२२ ऑक्टो, २०२०

जनतेचा प्यारा अश्फाक

 पूर्वपीठिका



 १८५७ च्या बंडामुळे मुसलमान ब्रिटीशांना दुरावले होते. आता ब्रिटिशांशी मिळते घेउन आधुनिक शिक्षण मिळवले पाहिजे तरच मुस्लिमांचे भले होईल हे ओळखले - सर सय्यद अहमद खान यांनी. (१८०७ - १८९८). सय्यद अहमद खानानी- " ब्रिटिशांशी एकनिष्ठ मुसलमान "म्हणून एक पुस्तक लिहिले. अलिगढ विद्यापीठाचा पाया घातला. आता इंग्रजांशी भांडण्याच्या लफड्यात पडण्यात हशिल नाही ....हिंदू हेच खरे शत्रू आहेत ... असं त्यांना मुस्लिमांच्या मनावर ठसवायचं होतं. अलिगढ विद्यापीठाच्या या संस्थापकाला राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे आमंत्रण होते. सय्यदांनी ते लाथाडले. -
त्यानंतर मौलाना मुहम्मद कासीम यांनी १८६६ साली दार उल उलूम देवबंद ची स्थापना केली. त्यानी सर सय्यद अहमदांचे चाक उलटे फिरवायला प्रयत्नांची पराकाष्ठा केली.ब्रिटीशांना विरोध केला. देवबंदी विद्वानांनी नेहमीच पाकिस्तानलाही विरोध केला. . सगळी पृथ्वीच अल्लाहची आहे. त्यात पाक (पवित्र) - नापाक (अपवित्र) असे काही नाही. पाकिस्तानच्या छोट्याशा तुकड्यावर समाधान का मानावे ? अखंड भारतातच इस्लाम पसरला पाहिजे असे देवबंदिंचे उच्च विचार होते- आजही आहेत.
 ( त्यांच्या ब्रिटिश विरोधामुळे आज त्यांना राष्ट्रवादी म्हणून ओळखले जाते. आणी पाकिस्तान विरोधामुळे सर्वधर्मसमभावी समजले जाते. )
दरम्यान १९०६ -७ साली नवाब वकार व मोहसिन उल मुल्क यांच्या पुढाकाराने मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. ह्याच लीगने पुढे भारताची फाळणी घडवली.

१८५७ ते १९०० सालापर्यंत भारतातल्या मुस्लिम जगतात विविध प्रश्न चर्चिले जात होते. पाकिस्तान कसा असावा ? अखंड भारतच इस्लाममय करावा का ? आधुनिक शिक्षण घ्यावे का पारंपारिक ?
हिंदू मुस्लिम एकता - सहजीवन या फालतू प्रश्नावर अथवा शक्यतेवर एकाही मुस्लिम विचारवंताने / राजकारण्याने आपली लेखणी झिजवली नव्हती. काळोख पसरला होता.

ह्या काळोखात १९०० साली एक तारा चमकून उठला आणी १९२७ साली फासावर लटकून शहीद झाला. अश्फाक उल्ला खान. उमदा कवी, देखणा पैलवान, हळवा शायर, सिद्धहस्त लेखक, तगडा क्रांतिकारक आणी सच्चा देशभक्त.







१. पंडित रामप्रसाद बिस्मिल अन अश्फाक उल्ला खान ची जिगरी दोस्ती

भगतसिंगांचे पूर्वसुरी, सशस्त्र क्रांतिकारकांचे हिरो, हिदुस्थान रिपब्लिकन आर्मी चे ह्रुदयसम्राट म्हणजे राम प्रसाद बिस्मिल. ते कडवे हिंदू आणी आर्यसमाजिस्ट होते.

महर्षी दयानंद सरस्वतींनी स्थापन केलेली आर्यसमाज ही तत्कालीन हिंदूंची एक सुधारणा चळवळ होती. वेदाला प्रमाण मानणारी. मूर्तीपूजेचा आणी पुरोहितशाहीचा निषेध करणारी आर्यसमाजी मंडळी जातीभेदाची कडवी विरोधक असत. अस्प्रुष्यता हा हिंदू धर्मावरचा डाग समजून तो पुसण्यासाठी प्रयत्नशील असत. राजर्षी शाहू महाराज आर्य समाजिस्ट होते. आर्य समाज घडवत असलेल्या आंतरजातीय विवाहां बद्दल डॉ. आंबेडकरांनीही कैक वेळा गौरवोद्गार काढले होते.

 पुढे  मुस्लीमांत तबलीग  चा जोर वाढू लागला. तब्लीगी मौलवी - हिंदूना इस्लाम मधे येण्याचे आवाहन करत असत; अन साम दाम दंड भेद वापरून धर्मांतर करत असत. त्याला उत्तर म्हणून आर्य समाजिस्टांनी शुद्धीकरणाची मोहीम चालवली. परधर्मात गेलेल्यांना मोठ्या प्रमाणावर हिंदू करून घेतले जाऊ लागले. ही संख्या हजारोत होती.रामप्रसाद या शुद्धीकरणाच्या चळवळीत अग्रेसर असत. शिवाय ते बिस्मिल या टोपणनावाने उर्दू शेरोशायरी लिहित. त्या काळी रामप्रसाद कडवे मुस्लिमद्वेष्टे होते.

अश्फाक चा मोठा भाउ राम प्रसादांचा वर्गमित्र होता. रामप्रसांदाचे ओघवते वक्तृत्व; त्यांची रसरशीत शायरी , दणकट व्यक्तित्व आणी जाज्वल्य देशप्रेम यांविषयी अश्फाक ऐकून होता. त्यांचा चाहता बनला होता. त्यांना भेटू पहात होता त्यांच्यात सामिल होउ पहात होता. पण अश्फाक मुसलमान असल्याने रामप्रसाद त्याला टाळत होते. पण अश्फाक चिकाटी सोडत नाही त्यांच्या ह्रुदयात जागा मिळवतो. आर्य समाज मंदिरात दोघांच्या गाठीभेटी सुरू होतात. रामप्रसाद अश्फाकला शुद्ध करून हिंदू करायचा अटोकाट प्रयत्न करतात. अश्फाक दाद देत नाही. पण रामप्रसाद ची पाठही सोडत नाही. एका जाहीर भाषणात रामप्रसाद बिस्मिल मात्रुभूमीसाठी गोर्‍या इंग्रजांना ठार मारण्याचे उघड आव्हान करतात. त्यासाठी स्वतः मेलो तरी बेहत्तर म्हणतात.

या बहरून उठलेल्या अंतकाळात (फना) वाहून जाउदे माझे प्रेत;
की भुक्या मासोळ्या शत्रूच्या तलवारी आहेत.

बहे बहरे-फना में जल्द या रब! लाश 'बिस्मिल' की।
कि भूखी मछलियाँ हैं जौहरे-शमशीर कातिल की।।"

"आमेन" अश्फाक ओरडतो. प्रत्युत्तरादाखल (शायरीची जुगलबंदी) म्हणतो - 

"कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है।
जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है।।"

भाषण झाल्यावर दोन्ही शायर मित्र भेटतात. रामप्रसाद अश्फाक ला म्हणतो - मैने पकडा तुम्हे - शायरी की जुगलबंदी तो ठीक है; लेकिन ये शायरी तुम्हारी खुद की ओरिजनल नही... अश्फाक हसत म्हणतो "ठिक आहे पंडितजी मान्य.. ही शायरी माझी नसून जिगर मोरादाबादीची आहे. .. पण ह्याच शायरीला तुम्ही असच पुढे वाढ्वून दाखवलं- ओरिजनली - तर मी तुम्हाला ऊर्दू शायरीचा सम्राट मानेन.... "

रामप्रसाद बिस्मिल च्या ओठातून शब्द बाहेर पडले -

"सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है।
देखना है जोर कितना बाजु ए कातिल में है?"

एका माहान क्रांतीगिताचा जन्म झाला होता. अश्फाक रामप्रसादला कडकडून मिठी मारतो. म्हणतो - उस्ताद राम तू उर्दू शायरीचा महासम्राट आहेस......आता हे काव्य.... . सार्‍या क्रांतिकारकांची भगवदगीता ठरणार असतं. एवढेच नव्हे तर त्या दोन मित्रांचं जिवनगीतही ठरणार असतं.

आर्य समाज मंदिरात राम प्रसाद बिस्मिल च्या बैठका चालत. इंग्रजी राज्य उलथून टाकण्याच्या योजना बनत. कट शिजत -

वक्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमां,
हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है ।
खींच कर लाई है सब को कत्ल होने की उम्मींद,
आशिकों का आज जमघट कूंचे-ऐ-कातिल में है ।

रामप्रसादची एकही बैठक अश्फाक चुकवत नसे. अश्फाक उल्ला खानने स्वतःचा नमाज चुकवला नाही की इस्लाम सोडला नाही. पण रामप्रसादचे म्हणणे पटून अथवा त्याच्या व्यक्तिमत्वाने भारून जाउन होणारे मुस्लिमांचे हिंदूकरण अश्फाक बिनविरोध पाहत असे. एखाद्याचा धर्म ही त्याची व्यक्तिगत बाब असल्याने अश्फाक च्या लेखी ह्या गोष्टी महत्वाच्या नव्हत्या. पण कडव्या वहाबी - तबलीगींना ; आर्य समाजाचे अस्तित्व संपवणे अत्यावश्यक वाटे. आर्य समाज मंदिरात अशीच एक बैठक चालली असताना मुस्लिम हल्ला बोल करतात. त्याना आर्य समाज नष्ट करायचाय. मुस्लिम जमाव चालून आत येतो. त्यांना थांबवायला पहिल्यांदा पुढे सरसावतो -अश्फाक उल्ला खान. आणी म्हणतो - माझ्या प्रेतावरून पुढे जा. ...त्याचे बलदंड शरीर; मुस्लिम समाजातला त्याच्या घराचा रुतवा आणी मुख्य म्हणजे त्याच्या हातातली बंदूक - याना तो मुस्लिम जमाव घाबरतो. पळ काढतो. 


रामप्रसादला हे कळताच त्याला गदगदून येते. आपण मुस्लिमांचे शुद्धीकरण का करतो ? त्यांनी राष्ट्रीय बनावे, आपली संस्क्रुती मानावी म्हणूनच ना ? मग अश्फाक सारखे जिते जागते राष्ट्र्प्रेमी मुस्लिमाचे उदाहरण समोर असताना. शुद्धीचे प्रयोजनच काय ? त्या दिवसानंतर राम प्रसाद बिस्मिल एकाही मुस्लिमाला शुद्ध करण्याचा भानगडीत पडला नाही. दोन्ही मित्र क्रांतिकार्याला वाहुन घेतात. आता ध्येय एकच स्वातंत्र्यासाठी मारता मारता मरेतो झुंजायचे -


दिल मे तूफानों की टोली और नसों में इन्कलाब।
होश दुश्मन के उडा देंगे हमे रोको न आज ॥
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंजिल मे है ।
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है ॥


रामप्रसाद नी अश्फाकला लहान भाउ मानलं. दोघे एका ताटात जेवत. एकत्र रहात. अन स्वप्ने पाहत. उद्याच्या भारताची. जिथे धार्मिक झगडे नसतील, शेतकरी - कामकर्यांना न्याय मिळेल. जाती पाती नष्ट होतील. असा अखंड भारत जिथे - मनुष्य मनुष्याचे शोषण करू शकत नाही



२. काकोरी कट :

हिदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन च्या शाखा गावोगाव पसरत चालल्या. मनुष्य मनुष्याचे शोषण करू शकत नाही. असा असोसिएशन चा जहिरनामा होता. कार्यासाठी पैसा अपूरा पडू लागला. अश्फाक म्हणाला - खजिन्यातला पैसा आपला. इंग्रजाच्या बापाचा नाही -

कहां गया वह कोहिनूर हीरा; गयी किधर मेरी दौलत है ।
वह सबका सब लूट करके हमी को डाकू बता रहे है ॥

इंग्रज सरकारचा खजीना लुटायचं ठरलं. काकोरी स्टेशन वर गाडी अडवायची. अन खजिना लुटायचा. टोळी जमली. अश्फाक दिसायला रुबाबदार म्हणून तो सेकंड क्लास मधे बसणार. चेन खेचून गाडी थांबवणार. मग जनरल क्लास मधे बसलेल्यांनी धाबा बोलायचा-- खजिन्याची पेटी मिळवायची -- फोडायची -- अन पसार व्हायच. या कानाचा त्या कानाला पत्ता लागू द्यायचा नाही. बंदुका जमल्या. क्रांतिकारी सुस्सज झाले. दिवस ठरला. रेल्वेत भारतीयच असतील. शक्यतो प्राणहानी टाळायची. पण इंग्रज नडला तर फोडायचा.जर्मन बनावटीची माउसर पिस्तुले वापरण्यात आली. 




 है लिये हथियार दुश्मन ताक मे बैठा उधर
और हम तैय्यार हैं सीना लिये अपना इधर
खून से खेलेंगे होली गर वतन मुश्किल में है
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है


अश्फाक नी चेन खेचली. गाडी थांबली. बंदुकीचे बार उडाले. खजिन्याची पेटी मिळाली. कुलुपावर हातोड्याचे घाव बसू लागले. घण् - घण् - घण् - घण्. कुलूप तुटेना. तगडा अश्फाक पुढे सरसावला. बंदूक टाकली. हतोडा उचलला.घण् - घण् . पेटी उघडली. खजिना मिळाला. पोबारा. सर्व क्रांतिकारक भूमिगत झाले. फरार झाले.






३. फरारी - अटक आणी कारागृह - 


काकोरी कटातले बहुसंख्य आरोपी पकडले गेले.रामप्रसादला अटक झाली. ब्रिटीश पोलिस एका अश्फाक उल्ला खान नावाच्या मुसलमानाला शोधत होते. तो एकच आरोपी काही केल्या मिळत न्हवता. साहेब वेशांतर करून बनारस हिंदू विद्यापिठात जाउन लपले. त्यानंतर शांतपणे बिहारमधल्या एका इंजिनिअरिंग फर्म मधे चिकटले. एक वर्ष अश्फाक पोलिसांना मिळाला नव्हता. तो व्यवस्थित नोकरी करत होता. पण एक पठाण मित्राच्या फितुरीने त्याला अटक झाली. त्याविषयी अश्फाक लिहितो -

न कोई इंग्लिश है न कोई जर्मन,
न कोई रशियन है न कोई तुर्की|
मिटाने वाले हैं अपने हिंदी,
जो आज हमको मिटा रहे हैं||

ब्रिटिशांनी तुरुंगात फेकले बेड्या घातल्या. खटला भरला. तुरुंगात तो बेड्या वाजवत - वाजवत मातृभूमीची आरती करत राहिला. तो लिहितो -


ऐ मात्रुभूमी तेरी सेवा किया करूंगा
मुश्किल हजार आये हर्गिज नही डरूंगा
तेरे लिये जियुंगा तेरे लिये मरूंगा
बेडी बजाबजाकर तेरा भजन करूंगा


ज्या तुरूंगात अश्फाक ला ठेवले होते तेथे त्याला एक सुप्रिडेंट ओफ पोलिस भेटायला आला. त्याच नाव होतं तसद्दुक हुसेन. . हुसेन म्हणाला " मी तुला माफीचा साक्षीदार बनवतो. जिव वचेल. फाशी माफ होईल"
दात ओठ खात अश्फाक उत्तरला -


मौत और ज़िन्दगी है दुनिया का सब तमाशा,
फरमान कृष्ण का था, अर्जुन को बीच रन में|
जिसने हिला दिया है दुनिया को एक पल मे
अफसोस...... क्यो नही है वह रूह अब वतन मे ?
( रूह - आत्मा)


पोरगं मरणाला भीत नाही हे पहून हुसेन दुसरा डाव खेळला. एक डाव रडीचा. धर्माच्या सौदेबाजीचा. हुसेन म्हणाला - " अश्फाक नीट विचार कर. तू एक मुसलमान आहेस. या देशात ७ करोड मुसलमान रहातात आणी २२ करोड हिंदू. गांधी लोकशाहीच्या बाता मारतो. या कफिर हिंदूंच्या नादी लागून तू ब्रिटिशांविरूद्ध लढतोयस. इंडीयातून ब्रिटीश निघून गेले तर ? २२ कोटी हिंदू लोकशाही मार्गानी हिंदू इंडीया बनवतील...." 
शांतपणे अश्फाक उत्तरला - " तू ज्या गोर्‍या मालकांनी फेकलेली हाडं चघळतोस त्यांना जाऊन सांग - या अश्फाकला ब्रिटिश इंडियापेक्षा हिंदू इंडीयाच जास्त प्रिय आहे"




केस कोर्टात उभी राहिली. जज्ज होते खान बहादुर ऐनुद्दीन. ते अश्फाकच्या नातेवाईकांच्या घनिष्ट संबंधातले होते. मुसलमान वकील करावा अशी गळ अश्फाकला घातली गेली. मग अश्फाक पेटला - हिंदूच वकील करणार म्हणून. त्याचा नातेवाईकांना सवाल होता. हिंदू - मुस्लिम ऐक्यासाठी आम्ही इथे मरायला तयार आहोत; आणी तुम्ही काय फलतूपणा चालवलाय ?

प्रत्यक्ष जज्ज कडून आलेली माफीची याचना त्याने साफ नाकारली. क्रुपाशंकर नावाच्या आर्य समाजिस्टाला वकील नेमले. त्यांनी अश्फाकच्या आठवणी लिहून ठेवल्यात. कृपाशंकर लिहितात - केसचा फैसला ऐकायला अश्फाक नटून थटून आला होता. तो आनंदी दिसत होता. क्रुपाशंकर म्हणाले - अफसोस तुला फाशीची शिक्षा झाली... अश्फाक उत्तरला - " अफसोस किस बात का ? हं एका गोष्टीचं दु:ख जरूर आहे... आम्ही आपापसात पैज लावली होती. की तुरुंगात मजबूत खादडायचं आणी वजन वाढवायच. त्या पैजेत मी पहिला नाही आलो. दुसरा आलो !"

भेटायला आलेले नातेवाइक रडारड करू लागले तेंव्हा अश्फाक घुश्श्यात बोलला - आज पहिला मुसलमान देशासाठी फासावर चढतोय आणी रडताय काय बावळटासरखे ?
पंडित रामप्रसाद बिस्मिल अन अश्फाक उल्ला खान ची जिगरी दोस्ती शेवटपर्यंत टिकली. दोघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.



४. पंडित रामप्रसाद बिस्मिल चे शेवटचे पत्र.

रामप्रसाद बिस्मिल हा एक विचारी ग्रुहस्थ. नव्या अनुभवातून शिकणारा. स्वतःला बदलणारा. हा उच्चवर्णात जन्मला. जातीपातीचा तिटकारा येवून आर्यसमाजिस्ट झाला. पुढे मुस्लिमांवर चिडून शुद्धीआंदोलनाचा नेता बनला. त्यानंतर अश्फाकच्या संगतीत राहून हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कर्ता बनला.त्याच्या फाशीच्या कोठडीत लिहिलेल्या अत्मकथेतून -






" हे माझ्या प्राणप्रिय सुर्‍हुदा ... अश्फाक ..मी प्रथम तुला मुसलमान म्हणून टाळले..मग तुला हिंदू करण्याचा .. शुद्ध करण्याचाही प्रयत्न केला.. पण हळूहळू माझ्या लक्षात येवू लागले की की तुझ्या ह्रुदयात थोडीही अशुद्धी नाही.. मग तुला शुद्ध काय म्हणून करायचे ? तुझ्या संगतीत माझ्या ह्रुदयातून हा विचारच निघून गेला की हिंदू आणी मुसलमान या काही वेगळ्या गोष्टी आहेत. मी हिंदीतून लेख लिहायचो तेंव्हा तू म्हणायचास ऊर्दूतून लिही.... ही देशभक्तीची अक्कल मुसलमानांच्याही टाळक्यात शिरू दे !


मी माझे जीवनकार्य पूर्ण केले आहे.मी सार्या भारताला मुस्लिमातून एक असा नवयुवक काढून दाखवला जो देशभक्तीच्या सार्‍या परिक्षात अव्वल आला आहे. मुसलमान विश्वासपात्र नाहीत असे म्हणण्याची आता कुणाची हिम्मत आहे काय ? हिंदू मुस्लिम एकता हीच आम्हा दोघांची अंतिम इच्छा आहे. हे माझ्या प्राणप्रिय सुर्‍हुदा ... अश्फाक ... मी रामप्रसाद बिस्मिल ज्याने आपल्या बापाचा पैसा राष्ट्रकार्यात फुकून टाकला अन आइ वडिलांना भिकारी बनवले.भावाचे भाग्य देशसेवेसाठी भेट दिले. तन मन धन देऊन आता फासावर लटकतो आहे. आता तर माझा सर्वप्रिय मित्र अश्फाकलाही मी मात्रुभूमीला भेट म्हणून देत आहे.तू केवळ शरीरानेच तगडा न्हवतास रे.. पण मनाने घट्ट अन अत्म्यानेही उच्च होतास. पण थांब....
मरते बिस्मिल रोशन लहरी अश्फाक अत्याचार से
होंगे पैदा सैकडो उनके रक्त की धार से "






5. अश्फाक के आखरी दिन

फाशीच्या काळकोठडीत अश्फाकने 'अश्फाक के आखरी दिन' या नावाचेआत्मचरित्र लिहिले. फाशीच्या आधी तीन दिवस ते लिहून संपवले मग उरलेला वेळ त्याने नमाजात घालवला. त्या आत्मचरित्राचे शेवटचे पान - 
"तबलिगवाल्यांनो आणी शुद्धीवाल्यांनो. डोळे उघडा. आपापसात धर्मावरून भांड्ण्यात काय अर्थ आहे ? तुम्ही गोर्यांचे गुलाम आहात. गुलामांना कुठला आलाय धर्म ? तुम्ही धर्मसुधारणा तरी काय करणार आहात ? गुलामाना कोण सुधारू देतो ?भांडणं पेरणारे तबलिगवाले ब्रिटीशांचे दलाल आहेत. एवढी साधी अक्कल तुम्हाला नसावी ? २२ कोटी हिंदूना मुसलमान करणे अशक्य आहे. सात कोटी मुसलमानाही हिंदू करने अशक्य आहे.... हा ... पण आपापसात भांडून गुलामीचे जू पाठीवर बाळगणे सहज शक्य आहे. 

हिंदूनो मुसलमानानो आणी कम्यौनिस्टानो एक व्हा. नही तो सारे हिंदोस्तान की बदवख्ती का वार तुम्हारे गर्दनोंपर है और गुलामी का वायस तुम हो.

कम्युनिस्टाना माझी विनंती आहे की (रशिया) परदेशी मेकअप उतरवा, अन अस्स्ल भारतीय पोशाख परिधान करा. टाय कोट वाले नेते भारताला नकोत. असली रंगात या - आणी देशासाठी मरा. तुमच्या काही गोष्टी मात्र मला मनापासून पटतात. शेतकरी, कामकरी, मागासलेले आणी शोषित यांचे भले झाले पाहिजे. आम्ही आज मरू मरणाला भितो कोण ?


हाथ जिनमें हो जुनून कटते नही तलवार से
सर जो उठ जाते हैं वो झुकते नहीं ललकार से
और भडकेगा जो शोला सा हमारे दिल में है
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

हम तो घर से निकले ही थे बांधकर सर पे कफ़न
जान हथेली में लिये लो बढ चले हैं ये कदम
जिंदगी तो अपनी मेहमान मौत की महफ़िल मैं है
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है


पण आम्ही एक स्वप्न पाहिले होते ......आपल्या शहरांची चमकधमक ज्यांच्यामुळे आहे. आपले कारखाने ज्यांमुळे चालू आहेत. ज्यांचे हात आपल्यासाठी पाणी उपसतात.मुसळधार पावसात आणी तळपत्या उन्हात जे आपल्यासाठी  अन्न तयार करतात. त्यांच्या भल्याचे स्वप्न आम्ही पाहिले होते. मनुष्य मनुष्याचे शोषण करू शकत नाही अशा भारताचे स्वप्न आम्ही पाहिले होते. समतेचे स्वप्न पाहिले होते,,,,, एक स्व्प्न नवाब महमूदाबाद सारखी खुर्ची फाटक्या अब्दुल्ला मिस्त्रीलाही मिळेल आणी ... जगतनारायणांसारखी इज्जत धनिया चांभारालाही मिळेल.

माझ्या क्रांतिकारी बंधूंनो .. मी खुष आहे आनंदी आहे. फायरिंग लाइन वर हसत जाणार्‍या आणी खंदकात बसून गाणे म्हणणार्‍या सैनिकासारखाच ...
कारण मात्रुभूमीच्या चरणांवर रक्त सांडून हसत फाशी जाणारा मी पहिला मुसलमान आहे ............





६. अश्फाक की आखरी रात : - (त्याच्या जिवनावरचे काव्य)



"जाऊँगा खाली हाथ मगर ये दर्द साथ ही जायेगा,
जाने किस दिन हिन्दोस्तान आज़ाद वतन कहलायेगा?
बिस्मिल हिन्दू हैं कहते हैं "फिर आऊँगा,फिर आऊँगा,
फिर आकर के ऐ भारत माँ तुझको आज़ाद कराऊँगा".

जी करता है मैं भी कह दूँ पर मजहब से बंध जाता हूँ,
मैं मुसलमान हूँ पुनर्जन्म की बात नहीं कर पाता हूँ;
हाँ खुदा अगर मिल गया कहीं अपनी झोली फैला दूँगा, 
और जन्नत के बदले उससे यक पुनर्जन्म ही माँगूंगा."




*******************************************************************************************************
फुटका चश्मा

* अश्फाकचे अनेक सक्खे नातेवाईक फाळणीनंतर पाकिस्तान गेले
* एकही तथाकथित राष्ट्रीय मुसलमान अश्फाक च नाव घेत नाही
*बहुसंख्य हिंदूंना हे नावही माहित नाही
* सावरकरांनी रत्नागिरी वस्तव्यात "जनतेचा प्यारा अश्फाक" याच नावाने एक लेख लिहिला होता. पण राजापेक्षा राजनिष्ठ असलेल्या सावरकरभक्तानी त्यांचे समग्र वाङमय छापताना तो नेमका गाळला.
पंडित रामप्रसाद बिस्मिल अन अश्फाक उल्ला खान ची जिगरी दोस्ती आजही तशीच आहे. दोघांचही स्वप्न मात्र फुटलय..
अश्फाक मरेपर्यंत नमाजी मुसलमान होता. पण धर्मापेक्षा त्याला देश वरचढ वाटत होता. गोर गरिबांचे हित महत्वाचे वाटत होते...
हाच त्याचा गुन्हा होता. हिंदू मुस्लीम एकतेसाठी आम्हाला वहाबिंपुढे शेपूट हलवायचीय आणी तबलीगींचे तळवे चाटायचेत.. फक्त काँग्रेस नाही.. संघाच्या सर्व धर्म समादर मंचातही तीच डोकी दिसतात
हिंदूची एक घाणेरडी मानसिकता याच कारण आहे - सर्वधर्मसमभाव

सर्वधर्मसमभावचे खूळ सोडून आपण धर्मनिरपेक्षते कडे वाटचाल केली पाहिजे असे एक विचारवंत ओरडून ओरडून सांगत राहिला..... त्याच नाव -

हमीद दलवाई  - दलवाइंचे मुसलमान - त्यांच्या चष्म्यातून भाग पाच वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 


 - डॉ. अभिराम दीक्षित
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखमालेत भारतातील मुस्लिम राजकारणाचा रंजक वेध घेतला आहे. त्यासाठी काही देखणे  चरित्रनायक निवडले  आहेत .
त्यांच्या चशम्यातून ……

१) कुरुंदकरांचा अकबर : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_6.html 
२) 1857 चा (मोरेंचा ) जिहाद : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_8496.html
३) जनतेचा प्यारा अश्फाक : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_1247.html
४) मौलाना अबुल कलामांची आझादी : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post.html
५) हमीदचे मुसलमान : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post_15.html
६) मुकादमांचा इस्लाम : http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post.html
७) डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *