७ फेब्रु, २०१४

त्यांच्या चष्म्यातून भाग ४ : मौलानांची आजादी


त्यांच्या चष्म्यातून भाग ४ : मौलानांची आजादी 

महान देशप्रेमी   मौलाना अबुल कलाम आझाद यांना तीन वेळा दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा फर्मावण्या एव्हढ्या गुन्ह्यांचे दोषी ठरवण्यात  आले  ! होय , तेच मौलाना आझाद - स्वातंत्र्य सेनानी , स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री आणि गांधीजींचे अनुयायी असलेले राष्ट्रवादी गृहस्थ . असा कोणता गुन्हा केला होता त्यांनी ? कोणी फर्मावली हि शिक्षा ? शिक्षेचे पुढे काय झाले ? चला मौलाना आझादांच्या कथेला त्यांच्या बालपणापासून सुरुवात करू .





मौलाना आझादांचे घर, शिक्षण  आणि बालपण 

बादशहा अकबराच्या सेक्युलरगिरी बद्दल आणि विशेष म्हणजे दिने इलाहिच्या स्थापनेबद्दल मुल्ला मौलवित संतापाची लाट उसळली होती आणि अकबराविरुद्ध कलकत्त्याला मोठे धार्मिक  बंड झाले होते हे आपण मागील भागातून पाहिले आहे. दिने इलाहीविरुद्ध प्रखर संघर्ष करत ज्यांनी अकबराविरुद्ध सलीम च्या बंडाला पाठिंबा दिला - अशा प्रसिद्ध मुल्ला मौलवित जमालुद्दीन हे नाव फार महत्वाचे आहे. ते मेहदवि चळवळीचे पाठीराखे होते . सय्यद नुरुद्दीन या आपल्या पूर्वजाचा वारसा ते चालवत होते . सय्यद नुरुद्दीन यांनी इस्लामी राजेरजवाड्यांनी इस्लामची मुल तत्वे सोडून भरकटू नये म्हणून हि चळवळ चालवली होती .  सय्यद नुरुद्दीन आणि जमालुद्दीन या प्रसिद्ध मौलवींच्या वंशात मौलाना आझादांचा जन्म झालेला आहे .

 इस्लामी परंपरे नुसार मौलानांचे घर बंगाल मध्ये धर्मगुरुंचे घर म्हणून मानले जाते. १८५७ साली ब्रिटिशांना हाकलून देण्यासाठीचा  जिहाद अयशस्वी   ठरल्यानंतर मौलाना आझादांचे वडील भारत सोडून अरबस्तानातील मक्का येथे रहाण्यास गेले . आपल्या वडिलानच्या या कृत्याला आझादांनी ' हिजरत ' असे संबोधले आहे .      


 ' हिजरत '  म्हणजे काय ? हे जाणून घेण्यासाठी इस्लामी धर्मशास्त्रांचे जुजबी ज्ञान करून घेणे आवश्यक आहे. मुहम्मद पैगंबर साहेबांनी  इस्लाम धर्म स्थापन केला आणि तोच अल्लाहचा एकमेव सत्यधर्म आहे असे घोषित केले . 

प्रेषित मुहम्मदानि मक्का या अरबस्तानातल्या शहरात इस्लामची स्थापना केली . इस्लामचा मूर्तीपूजेला विरोध होता म्हणून स्थानिक मूर्तिपूजक अरबांनी मुहम्मदाना फार त्रास दिला , त्यांचा छळ केला . त्यावेळी इस्लामच्या अनुयायांची संख्या २०० पेक्षा कमी होती. त्या मुठभर मुस्लिमांना काफरांच्या राज्यात राहणे असह्य आणि अशक्य झाले . प्रेषितांनी आपल्या नव मुस्लिम बांधवांसह मक्का शहराचा त्याग केला आणि मादिनेकडे प्रयाण केले. या स्थलांतराला ' हिजरत '  असे म्हणतात . प्रेषित मुहम्मद हे परंपरे नुसार आदर्श मुस्लिम मानले जातात. आणि धार्मिक मुसलमान त्यांच्या सर्व कृतींचे मनापासून अनुकरण करत असतो . 

मुहम्मदाप्रमाणेच  आझादांच्या वडिलांना इंग्रजी काफिरांचे राज्य असलेल्या भारत देशात राहणे असह्य आणि अशक्य  झाले म्हणून त्यांनी अरबस्तानातल्या इस्लामी मक्केत हिजरत केली. मक्केत त्याना १८८८ साली  सुपुत्र झाला - त्याचे नाव मोहियुदिन अहमद .






 पण हा मोहियुदिन   कोणी सामान्य मुसलमान नव्हता. परंपरेनेच तो कलकत्त्याचा इमाम आणि मुस्लिम धर्मगुरुत्वाचा वारसदार होता.   हे पारंपारिक इमाम पद लक्षात घेऊन त्याचे दुसरे नाव ठेवण्यात आले -   फिरोजबख्त ! फिरोजबख्त म्हणजे युद्धजेता ! तर या बुद्धिमान फ़िरोझ बख्त ला आधुनिक शिक्षण मिळाले नाही . त्याने पारंपारिक इस्लामी धर्म शिक्षण घेतले. लोक विलक्षण  बुद्धिमत्ता आणि इस्लामी धर्मातले प्राविण्य यामुळे लहान वयातच या मुलाची कीर्ती अरबस्तान भर  दुमदुमू लागली ! वयाच्या केवळ अठराव्या वर्षी त्याना विद्या वाचस्पती अशी पदवी देण्यात आली . या लहान   मुलाचे इस्लामी धर्म शास्त्रातले प्राविण्य, ज्ञान आणि अधिकार  पाहून मक्केतल्या मुल्ला मौलवींनी हि पदवी दिलेली आहे . अरबी भाषेत विद्यावाचस्पती म्हणजे अबुल कलाम . हा फ़िरोजबख्त पुढे मौलाना अबुल कलाम आझाद या नावाने सुविख्यात झाला !

भारतातून इंग्रजांची राजवट समाप्त झाली पाहिजे हि श्रद्धा मौलाना आझादांना घराच्या परंपरेतूनच गवसली आहे .  अकबर ते इंग्रज या सर्वांच्या गैर इस्लामी सत्तेविरुद्ध जिहाद वा हिजरत करणार्यांचे रक्त मौलानांच्या नसात खेळत होते आणि शिकवण डोक्यात भिनली होती. 

या सर्व पार्श्वभूमीवर मौलाना आझादांचे क्रांतिकारी विचार , त्यांच्या विचारात झालेले बदल आणि आंदोलने समजून घ्यावी लागतात . मौलाना आजाद भारतात येतात आणि १९१२ मध्ये ' अल हिलाल ' हे उर्दू नियत कालिक प्रकाशित करू लागतात. अजादांचे भारतातील सामजिक आणि राजकीय जीवन इथून सुरु होते . 



इस्लामचा नवा अर्थ : नवी उत्कंठा 

मौलाना आझादांचे ' अल हिलाल ' हे उर्दू नियतकालिक गाजू लागते . ते ब्रिटीश विरोधाची आघाडी उभारतात आणि पूर्ण जोमाने खिलाफत चळवळीत सामील होतात.  १९१२ साली आझादांनी  'अल हिलाल'  सुरु केले आणि उण्या पुर्या दहा वर्षात ते  कोन्ग्रेस चे अध्यक्ष बनले . १९२३ साली मौलाना आजाद भारतीय राष्ट्रीय कोन्ग्रेस चे अध्यक्ष बनले होते. आजादांची लोकविलक्षण बुद्धिमत्ता , नेतृत्व गुण आणि इस्लामचे पंडित म्हणून त्याना मुस्लिम समाजात असलेली मान्यता या मागे उभी आहे. १९१२ ते १९२३ हा मौलाना आझादांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होण्याचा कालखंड आहे. १९३५  नंतर मात्र त्यांची लोकप्रियता झपाट्याने घसरलेली दिसते. नेमके काय घडले ? 

लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ असताना १९१६ साली त्यांनी नवे ' कुराण भाष्य ' लिहून तयार असल्याची घोषणा केली.   १९१६ मध्ये त्याना अटक झाली आणि ब्रिटीश पोलिसांनी आझादांचे ' नवे कुराण भाष्य'  जप्त केले . पुढे हे गायब करण्यात आले आणि आझादांचे भाष्य बेपत्ता झाले आहे म्हणून इंग्रजांनी जाहीर केले . मौलाना आझाद नाउमेद झाले नाहीत त्यांनी नव्याने पुन्हा कुराणाचा   अर्थ लिहिला आणि १९२१ साली पुन्हा छ्पाइस प्रारंभ केला . लागोलाग मौलाना आझादाना अटक झालेली आहे आणि ब्रिटीश पोलिसांनी सारी मुद्रिते आणि हस्तलिखिते गायब केलेली आहेत ! शेवटी अखेरीस ब्रिटीशांची सद्दी मावळू लागली १९३० सालच्या आसपास मौलाना आजादांचे तिसरे पुनर्लेखन प्रकाशित झाले . पण पुढची १५ वर्षे हे लिखाण बाजारातून पुन्हा गुल  करण्यात आले . अखेरीस १९४५ साली भारताचे स्वांतत्र्य दृष्टीपथात आल्यावर …. आझादाना आपले पुस्तक बाजारात बघण्याचे भाग्य मिळाले !!





पण तोपर्यंत इतर मौलवींनी आझादांच्या भाष्यावर केलेली टीका बाजारात उपलब्ध होती. इस्लामच्या पारंपारिक विश्लेषणाला मौलाना आझादांनी छेद दिला होता ----- कुराण आणि इस्लामचा नवा अर्थ विश्लेशित केला होता. इस्लामचे इतर अभ्यासक मौलवी त्यामुळे संतापले. हि बंडखोरी त्याना सहन झाली नाही . इतर मुल्ला मौलवींनी आजादांवर तीन गुन्हे लावले . बिदात , इरात्काम आणि इरतदात हे ते तीन गुन्हे होत. ज्या तीन अपराधाबद्दल मौलाना आझादाना दोषी ठरवण्यात आले ; त्यापैकी कोणत्याही एका  गुन्ह्याला इस्लामी धर्म शास्त्रात-  जाहीर रित्या  दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा आहे . जणू धर्म पंडिताना  अजादाचां गुन्हा तीन वेळा दगडाने ठेचून मारण्याच्या लायकीचा वाटत होता . 

मौलाना आझादांचे नवे कुराण भाष्य इंग्रज पोलिसांनी का गायब केले ? इतर पारंपारिक मुल्ला मौलवी आझादांवर का संतापले ? असे काय होते या नव्या कुराण भाष्यात ? असे काय होते या इस्लामच्या अभिनव अर्थात ?   

कुराणाचा अर्थ कसा काढायचा ? 

परंपरेने इस्लामचा अर्थ काढण्याच्या रूढ पद्धती आहेत . प्रेषित मुहम्मद आधी मक्केत राहत होते. त्यावेळी शक्ती  आणि अनुयायांची संख्या कमी असल्याने त्याना मूर्तिपूजक अरबांचा जाच सहन करावा लागत होता. मुहम्मदाना मक्का सोडावी लागली आणि मदिनेला हिजरत करावी लागली . मक्का आणि मदिना या दोन शहरात प्रेषित साहेबाचे वास्तव्य होते. प्रेषित मुहम्मदांना या दोन शहरात वास्तव्य असताना अल्लाने जिब्राइल या त्याच्या दूताकरवी काही संदेश पाठवले. प्रेषितांनी आणि इस्लामच्या अनुयायी मुस्लिमांनी त्यांची जीवन पद्धती कशी ठेवावी ? (इस्लामी बन्धुसंघ ) उम्मत मधल्या मुस्लिमांशी कसा व्यवहार  करावा ? गैर मुस्लिमांशी कसा व्यवहार करावा ? कफ़िरांशी कशी वागणूक ठेवावी ? यासंबंधीचे अल्लाहने देवदूता करावी पाठवलेले आदेश मक्का आणि मदिना या दोन शहरात प्रेशिताना प्राप्त झाले. या संदेशाचा संग्रह म्हणजे कुराण होय . अशी मुस्लिमांची श्रद्धा आहे . 

प्रेषित मुहम्मद निरक्षर होते आणि त्यांनी अनुयायांना कुराण सांगितले - लिहिले नाही - याबद्दल सर्व मुस्लिम अभ्यासकात एकमत आहे.  पैगंबर साहेब ५७१ साली जन्मले आणि ६३२ साली अनंतात विलीन झाले. 

प्रेषित मुहम्मदाच्या मृत्युनंतर खलिफा उस्मान च्या काळात कुराण पाठ एकत्रित करण्यात आला. पैगंबर साहेबांचे चिटणीस जैद इब्बेसाबित यांनी हे काम केले. पण कुराणात अनेक अशुद्धे आली होती त्यामुळे मुहम्मदाचि जिवंत पत्नी हफ़शा यांच्या तोंडचा पाठ पवित्र मानून कुराणाचे पहिले संहितीकरण झाले . पुन्हा त्यात भाषिक अशुद्धी घुसल्या. ९३३ साली म्हणजे प्रेषिताच्या मृत्युनंतर तीनशे वर्षांनी इब्ने हसा आणि इब्ने मुजाहिद यांनी पुन्हा कुराण संस्कारित केले . आज आपल्या समोर आहे ती प्रत  ९३३ सालच्या कुराणाची आहे.

त्यात काही परस्पर विरोध किंवा अर्थ निश्पत्तिचि  अडचण आली तर ? तर त्याचा अर्थ हदीस नुसार काढला जातो . हदीस म्हणजे प्रेषितांच्या उक्ती आणि कृती . जर हदीस मध्ये संदर्भ मिळाला नाही तर मात्र बुद्धिवादाचा वापर करण्याची मुभा प्रेषितांनी कुराणात दिलेली आहे . 





मौलाना आजाद म्हणाले हदीस हि मानवी भाष्ये आहेत . फक्त कुराण हाच ईश्वरी ग्रंथ आहे . हदीसच्या परंपरेने (मुकलिद ) मी कुराणाचा अर्थ विदित करणार नाही. प्रेषितांच्या समकालीना प्रमाणे कुराणाचा अर्थ काढला पाहिजे .  कुराणाच्या इंटर प्रिटेशनचि हि संपूर्ण अभिनव पद्धती होति.  आझादांची बंडखोरी फक्त इथेच संपत  नाही  …. आजाद कुराणाचा नवा अर्थ विशद करू पाहतात . 

प्रेषित मुहम्मदाचा हेतू सर्वधर्मीय सरकार स्थापन करण्याचा आहे  असा मौलाना आझादांचा दावा आहे . इस्लामची राजकीय  धर्मसत्ता मुळी  प्रेशितानाच नको होती असा याचा अर्थ आहे .त्याचा पुढचा अर्थ असा कि - शरियत किंवा इस्लामी कायदा आणणे आणि दार उल इस्लाम करण्यासाठी जिहाद करणे हे प्रेशितासमोरचे ध्येय मुळीच नाही !!   मौलाना आझादांचे इस्लामचे  नवे इन्टप्रिटेशन सर्वार्थाने क्रांतिकारक आहे.   

सर्वधर्म समभावाचे नवे विश्लेषण इस्लाम मधून उत्पन्न केल्याने मौलाना आझादाना इंग्रजांची लबाडी अनुभवावी लागली आहे आणि रुढीप्रिय मुस्लिमांचा संताप सहन करावा लागला आहे  . 


अभिनव धर्मसंगर

मक्का  वास्तव्यात  प्रेषितांचे अनुयायी संखेने कमी होते . या काळात अल्लाने जिब्राइल नावाच्या देवदूता मार्फत जे संदेश पाठवले आहेत ते कुराणात मक्का कालीन सुरह (अध्याय ) म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहेत . त्यावेळी अल्लाने स्वत:चे एकमेवत्व  आणि  मूर्तीपूजेला विरोध यावर अधिक भर दिलेला दिसतो. मक्केतल्या भ्रष्ट पुरोहितांची रोजीरोटी मूर्तीपूजा (बुदपरस्ति ) वर अवलंबून होती . या भ्रष्ट पुरोहितांनी आणि अरबी काफिर मुर्तिपुजकानि मुहम्मदाचा छळ  केल्याने त्याना हिजरत करून मदिनेला निघून जावे लागले हे आपण पाहिले आहेच . ....    आता मुहम्मद साहेब मदिनेत प्रवेश करत आहेत . एव्हाना मुहम्मद साहेबांचा  दरारा आणि मूर्तीपूजा विरोध मदिनेतल्या काफ़िरानाहि माहित झालेला आहे .

मदिनेतहि  काफिर राज्यच आहे. इथे ज्यू , ख्रिस्ती , सबियान , मगियान आणि बुदपरस्त (मूर्तिपूजक) अशा पाच धर्माचे बहुधर्मीय सरकार आहे . मदिना कालीन सुरह (अध्याय ) सुरवातीला अल्लाहची एक भूमिका दाखवतात .   .या काळात  ज्यू आणि ख्रिस्ती धर्माचे प्रेषित हे इस्लामचेच  पूर्व प्रेषित आहेत अशी भूमिका अल्लाने मांडली आहे. अशी मुस्लिमांची श्रद्धा आहे .  सुरवातीला मुहम्मदाचे अनुयायी मक्केकडे तोंड करून नमाज पद्धत असत . 

तिथे मुहम्मदाने काफिर  ज्यू आणि ख्रिस्ती धर्माशी जुळवून घेतले कारण... अल्लानेच जेरुसलेम कडे तोंड करून प्रार्थना करण्याचा आदेश पाठवला . त्यामुळे मुसलमान नाराज झाले . त्यावर प्रेषित मुहम्मद म्हणतात - " ईश्वर तर सर्वत्र आहे , मग जेरुसलेम कडे तोंड करायला काय हरकत आहे ? " 





मुस्लिम आणि गैर मुस्लिम यात मदिना करार झाला आणि मदिनेत बहुधर्मीय सरकार अस्तित्वात आले. इथे इस्लामी धर्माची किंवा शरियतचि राजवट स्थापन झाली नाही . अल्लाने दुजोरा दिला. 

याच काळात अरबी मुर्तिपुजकात मुलीना जन्मात:च पुरून ठार करण्याची दुष्ट  चाल होती त्याला मुहम्मदानि विरोध केला आहे. प्रेषित साहेबांनी सावकारी व्याजालाही विरोध केला आहे. आणि या काळात एक पुरोगामी आणि  सर्व धर्मीय राजवट मदिनेत स्थापन झालेली दिसते. अल्लाहचा हेतू सर्वधर्मीय राजवट स्थापन करणे हाच आहे आणी  मुहम्मदानि त्यासाठीच मदिना करार केला आहे असे मौलाना   आझादांचे म्हणणे आहे . 



हदीस नुसार इस्लामचा अर्थ काढणार्या मुल्ला मौलविन्ना आझादांचे मत पटले नाही . पुढे इस्लामचे अनुयायी वाढल्यावर (मदिना कालीन उत्तरार्ध ) मदिना करार तोडण्यात आला आणि अल्लाहने काफ़िरान्विरुद्ध जिहाद पुकारून दार उल इस्लाम स्थापन करण्यासाठी आज्ञा दिल्या असे पारंपारिक मौलवी मानतात. तत्कालीन जमाते इस्लामीचे नेते मौलाना मौदुदि याच मताचे होते. शरियत - इस्लामी कायदा लागू करून सारी पृथ्वीच दार उल इस्लाम करण्यात यावी असे या  मौलवींचे मत आहे . 


कठमुल्ले आझादांच्या नव्या विचाराला विरोध करण्यासाठी परंपरेने कटिबद्ध होते. पण विद्या वाचस्पती - अबुल कलाम आझादांना इस्लामचे ज्ञान नाही असे म्हणताना दातखीळ बसत होती . कारण पाक मक्केतल्या मौलविनीच अझादाचां इस्लामी धर्म शास्त्रावरचा अधिकार मान्य केला होता. पण सर्वधर्मीय राजवट असलेले राज्य मान्य करणे म्हणजे सार्या - सार्या मेहदवि , वाहाबी वगैरे कट्टर विचारधारा अरबी समुद्रात बुडवणे ! आझादाना कसा विरोध करायचा हे धर्मांधाना न समजल्याने त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले . या गुन्ह्यांबद्दल इस्लामी धर्म शास्त्रातली शिक्षा दगडाने ठेचून मारण्याची होती !


आझाद मौलानांचे पारतंत्र्य


इस्लामचा अर्थ काढण्याच्या जुन्या पुराण्या  पद्धतीतून मौलाना अबुल कलाम - आझाद झाले होते - स्वतंत्र झाले होते. त्यांनी इस्लामचा नवा अभिनव अर्थ मांडला . सर्वधर्म समभाव हेच इस्लामचे ध्येय आहे म्हणून ठासून सांगितले. त्यांनी फ़ालनिलाहि विरोध केला . धर्माच्या आधारावर जिन्नाने पाकिस्तान निर्माण केला . पण  मौलाना आझाद पाकिस्तानात गेले नाहित. सर्वधर्म समभावी भारतातच राहिले .  प्रेषित साहेबाचे खरे ध्येय सर्वधर्मीय राजवट हेच आहे असे वारंवार म्हणत राहिले.  


भारतात सर्वधर्मीय सरकार रहावे - फाळणी होवू नये म्हणून तोडगे सुचवत राहिले. ज्या राष्ट्रवादी मुस्लिमांचे प्रतिनिधित्व मौलाना करत होते त्यांनी आणि ' जमियत उल उलेमाने'  फाळणी नको म्हणून सुचवलेले तोडगे पाकिस्तान पेक्षा भयानक असेच होते. धार्मिक दृष्ट्या विभक्त मतदार संघ , लोकसभेत मुस्लिमाना ४५% राखीव जागा , प्रान्ताना विशेष अधिकार आणि दुबळे केंद्र सरकार अशा राष्ट्रवादी अखंड भारतापेक्षा फाळणी परवडली - जिन्हा परवडला असे इतर भारतीय नेत्यांना वाटू लागले . 

अशा अव्वाच्या सव्वा मागण्या करून अखंड भारत मिळाला तरी मौलाना आझादाना तो हवा होता. मौलाना धार्माच्या पारंपारिक अर्थातून मुक्त झाले . पण पुढे राजकीय नेतृत्व म्हणून परतंत्र राहिले आणि जमियत उल उलेमाच्या मागण्यांना रेटत राहिले. 




केवळ धर्माचे अर्थ पुरोगामी काढणे या बाबतीत पहायचे झाले तर मौलाना आझादांची तुलना आर्य समाजाच्या दयानंद सरस्वतींशी करावी लागते.  महर्षी दयानंदानी वेदच नव्हे तर मनुस्म्रुतितुनहि समता उलगडली आहे!!!! त्यासाठी संस्कृत भाषेचा आणि व्याकरणाचा  किस पाडत प्रत्यक्ष पाणीनीला पाणी भरायला लावले आहे. पण मुल धर्मग्रंथात काय आहे ? यापेक्षा भाष्य काराचा हेतू काय आहे ? हे समाज कारणात अधिक महत्वाचे ठरते. वैदिक धर्मात समता आहे असे प्रतिपादित करणार्या दयानंद सरस्वतिना पुण्याच्या सनातनी ब्राह्मणांनी गर्दभानंद (गाढव + आनंद ) म्हटले होते आणि महात्मा फुलेंनी दायानंदाची मिरवणूक हत्ति वरून  काढली होती. राजर्षी  शाहू  तर घोषित आर्य समाजिस्ट आणि  बाबासाहेब हि दयानन्दाचे चाहते !
पण सवर्ण हिंदू समाज , सनातनी ब्राह्मण आणि हिंदूच्या तत्कालीन नेत्यांनी दयानन्दाना मनापासून कधीच स्वीकारले नाही .  परंपरेत नसलेले नवे अन्वयार्थ असेच तिरस्कृत राहतात.

मौलाना आझादांना यापेक्षा  वेगळे काय मिळणार होते ? सनातनी मुस्लिमांनी त्यांचे क्रांतिकारी कुराण भाष्य अमान्य केले आणि त्यांचे तडजोडीचे  राजकारण  मात्र  स्वीकारले . पण भारतात सम्राट अकबर , मौलाना  आझाद  आणि अश्फाक उल्ला खान यांचा वारसदार म्हणा अगर सहकारी म्हणा - जन्माला आलेला आहे - त्याचे नाव : हमीद दलवाई : हा बंडखोर अवलिया विचारवंत मात्र महात्मा फुलेंचा शिष्य आहे . मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा संस्थापक आहे …. आणि त्याचा आदर्श म्हणून सनातन्यांचा रोष पत्करणार्या हुतात्मा नरेंद्र दाभोलकरांनी स्वत:च्या मुलाचे नाव हमीद ठेवलेले आहे  . त्या हमीद  दलवाई विषयी  पुढच्या भागात … (क्रमश: )  
  

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखमालेत भारतातील मुस्लिम राजकारणाचा रंजक वेध घेतला आहे. त्यासाठी काही देखणे  चरित्रनायक निवडले  आहेत .
त्यांच्या चशम्यातून ……

१) कुरुंदकरांचा अकबर : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_6.html 
२) 1857 चा (मोरेंचा ) जिहाद : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_8496.html
३) जनतेचा प्यारा अश्फाक : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_1247.html
४) मौलाना अबुल कलामांची आझादी : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post.html
५) हमीदचे मुसलमान : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post_15.html
६) मुकादमांचा इस्लाम : http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post.html
७) डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html










४ टिप्पण्या:

  1. @ मौलाना आझादांना यापेक्षा वेगळे काय मिळणार होते ? सनातनी मुस्लिमांनी त्यांचे क्रांतिकारी कुराण भाष्य अमान्य केले आणि त्यांचे तडजोडीचे राजकारण मात्र स्वीकारले . पण भारतात सम्राट अकबर , मौलाना आझाद आणि अश्फाक उल्ला खान यांचा वारसदार म्हणा अगर सहकारी म्हणा - जन्माला आलेला आहे - त्याचे नाव : हमीद दलवाई : हा बंडखोर अवलिया विचारवंत मात्र महात्मा फुलेंचा शिष्य आहे . मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा संस्थापक आहे …. आणि त्याचा आदर्श म्हणून सनातन्यांचा रोष पत्करणार्या हुतात्मा नरेंद्र दाभोलकरांनी स्वत:च्या मुलाचे नाव हमीद ठेवलेले आहे. >>> मस्त.............!

    उत्तर द्याहटवा
  2. मुस्लीम जनतेला मक्केत त्रास होत होता म्हणून त्यांनी स्थलांतर केले, हे काही बरोबर वाटत नाही. इस्लाम हा राज्य मिळवण्यासाठीच जन्माला आला, त्यांचा मूर्तिपूजेला विरोध होता,आहे. या विरोधाचा अर्थ असा नाही कि फक्त ते स्वतः मूर्तीपूजा करणार नाहीत .त्याचा अर्थ असा आहे कि ते इतरांना मूर्तीपूजा "करू देणार नाहीत" !! आता अशा भूमिकेला विरोध होणारच . कोणीही स्वाभिमानी समाज दुसऱ्यांच्या अशा अटी स्वीकारणार नाही. आणि अरबस्तान तर टोळ्यांचा आखाडाच होता. ह्या टोळ्या युद्धे करीत असत.
    आणि एक, इस्लाम मध्ये तकिया असा एक हक्क/प्रथा आहे. इस्लाम पुढे नेण्यासाठी/वाचवण्यासाठी किंवा जीव वाचवण्यासाठी तुम्ही खोटे बोलू शकता , प्रसंगी इस्लाम विरोधी भूमिका (खोटी ) घेऊ शकता इत्यादी . तेव्हा आझाद नेमके काय करत होते, खरे बोलत होते कि कॉंग्रेस चा विश्वास जिंकण्यासाठी खोटे प्रयोग करीत होते तेही पहावे लागेल. आणि ब्रिटीश काही अशा लेखनावर बंदी घालणार नाहीत, त्यांना तसे करण्याचे काहीच कारण नव्हते .

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *