मग बहरामखानाची हकालपट्टी झाली. १५६२ सालपासून - वीस वर्षांच्या अकबराच्या स्वतंत्र कार्यकर्तुत्वाला आरंभ होतो. त्यावेळी तो पुत्रप्राप्तीसाठी आतुर होता. दरसाल अजमेरची यात्रा करत होता. पुत्रप्राप्तीसाठी यात्रा - जत्रा हा काही मोठा पुरोगामी द्रुष्टीकोन न्हवे ; पण अशा प्रकारची तर्कातीत धर्मश्रद्धा त्यावेळी सार्वत्रिक होती. अशाच यात्रेत राजा बिहारीमलची कन्या जोधाबाईशी अकबर लग्न करतो. त्याआधी तिला मुसलमान करून घेतो. हेही पुरोगामीपणाचे द्योतक न्हवे. तुर्की रक्ताचा अभिमान गळून पडलेला आहे पण विशीतला अकबर अजूनही धर्मनिष्ठ मुसलमान आहे.

उदारमतवादी मुसलमान व्हायचे की धर्मपिसाट मुसलमान व्हायचे हे दोनच पर्याय अकबरापाशी आहेत. जोधाबाईशी झालेल्या लग्नानंतर अकबर पहिला पर्याय निवडतो.


राजपूत विषयक अकबराच्या धोरणातला बदल इथपासून सुरू होतो. राजपूतांना सन्मानाने वागवणे. त्यांना मुसलमानांपेक्षा वरच्या हुद्द्यावरच्या जागा देणे वगैरे गोष्टी सुरू होतात. त्यावेळच्या काळाचा विचार करता ह्याला थोडाबहुत पुरोगामीपणाच म्हणावे लागते. त्याकाळात गोव्यातले पोर्तुगीज रक्तरंजित इन्विझिशन मधे मग्न आहेत. राणी एलिझाबेथ च्या इंग्लंडमधे - चर्चमधे उपस्थित राहण्यासाठी आयरिशांना कर द्यावा लागतो आहे. हिंदू धर्मपंडितात एकाहून एक कर्मठ भूमिका घेण्याची चढाओढ आहे. त्या काळातला अकबराचा हा मर्यादित उदारमतवाद आहे.


नंतर अकबर पुढचे पाउल टाकतो; आणि मुल्लामौलवी बिथरतात. "युद्धात जिंकलेल्या हिंदूना सक्तीने मुसलमान करण्यात येणार नाही" असा सरकारी आदेश अकबर काढतो.

 या आज्ञेने मौलवी चिडणे स्वाभाविक होते. मुस्लिम धर्मशास्त्रानुसार मुसलमान फक्त दोन कारणांसाठी लढतो. एकतर काफिरांनी त्रास दिल्यास करायचा जिहाद किंवा भविष्यात त्यांचा त्रास होउ नये म्हणून आधीच केलेला जिहादी हल्ला. हा हल्ला करताना; एकमेव सत्यधर्माचा - इस्लामचा प्रचार जगभर करण्याचे ध्येय ह्रुदयात बाळगायचे असते. बिगर मुस्लिमांशी होणारे प्रत्येक युद्ध हे धर्मयुद्ध - जिहाद मानले जावे असा मौलवींचा कायम आग्रह असतो. दोन मुसलमान राजे आपापसात भांडले तरच ते खाजगी भांडण मानले जाते. अकबर म्हणतो - की माझ्या हिंदूंशी झालेल्या लढायांचा आणी इस्लाम धर्माचा काही संबंध नाही. लढाई ही खाजगी गोष्ट आहे.


हा इस्लामी धर्मशास्त्रात उघड हस्तक्षेप आहे. १५६२ साली त्याने अजून एक सरकारी आदेश काढून सदर उल सदरचे - इस्लामी धर्मपीठाचे अधिकार कमी केले. पण अकबर इतके करून थांबला नाही १५६३ साली त्यानी हिंदूंवर असलेला धार्मिक यात्राकर रद्द केला. त्यापुढे जाउन १५६४ साली झिजिया कर रद्द केला. हिंदूंच्यावर झिजिया कर लावावा का ? हा इस्लामी पंडितातला एक विवादास्पद मुद्दा होता.


जो इस्लामी देश आहे तो दार उल इस्लाम (शांतताभूमी) आहे. जो देश मुस्लीमांचा नाही तो दार उल हर्ब (युद्धभूमी) आहे. इस्लाम हा एकमेव सत्यधर्म असल्याने त्याचा प्रचार आवश्यकच. त्यासाठी दार उल हर्ब ला दार उल इस्लाम बनवण्यासाठी लेखणी; वाणी आणी तलवारीने जिहाद करणे हे प्रत्येक इमानदार मुस्लिमाचे कर्तव्य आहे. दार उल हर्ब मधले लोक ज्यू किंवा ख्रिस्ती असतील तर ते अहले किताबी होत. एकेश्वरवादी होत. त्यांना जमल्यास मुसलमान करावे किंवा सूट म्हणून त्यांवर झिजिया कर लावला पाहिजे. पारशी वगैरे अग्निपूजक काफिरांना ठार मारले पाहिजे अथवा मुस्लिम केले पाहिजे. इथपर्यंत मौलवींत एकमत होते. प्रश्न हिंदूंचा होता. मुहम्मदाला हे लोक माहित नसल्याने त्यांबद्दल कुराणात स्पष्ट उल्लेख नाही. पण हे लोक मूर्तिपूजक असल्याने त्यांना मारावे किंवा अल्लाच्या एकमेव सत्यधर्मात आणावे असे एक गट म्हणत असे. मौलवींचा दुसरा गट हिंदूंची मूर्तीपूजा वरवरची असून ते मूलतः एकेश्ववरवादी असल्याने त्यांना झिजियाची सवलत दिली पाहिजे असे प्रतिपादित करे.

अकबराने दोघांचा गाशा गूंडाळला. इस्लाम धर्माची मूळची भूमिका शांतीचीच आहे असे तो म्हणू लागला. झिजिया सरळ माफ केला. अजून अकबर स्वतःला धर्मनिष्ठ मुस्लिम समजत असे.


तो नवा विचार करू पहात होता पण काळाच्या सर्व मर्यादा त्यालाही होत्या. १५६६ साली त्याने दुर्गावती राणीला युद्धात मारले. तिच्या सुनेला आणि बहिणीला पकडून स्वतःच्या जनानखान्यात टाकले. अकबराच्या अंतःपुरात ५००० स्त्रीया असल्याची नोंद आहे. तत्कालीन हिंदू राजांतही बहुपत्नित्व होतेच. महाराणा प्रतापाला ११ बायका होत्या. जितांच्या स्त्रिया जनानखान्यात घालण्याची प्रथा हिंदूतही होती.

अकबर त्याच्या आज्या प्रमाणे विपुल प्रमाणात दारू पित असे. बापाप्रमाणे अफू घेत असे. आणी स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य म्हणून सर्व मादकद्रव्ये एकत्र करून "सबरस" नावाचे पेय बनवून पीत असे. अकबराचा मोठेपणा सांगत असताना त्याची चैन, भोग, अतिरिक्त विलास नाकारण्याचे काहिच कारण नाही. १५६८ ला अकबराने चितोड जिंकले. हा आनंद साजरा करण्यासाठी पकडलेले ८००० राजपूत सैनिक मारले. त्यानंतर ३०,००० निरपराध नागरिकांची कत्तल केली. पण युद्धाला धार्मिक रंग येवू दिला नाही.


१५६३ ते १५६७ ह्या काळात अकबराच्या सन्निध्यात वेगवेगळे विद्वान आलेले दिसतात. प्रथम विरवर जो बिरबल या नावाने विख्यात आहे. राजा तोरडमल, राजा मानसिंग आणी वीरवर ह्या हिंदू मित्रांच्या सानिद्ध्यात एक वेगळाच अकबर आकारू लागला. अकबर स्वतः सुन्नी मुस्लिम असला तरी त्याचा लहानपण पासूनचा शिक्षक लतीफ कझवानी हा शिया मुस्लिम होता - त्याची धार्मिक भूमिका "सुलह ई कुल" या नावाने ओळखली जाते. साधारणपणे सर्वधर्म समभावाच्या जवळ जाणारी ही भूमिका आहे. अकबराच्या अंतःपुरातील हिंदू स्त्रियांचाही त्यावर प्रभाव पडत होता.

मुख्य म्हणजे नव्या अनुभवातून नवे शिकण्याची.... स्वतःची मते बदलण्याची एक विलक्षण शक्ती अकबराजवळ होती. त्याकाळी ती दुर्मीळ होती.


१५७३ साली तो गुजराथला गेला. त्यावेळी एका पारशी धर्मपंडिताशी त्याची भेट झाली. मूळचे इराणचे पारशी अग्निपूजक असतात. सैतान हा अग्नीपासून बनलेला आहे असे कुराणात लिहिलेले आहे. पारशी वगैरे अग्निपूजक काफिरांना ठार मारले पाहिजे अथवा मुस्लिम केले पाहिजे. इथपर्यंत मौलवींत एकमत होते. अरबांनी इराण जिंक्ल्यानंतर सर्व देश मुसलमान करण्यात आला. धर्मासाठी जिव घेवून भारतात पळालेले लोक म्हणजे पारशी. दस्तूर मेहराजी राणा या पारशी धर्मपंडिताशी चर्चा केल्यानंतर अकबराने म्हटले - पारशी हा देखील एक इश्वरी धर्म आहे !




शीख धर्माकडेही अकबराचे लक्ष होते. गुरू अर्जुनसिंग यांच्याशी अकबराने अनेकदा चर्चा केली. गुरु ग्रंथसाहेब हाही एक दैवी धर्मग्रंथ आहे असे अकबर मानू लागला. धार्मिक विषयांवर चर्चा करण्याचा छंद अकबराला लागला आणि इबादतखान्याचा जन्म झाला. शिया, सुनी, पारशी, शीख, जैन, बौद्ध, वैष्णव, शैव असे वेगवेळ्या पंथांचे पंडित बोलावून इबादतखान्यात अकबर त्यांच्याशी चर्चा करू लागला. येथे चार्वाकाचे अनुयायी येवून गेल्याचे नोंद आहे. या चर्चात परस्पर मतांचे मंडन , खंडन होत असे. कफिरांना कुराणचे खंडन करायचा अधिकार देणे मौलवींना पटण्याजोगे न्हवते.



 हळूहळू सर्वच धर्म खरे आहेत अशा भुमिकेवर अकबर येवून पोचला.


सैन्याच्या हालचालींमुळे शेते तुडवली गेल्यास; नुकसानभरपाइ देण्याचा हुकुम अकबराने याच काळात काढला. पुढे मुस्लिम धर्मगुरूंचा ब्लास्फेमीचा अधिकार अकबराने काढून घेतला. इस्लामचे प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांवर कुणी टीका केली तर मुसलमान ते सहन करू शकत नाहीत. अशी टीका करणार्यांचा छळ करण्याचा अधिकार मुस्लिम धर्मगुरूंकडे असतो. आजही सर्व मुस्लीम देशात हा कायदा आहे. १५७९ साली अकबराने हा कायदा रद्द केला.


राजा मानसिंग हा श्रद्धाळू वैष्णव होता. त्याने अकबराची वल्लभ संप्रदायाच्या संतांशी भेट घडवून आणली. भेटीनंतर अकबराने वृंदावनाच्या परिसरातले सर्व कर माफ करून टाकले. त्या परिसरात गोहत्याबंदीचा कायदा केला. १५८० साली अकबराने कायदा केला की - आजपर्यंत ज्याना जबरदस्तीने मुस्लिम करण्यात आले आहे - ते सर्व त्यांच्या मूळच्या धर्मात परत जाउ शकतात.


सुनी धर्ममतावर अकबराची फारशी श्रद्धा नाही असे शिया मुस्लिमांना वाटले. त्यांनी अकबराला शिया करण्याचा असफल प्रयत्न करून पाहिला. १५८० सालीच अकबराने ज्येसुईट मिशनर्यांना चर्चेसाठी बोलावले होते. अकबराला त्यांची स्वेच्छेने दरिद्री राहून आयुश्यभर जनसेवा करण्याची मिशनरी व्रुत्ती आवडली. पण मिशनर्यांचा प्रयत्न अकबराला ख्रिश्चन करण्याचा होता. त्याला मात्र अकबर बधेना. मिशनर्यांनी त्याला पाखंडी ठरवले.

मिशनरी लिहितात - " अकबर हिंदूसारखा मिश्या ठेवतो. दाढी ठेवत नाही. तो सूर्याची पूजा करतो. तो नास्तिक आणी पाखंडी आहे. फाजील जिज्ञासा हे त्याचे वैशिष्ट्य आहे."


 इस्लामचे प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांवर कुणी टीका केली तर मुसलमान ते सहन करू शकत नाहीत. अशी टीका करणार्यांचा छळ करण्याचा अधिकार  - ब्लास्फेमी.  अकबराने कायदा केला कि (स.व . ) मुहम्ममद पैगंबरांवर  विकृत टिका करायची नाही . पण सकारात्मक टिका किंवा टिपण्णी केली तर चालेल .  आणि हा  - अशी टिका करण्याचा अधिकार त्याने सर्व धर्मियांना दिला .  अकबराने ब्लास्फेमीचा कायदा रद्द केल्यामुळे मौलवी चिडले. त्यांनी अकबराविरुद्ध बंड केले. कलक्त्त्याला मोठे बंड झाले.

 अकबराचा पाडाव झाल्याशिवाय भारतात इस्लामला भविष्य नाही असे मौलवींना वाटत होते. त्यांनी अकबराला काफर म्हणून जाहीर केले आणी अकबराविरुद्ध जिहाद पुकारला. अकबराने उलेमा आणी मौलवींचे बंड क्रूरपणे चिरडले. अनेक शेख आणी फकीर हद्दपार केले. अनेकांना कंदाहरच्या बाजारात विकले. त्यांच्या दर्गे आणी मशीदिंच्या जमिनी जप्त केल्या. राजकीय गोंधळ घातल्यास वक्फ च्या जमिनी जप्त करणारा आणी इस्लामी धर्मवेड्यांना गुलाम करून कंदाहरच्या बाजारात विकणारा, अकबर हा पहिला आणी शेवटचा भारतीय.


अकबराला सुन्नी रहाण्यात रस राहिला न्हवता. त्याला शिया व्हायचे न्हवते. त्याला ख्रिश्चन बनवण्याचे मिशनर्यांचे सर्व प्रयत्न फसले होते. हिंदूत धर्मप्रसाराची सोयच न्हवती ! अकबराच्या डोक्यात वेगळीच चक्रे फिरत होती. त्याने सगळ्या धर्मचर्चा ऐकल्या होत्या. बर्या वाइट गोष्टी सगळ्याच धर्मात असतात असे त्याला वाटू लागले. वाईट गोष्टी टाळून सगळ्याच धर्मातल्या चांगुलपणा एकत्र केला तर ? दीने इलाही चा जन्म होत होता.

(या इलाही इलिल्लाही; मुहम्मद रसूलिल्लाहि.) अल्लाह एकच आहे. आणी मुहम्मद हा त्याचा शेवटचा प्रेषीत आहे हा इस्लामचा मूलभूत नियम आहे. अकबराने हा नियम मोडला आणी स्वतःलाच पुढचा प्रेषीत जाहीर केले. वेद; रामायण महाभारत यांची फारसीत भाषांतरे करून तो अभ्यासू लागला. त्याला आता एक परिपूर्ण आणी नवा असा धर्म - दीने इलाही बनवायचा होता.


मुस्लिमांच्या शाळातून, मदरशातून त्यावेळी प्रथम अरबी भाषा आणी नंतर धर्मशास्त्रांचा अभ्यास होत असे. अकबराने अशी भूमिका घेतली की या फालतू अभ्यासात काय अर्थ आहे ? शाळातून इतिहास, तत्त्वज्ञान, गणीत, वैद्यक, ज्योतिष याचा अभ्यास झाला पाहिजे. एका अर्थाने आधुनिक अभ्यासक्रमाची भूमिका आहे.

अकबराच्या म्रुत्युनंतर बर्याच वर्षांनी शिवरायांच्या एका पत्रात अकबराचा उल्लेख येतो अशी वदंता आहे.


शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाठवलेले पत्र 




 औरंगजेबाने जेव्हा धर्मांधपणा सुरु केला आणि जिझिया कर लावला तेंव्हा त्याला तुझ्या साम्राज्याचा नाश होईल असे पत्र   शिवाजी महाराजांनी पाठविले आणि त्यात  लिहिले  : - 


" सांप्रत अमुच्या संगे युद्धप्रसंगानंतर आपले संपत्ती खर्च झाले असता पादशहा-खजिना रिकामा जाहला, याकरिता हिंदू लोकांकडून जाजिया पट्टीचे द्रव्य उत्पन्न करून पादशाही गरजा त्याच्याआधारे पूर्ण करीत आहां असे ऐकण्यास आले. हि पादशाही निर्माण करणारा ( जलालुद्दीन) अकबर बादशहांनी न्यायाने ५२ वर्षे राज्य केले. त्यांनी ख्रिस्चन, ज्यू, मुस्लिम, दोउद पंथीय, काफर ( ansari), नास्तिक ( दहारिया ), ब्राह्मण ( वैदिक) आणि जैन धर्मगुरू या सर्व धर्म पंथीयांना वैश्विक हितसंबंध जोपासणारे प्रशंसनीय असे धोरण अवलंबले होते. त्यांच्या या अशा सहीष्णू हृदयाचे ध्येय एकच होते ते म्हणजे सर्व लोकांना आनंदी ठेऊन त्यांचे रक्षण करणे होय. त्यामुळेच त्यांची कीर्ती "जगत गुरु" या नावाने पसरली.
(Doubtful source of the letter ) 

१५८४ नंतर अकबर अश्रद्ध बनत चालला. कुराणात लिहिलेले सर्व चमत्कार खोटे आहेत असे म्हणू लागला. एका स्त्री चा चेहरा आणी मोराचे पंख असलेल्या घोड्यावर बसून प्रेषीत मुहम्मद स्वर्गात जावून अल्लाहशी बोलले असा उल्लेख कुराणात आहे.

 अकबराला हा चमत्कार अमान्य होता. ख्रिस्ती मिशनर्यांसमोरच्या चर्चेत अकबराने ही भाकडकथा आहे असे म्हटले. पण हेच नियम अकबर बायबल मधल्या चम्त्काराना लावू लागला तेंव्हा मिशनर्यांनी त्याला पाखंडी
 ठरवले.

 त्यापुढे जावून त्याने सर्वच धर्मातले सर्वच चमत्कार खोटे आहेत अशी भुमिका घेतली.

शेवटच्या चार्वाकाचा ऐतिहासिक उल्लेख अकबर बादशहाच्या काळात आढळतो . हा शहाणा अकबराची भेट घेऊन त्याला आपली नास्तिकता पटवून देत होता . धर्माची चर्चा आणि चिकित्सा करण्यासाठी अकबराने इबादतखाना नावाचे नवे ऑफिस उघडल्याचे इतीहासाने नोंदवले आहे. तिथे त्याने सगळ्या धर्माच्या पंडितांशि चर्चा केल्या . उत्तर आयुष्यात १५८२ साली अकबराने इस्लाम धर्म सोडून दिला आणि दिने इलाही नावाचा नवाच धर्म काढला .त्याच्या या नव धर्माला - धर्म ग्रंथच नव्हता . मौलवी / पंडित हि भानगड पण नव्हती . या नव धर्म स्थापनेवर कदाचित चार्वाक मताचा अंशत: प्रभाव असावा. अकबर कृत दिने इलाहीच्या काही मताशी चार्वाकाचे विलक्षण साम्य आढळून येते .

 पुढे जावून  अकबर  म्हणू लागला सर्वच धर्म मानवाने निर्माण केलेले आहेत. म्हणून काळानुसार धर्मात बदल केले पाहिजेत. त्याने नियम केला की पती पत्नीत १२ वर्षापेक्षा अधिक अंतर असता कामा नये. हा नियम खुद्द प्रेषितांच्या लग्नांच्या विरोधात होता. त्यांची एक पत्नी पंचेचाळीस वर्षानी लहान होती.अनेक लग्ने केलेल्या अकबराला आता एकपत्नित्व हवे होते. १५८२ नंतर त्याने आणखी लग्ने केली नाहीत. हिंदू आणी मुसलमान अशा दोघांनाही समान नागरी कायदा - एकपत्नित्वाचा कायदा लागू केला. हा तत्कालीन हिंदू आणी मुसलमान अशा दोन्ही धर्मातला हस्तक्षेप होता. त्याने स्क्तीने सती जाण्यावर बंदी घातली. विधवांना पुनर्विवाहाची परवानगी असावी असे त्याला वाटत होते. मुलगा १२ व्या वर्षी सज्ञान होतो; तेंव्हा त्याच्या परवानगीनेच त्याची सुंता १२ वर्षी करावी असा कायदा तो आणू पहात होता.



दिने इलाहीच्या स्थापने बरोबरच अकबराने जाहिर केले - समाजाच्या भल्यासाठी धर्मात हस्तक्षेप करणे हा राजाचा अधिकार आहे.

अकबर सुरवातीला कडवा मुस्लिम होता … तो नंतर बदलत गेला .सहिष्णू मुस्लिम झाल्यानंतर अकबर नास्तिक मताकडे झुकू लागला . शेवटी इस्लाम  त्यागून त्याने नवा धर्म काढला 


 अकबर कि राणा प्रताप ?



अकबर कि राणा प्रताप ? हा प्रश्न इथे अप्रस्तुत आहे . ज्या काळात अकबराने राणा प्रतापाविरुद्ध जिहाद 

करून त्याला संपवले त्या काळात प्रतापच आपल्याला आप्त वाटणार आहे . अकबराने हिंदु राजपूत स्त्रियांशी 

लग्न करताना आधी त्याना मुस्लिम बनवले होते त्यातही काही कौतुकास्पद नाही . 


इथे मुद्दा अकबराकडे नवा विचार करायची विलक्षण शक्ती होती असा आहे. उत्तर आयुष्यात अकबराचा 

बुद्धिवादाकडे झुकणारा नास्तिक कारभार पाहिला कि मते बदलावी लागतात . जाबाल - चार्वाक अशा भारतिय 

दार्शनिकांच्या परंपरेत अकबर जाउन बसतो . तो आंधळेपणे धर्म पाळत नाही . त्याला सुधारतो - वाकवतो 

आणि मोडतोसुद्धा . या काळात मात्र अकबर आगदी आपला होऊन जातो. मध्ययुगिन भारतातला बुद्धिवादी 

वारसा शोधायचा तर उत्तरकालीन (बदलेल्या) अकबरास मुळपुरुष मानणे भाग आहे .

त्याने जनतेचे भले करणारे कायदे ----- धर्मात हस्तक्षेप करून लादले.

 अकबराच्या दिने इलाही या नव्या धर्माला पंचवीस हून कमी अनुयायी मिळाले. पण त्याने त्याचा नवा धर्म कोणावरही लादला नाही. मुल्ला मौलवींना कंदाहरच्या बाजारात विकणार्‍या अकबराला ते अवघड न्हवते. . हा  बुद्धिवाद - हि सहिष्णुता - एकप्रकारचा चमत्कार होता. सेक्युलर हा शब्द जन्मण्या आधी हे घडत होते. फ्रेंच राज्यक्रांती घडायला अजून २०० वर्षांचा अवकाश होता.


 - डॉ. अभिराम दीक्षित, पुणे 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखमालेत भारतातील मुस्लिम राजकारणाचा रंजक वेध घेतला आहे. त्यासाठी काही देखणे  चरित्रनायक निवडले  आहेत .
त्यांच्या चशम्यातून ……

१) कुरुंदकरांचा अकबर : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_6.html 
२) 1857 चा (मोरेंचा ) जिहाद : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_8496.html
३) जनतेचा प्यारा अश्फाक : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_1247.html
४) मौलाना अबुल कलामांची आझादी : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post.html
५) हमीदचे मुसलमान : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post_15.html
६) मुकादमांचा इस्लाम : http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post.html
७) डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html

३३ टिप्पण्या:

  1. डॉक्टर साहेब, माहितीचा हा खजिना तुम्ही आजवर लोकांपासून दूर का ठेवला हा माझा मोठा आक्षेप आहे. अकबराविषयी इतकी माहिती क्वचितच कोणत्या तरी ब्लॉगवर सध्या उपलब्ध असेल. अकबराचा हा वेगळाच पण सर्वसामान्य मराठी इतिहास वाचकांना अगदीच अपरिचित चेहरा जनतेसमोर लेखनरूपाने प्रसिद्ध केल्याबद्दल तुमचे जितके आभार मानवेत तितके कमी आहेत.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. When you study Shivaji,the great Maratha King,vis-a vis Akbar (though there is generation gap ), the greatness of Shivaji shines like a sunlight.

      हटवा
  2. ही अनमोल माहिती त्या आशुतोष ला द्या ,
    म्हणावे बाबा जोधा अकबर नंतर फक्त अकबर हा सिनेमा काढ
    लोकांना अकबर नव्याने कळेल.

    उत्तर द्याहटवा
  3. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. आपण दिलेली माहिती रंजक आहे. अकबरावर आपण एक पुस्तक लिहावे.

    शुभेछा!

    माधव काळे, औरंगाबाद

    उत्तर द्याहटवा
  5. व्यासंग असावा तर असा...माहितीपूर्ण लेख...!!!

    उत्तर द्याहटवा
  6. चागली माहिती आहे .कोणताही अभिनिवेष न बालगता लिहले आहे.डाक्टर साहेब अभिनंदन.
    Anil Datir buldana 8237942605

    उत्तर द्याहटवा
  7. छान लेख आहे.या दृष्टीने संदर्भ पुन: तपासायला हवेत. मात्र एक तांत्रिक शंका. आपल्या एखात सुरुवातीला व नंतरही बाबर/अकबर यांना तुर्की म्हटले आहे. मला वाटत हे लोक मोंगल होते ,तुर्की नाहित. खिलजी व तुघलक घराण्यांनंतर तुर्की संपले. या दोन्ही घराण्यांना मोंगल/मंगोलियन आक्रमकांचा त्रास होत असे. बाबर ते बहादुरशहा जफर हा सर्व मोंगल वंश तुर्की नाही. खिलजी - तुघलकादी सत्ता सुलतानी होती तर मोंगल सत्ताप्रमुखाला बादशाहा म्हणत.

    उत्तर द्याहटवा
  8. अशाच प्रकारचा लेख दारा शुकोह वरसुद्धा लिहिला जाऊ शकेल,दैववशात दारा ला सत्ता मिळाली नाही पण अन्यथा तो उदारमतवादी बादशहा म्हणून प्रख्यात होऊ शकला असता. मात्र हे सर्व अपवाद आहेत,नियम नाहित याचा विसर पडता कामा नये.

    उत्तर द्याहटवा
  9. Chandrashekhar Sane. Kurundakar Called Akbar as a turk. He has explained his roots to Taimur in the main article .

    उत्तर द्याहटवा
  10. अप्रतिम लेख! पण अकबर हा नक्की तुर्की, मोंगोल, की फारसी असा प्रश्न आता पडला आहे…

    उत्तर द्याहटवा
  11. काहितरी वेगळं सर्च करताना हा ब्लॉग सापडला. कुरुंदकरांचं नाव बघून ही पोस्ट वाचली. लेख खरंच चांगला आहे. कुठल्या पुस्तकातून तो घेतला आहे तेही टाकलं असतं तर एक संदर्भ राहिला असता.

    शीतल.

    उत्तर द्याहटवा
  12. अप्रतिम लेख !!! गांधी आणि आंबेडकरांवरील लेखानानंतर आणखी एक छान लेख !!! अकबराबद्दल नवी माहिती कळली !!! शक्य झाल्यास कुरुन्द्कारांचे ते नवीन पुस्तक वाचेन !!! धन्यवाद !!!!

    उत्तर द्याहटवा
  13. mala aaplyaashi bolaayche aahe.. mi Dipak Pawar Aurangabad.. mi swataha aaplyaala phone karen..!!

    उत्तर द्याहटवा
  14. Kurundkaranchi shaili! Apratim.
    fakt Akbar turk ki moghal aani Akbarane Sati prathevar bandi aanali yabaddal thod sangu shakal kaa?

    उत्तर द्याहटवा
  15. Kurundkaranchi shaily.
    Waa apratim.
    Tumhi 2 goshtin baddal thodas spasht kara.
    1. Akbar moghal ki Turk
    2. Akbarane Sati prathevar bandi aanali ya baddal thodas sangav.

    उत्तर द्याहटवा
  16. Atishay sundar.
    Eka vegla akbar smor aala.
    Dhanyawad..(y)

    उत्तर द्याहटवा
  17. एखाद्या मोगल राज्याबद्दल इतकी परिपूर्ण माहिती प्रथमतःच वाचली. लिहण्याची शैलीही छान आणि वाचनीय आहे. धन्यवाद अभिरामसाहेब!

    उत्तर द्याहटवा
  18. First of all i dont know what to say now, because yeah i study that akbar was the king who help hindus by giving relief on Jijhiya tax, and i also know that behind this decision rajkumari jodha play anchor role, because of her love akbar became so happy, and also akbar choose her for marium ur jamani, but now after reading this blog, i found a greatest of great akbar, who is became pure anthiest at the end of his life,
    I want to know that did akbar really send thousands of hindus in to the arab as a servant, is it right..?? Because lots of misconception about it on social media, please clear it also,
    Regards

    उत्तर द्याहटवा
  19. डॉक्टर अभिराम,

    अकबर कसा होता यावर एक वेगळा दृष्टीकोन (इंग्रजी दुवा) आहे : http://www.hindunet.org/hindu_history/modern/akbar_ppg.html

    या लेखाच्या शेवटी सूची आहे. तीत आठपैकी सहा लेखक पाश्चात्य आहेत. अहिंदू लेखकांना अकबर क्रूर, लंपट, बेवडा, व्यसनी, इत्यादि वाटतो तर हिंदूंना वाटणारंच.

    असो.

    कुरुंदकरांच्या वरील लेखात त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान आलं आहे. त्याकडे कुणाचंही लक्ष गेलेलं दिसत नाही. ते विधान म्हणजे : तुर्की रक्ताचा अभिमान गळून पडलेला आहे पण विशीतला अकबर अजूनही धर्मनिष्ठ मुसलमान आहे.

    नेमकी हीच मुघल साम्राज्याची समस्या आहे. स्वत:ला ते काय समजतात? मुस्लिम की तुर्क? स्वत:ची ओळख काय आहे हे त्यांना शेवटपर्यंत उमजलं नाही. भारत ही काय चीज आहे हे औरंग्याच्या मृत्यूनंतर कळून चुकलं. तोवर त्यांचं साम्राज्य पूर्णपणे खच्ची झालं होतं (इ.स. १७०७).

    अकबराने इस्लामला सोडचिठ्ठी देऊन हिंदू राज्यकारभारच्या चौकटीत तुर्की वारसा पुढे का चालवला नाही? काय अडचण होती...? आज तुर्कस्थान देशाचा नागरिक स्वत:ला मुस्लिमपेक्षा तुर्क म्हणवून घेण्यात अभिमान बाळगतो. तसा पवित्रा त्याला का घ्यावासा वाटला नाही...? का दीने इलाही हा तसाच काहीसा प्रयत्न होता...? बरेच प्रश्न मनात आहेत. बघूया, कधीकाळी उत्तरं मिळतीलशी आशा आहे.

    आ.न.,
    -गा.पै.

    टीप : मूळ प्रतिसाद इथे आहे : http://www.maayboli.com/node/35637?page=1#comment-2640836

    उत्तर द्याहटवा
  20. अभिराम, छान लेख, अभ्यासपूर्ण विवेचन, आवडला.

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *