५ जाने, २०१८

(विज्ञान कथा ) 2050 AD एक गोष्ट सोडून...


वसूने डाव्या कोपराने जंतुनाशकाच्या च्या बाटलीचे बटण दाबले. ते निळे द्रावण उजव्या हातात घेतले. प्रथम दोन्ही हातांची बोटे चोळली मग तळहात. मागची बाजू. आधीच उघडून ठेवलेले निर्जंतुक ग्लोव्ह्ज चिमटीने उचलून हातांवर चढवले. अ‍ॅक्सेस कंट्रोल पाशी बुब्बुळ दाखवले. पहिला दरवाजा उघडला.

मग दुसरा दरवाजा उघडण्यासठी तिने पुन्हा अ‍ॅक्सेस कंट्रोल पाशी बुब्बुळ दाखवले. ती तिच्या कॅबिनेट मधे दाखल झाली. डॉ. वसुंधरा सुब्रमण्यम वय वर्षे ४३. अविवाहित. ती एम. बी. बी. एस. ला होती तेंव्हा तिच्या टप्पोर्‍या बोलक्या डोळ्यात भरपूर पोट्टी बुडाली होती. विजय त्यातलाच एक. ज्या डोळ्यात तो तासन तास हरवून जायचा त्याखाली आता काळी वर्तुळे येउ लागली होती. वसुने मेकअप चे सहाय्य कधीच घेतले नाही ती वर्तुळ लपवायला. विजयने परदेशी उच्च्शिक्षणासाठी त्याच्या प्रेमाचा त्याग केला; तेंव्हाच तिचा पुरुष जमातिवरचा विश्वास उडायला हवा होता. पण तस झाल नाही.

मायक्रोबायोलॉजि - एम डी च्या शेवटच्या वर्षाला होती ती... तेंव्हा एका देखण्या प्राध्यापकाच्या प्रेमात पडली. बाहुपाशात विसावली. मनालिच्या हवेचा कैफ अन केरळच्या समुद्राची नशा आकंठ प्यायली दोघ एकत्र. पण प्राध्यापक महाशय आणखी बर्‍याच विद्यार्थीनिंबरोबर भारत दर्शन करून आले होते. अन त्यांचा प्रवासी बाणा मोठा चिवट होता. तेही जहाज एका दुसर्‍या बंदराला लागलं. वसू रडली नाही त्यादिवशी. नंतर कधीच रडली नाही ती.




अमेरिकेतल्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतून पी एच डी पूर्ण केलं आणी तिथेच रिसर्च असिस्टंट म्हणून काम करू लागली. जिद्दीच्या, कष्टाच्या आणी अंगभूत हुषारीच्या जोरावर अतिशय कमी वेळात तिथल्या मयक्रोबायोलॉजी विभागाची प्रमुख बनली ती. तेही एव्हढ्या कमी वयात .... ४३ म्हणजे कमीच वय हो त्या पोस्ट साठी.


वसून आत पाउल टाकताच डॉ जॉन तिच्याकडे पहात मान हलवता झाला. हसायची सोय न्हवती कारण बायोहजार्ड चेंबरमधे तोंडावर मास्क घालून बसला होता तो. आता मास्क च्या आड हसलं काय ? किंवा जिभ दाखवून वेडावल काय ? दिसणार कसं समोरच्याला ? पण वसू कधीच हसण्याला प्रतिसाद द्यायची नाही. चेंबरबाहेरही नाही. कोणाच्याच नाही.


वसू ची एक ज्युनियर अमेरिकन मुलगी हॉस्पिटल मधून आलेली सँपल्स चेक करत होती. युरिन, स्टूल, स्पुटम ची रूटीन सँपल तिन बाजुला काढली. टीबी ची , एंडोस्कोपी करून काढलेली वगैरे स्पेशलाइस्ड सँपल्स वेगळी केली. अत्ता मुद्दा असा की. युरिन इंन्फेक्षन झालय म्हणजे कुठल्यातरी जंतूचा संसर्ग झालाय. पण कोणत्या जंतूचा ? ते कस ओळखणार ? त्यासाठी ते सँपल एका क्ल्चर प्लेट वर लावायच ती ३७ डिग्री सेल्सियसला उबवायची. त्या क्ल्चर प्लेट मधलं अन्न खाउन जंतू वाढतात. आणी सुरेख अशा कॉलोन्या बनतात त्यांच्या.






त्या कॉलोन्यांचे गुणधर्म प्रत्येक जंतुसाठी वेगवेगळे असतात. म्हणजे प्स्यूडोमोनास ह्या बॅक्टेरियाची कॉलोनी हिरवी असते. इ कोलाय नावाच्या जंतूची कॉलोनी लाल रंगाची बनते. तर कोणी रेअर जिवाणू निळ्या जाभळ्या कोलोन्या बनवतो.

कॉलोन्यांच्या रंगावरून, त्यांच्या रासायनिक गुणधर्मावरून, आणी मायक्रोस्कोपखाली त्या जंतूचे निरिक्षण करून त्याची बिनचुक प्रजात ओळखता येते.

त्या जंतूंची प्रजात ओळखण आता फारच महत्वाच बनत चालल होत. कारण अँटीबायोटीक्सना (प्रतिजैविक औषधे) हे रोगजंतू प्रतिकारशक्ती डेव्हलप करू लागले होते. प्रत्येक प्रजातीसाठी वेगळं अँटीबायोटीक् आवश्यक बनलं होतं. त्यामुळे जंतूची प्रजाती ओळखण हे औषधोपचारासाठी अतिशय आवश्यक बनल होतं. आणी वसू या शास्त्रातल्या सर्वश्रेश्ठ तज्ञांपैकी एक होती.

ती काम करायची जीव तोडून, विद्यार्थ्यांना शिकवायची जीव तोडून, पण जीव कोणालाही लावत न्हवती. बॅक्टेरियांच्या कॉलन्यात रमत होती. पण मनुश्याच्या कॉलन्यातून - समाजातून तिचा जिव उठला होता.
तिन सगळ्यांसाठीच रेसिस्टन्स तयार केला होता.
एक गोष्ट सोडून...
लाइफबुक - सोशल मीडिया 

सोशल मीडिया आता जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता . नोकरी देताना किंवा महाविद्यालयात प्रवेश मिळवण्या साठी सुद्धा सोशल मीडियावरची लोकप्रियता जमेस धरली जाते . सोशल मीडियापासून दूर  राहणं अशक्यच होतं . वसूचा जीव माणसांच्या कॉलन्यातून उठला होता . बॅक्टेरियांच्या कॉलन्यात रमत असताना मानवी समाजाशी संबंधाचा  एकच तंतू शिल्लक होता . सोशल मीडिया . 

२०४० साली फेसबुक बंद  झाले . त्यानंतर लाइफबुक नावाची स्वतंत्र प्रणाली अस्तित्वात आली . फेसबुक,  गुगल , व्यावसायिक लिंक्ड इन , व्हॅट्स एप , इंस्टाग्राम , कौटुंबिक फॅमिली इन , शैक्षणिक स्टेड या साऱ्या सोशल मीडिया कंपन्यांनी एक होऊन लाइफबुक नावाची नवीन सोशल मीडिया साईट सुरु केली होती . मनोरंजन , लेखन ,पत्रकारिता ,  शिक्षण , नोकरी आदी सर्वांसाठी लाइफबुक हा मानवी जीवनाचा आधार बनला आहे . काही कंपन्या नोकरी देताना सोशल मीडियावरील लोकप्रियतेचा आढावा घेत आहेत ..

नोकरीसाठी नाही पण .. वसुंधरा माणसांच्या कॉलनीशी फटकून होती म्हणून तिने लाइफबुक ला आधार बनवले होते . " विजया " अशा खोट्या नावाने ती फेक अकाउंट चालवत असे. आणि कामा शिवायचा सारा वेळ लाइफबुक वर घालवत असे . हळूहळू तिला लाइफबुक शिवाय चैन पडेना . जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लाइफबुक . पुढे लाइफबुक साठी कामातून वेळ काढू लागली .

अशीच एकदा ती लाइफबुक मध्ये दंग असताना मोबाईल खणाणला ... फोन वॊशिंग्टन हुन होता . अमेरिकेच्या आरोग्य मंत्र्यानी तातडीची मिटिंग बोलावली होती . जंतुशास्त्र - मायक्रोबायोलॉजी मधले देशभरातले शास्त्रज्ञ  बोलावून घेतले होते . लाइफबुक वरची विजया बंद झाली आणि मायक्रोबायॉलॉजिस्ट डॉ वसुंधरा भानावर आल्या .

अमेरिकेच्या आरोग्य मंत्र्यानी प्रत्यक्ष मिटिंग बोलावणे म्हणजे काहीतरी भयंकर असणार हे उघड होतं . प्रत्यक्ष भेटी जवळ जवळ कालबाह्य झाल्या आहेत . व्हिडियो कॉन्फरन्सिंग वर बोलता येणार नाही, इतके गुप्त आणि अतिमहत्त्वाचे असल्याशिवाय का फोन आला ?

वसुच्या मनात काळोख दाटला (कदाचित) तिने मागच्या महिन्यात वर्तवलेला अंदाज खरा ठरला होता ? आणि दक्षिण आफ्रिकेतल्या कुठल्यातरी  शिल्लक जंगलात नार्ड व्हायरस चा जन्म झाला होता ? स्वतःच भाकीत खर ठरल्याचे भयंकर दु:ख वैज्ञानिकाला सहसा होत नाही . पण हि केस वेगळी होती ..

नार्ड व्हायरस हे डॉ वसुंधरा सुब्रमण्यम यांचेच वैचारिक अपत्य होय. कळलाव्या नारदावरून हे नाव सुचले असावे ! बॅक्टेरिया आणि व्हायरस हे दोन अतिशय वेगळे सूक्ष्म जीव आहेत . बॅक्टेरिया - जिवाणू हा सूक्ष्मजीव म्हटला तर व्हायरस हा अतिसूक्ष्म जीव आहे . व्हायरस चा आकार बॅक्टेरिया हुन अनेक पटीने लहान असतो . व्हायरस इतका लहान असतो कि मायक्रोस्कोप खाली जिवाणू दिसतात पण विषाणू दिसू शकत नाहीत . व्हायरस च्या तपासा साठी डी.एन.ए. अनालिसिस वर अवलंबून रहावे लागते.




हिरव्या रंगाची ब्याक्टेरिया पेशी आणि त्यावर बाहेरून हल्ला करणारे पिवळे व्हायरस 

गणित - उत्क्रान्तिशास्त्र आणि जीवशास्त्र यांचे दाखले देत वसूने नुकतेच काही प्रबंध सादर केले होते.  त्यात तिने असे सिद्ध केले होते कि व्हायरस च्या सध्याच्या प्राजातीमधले अनुवांशिक बदल धोक्याची घंटा वाजवत आहेत . एका नव्या व्हायरस चा जन्म होतो आहे. हा व्हायरस माणसाला अपाय करणारा नाही . जीवाणूंना संसर्ग करणारा हा व्हायरस आहे . पण त्यामुळेच मानव जातीचे भविष्य धोक्यात येऊ शकते . 

जिवाणू आणि विषाणू (व्हायरस) हे दोघेही माणसाला संसर्ग करतात हे आपल्याला माहीत आहे . पण काही व्हायरस असे असतात कि ते फक्त जीवाणूंना संसर्ग करतात . माणसाला नाही . २०५० साली सर्व जिवाणू म्हणजेच बॅक्टेरियानी अनेक अँटीबायोटीक्स औषधाना रेसिस्टन्स म्हणजेच प्रतिकारशक्ती  तयार केलेली  आहे . त्यामुळे प्रत्येक जिवाणूसाठी एक औषध राखीव ठेवण्यात आलेले आहे . हा जो कळलाव्या नार्ड व्हायरस आहे त्याची गोम इथेच आहे. 

नार्ड व्हायरस फक्त जीवाणूंना संसर्ग करतो . त्याला ब्याक्टेरियोफेज असेही  म्हणतात . Bacteriophage म्हणजे जिवाणूभक्षक विषाणू . जिवाणूला व्हायरल इन्फेक्शन कसे होते ? हे मोठे मनोरंजक आहे .  व्हायरस हा एकपेशीय जीव सुद्धा नाही . त्यापेक्षाही निम्नस्तरीय आहे .व्हायरस म्हणजे फक्त डीएनए किंवा आरएनए असतो .तो दुसऱ्या पेशीत प्रवेश करतो आणि स्वतःचा डीएनए त्या पेशीत मिसळवून टाकतो . स्वतःच्या असंख्य कॉप्या तयार करतो - शेवटी पेशी फुटते .... आणि त्यातून असंख्य व्हायरस पिल्ले बाहेर पडतात ... जी पुढच्या पेशींवर हल्ला करायला तयार असतात .







बॅक्टेरिया- जिवाणू हा एकपेशीय जीव आहे . नार्ड व्हायरस फक्त जीवाणूंना संसर्ग करतो . जिवाणू फोडून बाहेर पडताना त्याची पिल्ले रिकाम्या हाती बाहेर पडत नाहीत . त्या जिवाणूंच्या डीएनए मधली प्रतिकारशक्ती घेऊन बाहेर पडतात . स्वतः:च्या शेपटीला जोडलेले हे जीन्स नव्या ब्याक्टेरिया ला देतात . परिणाम भयंकर आहे . 

जीवाणूंना नवी प्रतिकारशक्ती हा व्हायरस पुरवतो आहे . जीवाणूंना नवी अक्कल मिळाली तर हळूहळू सर्व अँटीबायोटीक्स औषधाना रेसिस्टन्स म्हणजेच प्रतिकारशक्ती निर्माण होणार आहे . गणित - उत्क्रान्तिशास्त्र आणि जीवशास्त्र यांचे दाखले देत वसूने नेमके हेच सिद्ध केले आहे . 

टँक्सी एयरपोर्ट जवळ आली तशी वसू भानावर आली . एयरपोर्टवर पोचण्या आधी तिने चटकन मोबाईल बाहेर काढला आणि लाइफबुक वरचे विजया चे अकाउंट उघडले . वाईट भीतीदायक आणि निराशाजनक विचारांचे मोहोळ उठले की डॉ वसुंधरा सुब्रमण्यम -  विजया बनत असत आणि लाइफबुक च्या सोशल मीडियावर रमत असत. 

अकाउंट उघडताच तिला धक्का बसला . विजय दिसला . हो तोच देखणा विजय त्याच्या बाहुपाशात संगीत होते . नजरेत काव्य होते आणि श्वासात नृत्य होते . त्याची म्हणूनच तर वसूने विजया हे टोपण नाव सोशल मीडियावर धारण केले होते . विजय कसा दिसला ? पीपल यु नो ? तुम्ही यांना ओळखता ? ह्या सदरात विजय कसा दिसला ?

एकतर वसूचे अकाउंट फेक  होते .  तिने कटाक्षाने जुने मित्र मैत्रिणी या अकाउंट ला घेतले नव्हते . स्वतःचे खरे शिक्षण नाव गाव सारे लपवले होते .  विजय कसा दिसला ? ह्या विचारात गर्क असताना ती चालत होती . तिकीट काढले . सेक्युरिटी पार केली विमानात बसली . मोबाईल बंद केला तशी विजया बंद झाली . डॉ वसुंधरा सुब्रमण्यम जाग्या झाल्या . आणि त्याच क्षणी वसुच्या डोक्यात विचार कडाडला . विजा चमकाव्यात तसा प्रकाश दिसला . 

सोशल मीडियावर आपण किती लोकांना ओळखतो . ओळखतो म्हणजे काय असते . संवाद साधतो म्हणजे काय असते ? हि एक माहितीची देवाण घेवाण असते . नार्ड व्हायरस नेमके काय करतो आहे ? माहितीची देवाण घेवाण करतो आहे . काळ्या अंधाऱ्या खोलीत  काडी पेटावी आणि सारे लक्ख दिसू लागावे तसे वसूचे झाले .. तिला नार्डचा हेतू समजला ...  नार्ड म्हणजे रोगजंतूंचा सर्वव्यापी सोशल मीडिया . जिवाणूंचे लाइफबुक ! नार्डमुळे जिवाणू मोठ्या प्रमाणावर माहितीची देवाण घेवाण करू शकतात.



सोशल मीडिया म्हणजे माणसांच्या महाजालात माहितीची देवाण घेवाण 


विमानतळावर धुवाधार पाऊस पडत होता. विजा कडाडत होत्या . रात्रीच्या अंधारात विमानाने उड्डाण केले . डॉ वसुंधरा सुब्रमण्यम डोळे मिटून सीटवर पहुडल्या होत्या . कुणाला वाटेल बाई झोपलीय पण वसूच्या डोक्यातले न्यूरॉन्स बाहेरच्या विजांहून  जास्त कडाडत होते . लिंक ला लिंक जुळत होती . माहिती तपासली जात होते . जुने संदर्भ आठवले जात होते . सांख्यिकी आकडेमोड सरकत होती . बाई विज्ञानाला एक कूटप्रश्न सोडवत होती . विमान अमेरिकेची राजधानी वॊशिंग्टन इथे उतरेपर्यंत वासूच्या डोक्यात अनेक शक्यता आणि त्यावरील उपायांचे विचार करून झाले होते.

वसू विमानातून उतरली. एका तंद्रीतच सर्व सोपस्कार आटपून बाहेर आली . तिच्या स्वागताला  आरोग्य विभागाचे महत्वाचे अधिकारी डॉ मायकेल स्मिथ आले होते . तो वसुला गेली दोन तीन वर्षे कामानिमित्ताने भेटत असे.

"हॅलो स्मिथ" - नेहमीच्या कोरडेपणाने वसू बोलली . पण स्मिथ मुळातला बडबडा आणि वाचाळ गृहस्थ. तिच्या कोरडेपणाला त्याने बिलकुल मनावर घेतले नाही . गाडीत बसताच स्वतःच्या अखंड हाय स्पीड बडबडीला सुरवात केली . वसूचा हाल हवाला विचारल्यावर " डुईंग ओके  / आय एम फाईन " या दोन चार शब्दापलीकडे उत्तर मिळत नसते हे त्याला सवयीने ठाऊक झाले होते. त्या भानगडीत तो पडलाच नाही . त्याने स्वतःचेच किस्से सांगायला सुरवात केली . त्याच्या मुलाचे फुटबॉल खेळताना हाड मोडले इथपासून सकाळीच बायकोशी कसा कचाकचा भांडलो इत्यादी विषयावर गडी बोलत राहिला . वसूला हे सारे नकोसे वाटे . या वात्रट माणसाची चहाटाळ बडबड तिच्या विचारप्रवाहात अडथळे आणत होती . वसू तिकडे येऊ घातलेल्या जागतिक संकटाची आकडेमोड करण्यात व्यग्र होती आणि स्मिथची गाडी बायकोपुढे सरकेना .

वसू उगीचच त्याला बरं वाटावं म्हणून तोंडाने हूं हूं म्हणत होती . पण तिला तो स्मिथ ऐकू येत न्हवता , दिसतसुद्धा  न्हवता . वसूच्या डोळ्यासमोर होते ते असंख्य सूक्ष्मजीव . जिवाणू - विषाणू आणि त्यांच्या माहितीची देवाणघेवाण . व्हायरस जिवाणू वर हल्ले करत होते. त्यांच्या पोटात शिरून डीएनए मधील माहिती चोरत होते. त्याच्या हजारो कॉप्या बनवून आपल्या पिल्लाना वाटत होते . पिल्ले हीच माहिती दुसऱ्या जीवाणूंना वाटणार होती . मग ते जिवाणू सुद्धा औषधाना प्रतिकारशक्ती तयार करणार होते . तिला मानवजातीच्या संहाराचे भविष्य दिसत होते . तिचा मेंदू विजेच्या वेगाने काम करत होता . कानांना झापडे लागली होती . तरीही स्मिथ च्या फालतू बडबडीतून दोन - चार  शब्द तिच्या चाणाक्ष मेंदूने टिपले . : लाइफबुक - फ्रेंड - अननोन

तिला आजच वर्च्युअली अननोन विजय लाइफबुक वर दिसला होता.

क्षणात ती जिवाणूंच्या विचाराच्या तंद्रीतून बाहेर आली. "काय म्हणालास स्मिथ ?" तिच्या प्रश्नाने स्मिथ खुश झाला . चला म्हणजे ही ऐकत होती तर . मला वाटलं मी पुतळ्याशी बोलतोय ! " तास नाही रे - लाइफबुक अननोन फ्रेंड असे काहीतरी म्हटलंस ना ?" - वसू

पुन्हा पहिल्याच उत्साहात स्मिथ ने स्वतःच्या बायकोची रामकहाणी पुन्हा सांगायला आरंभ केला. तो पुन्हा अर्धा तास बडबडत होता.  त्या बडबडीचा थोडक्यात  सारांश असा की - स्मिथने बायकोची अक्कल काढल्याने भांडण झालं होत. स्मिथच्या बायकोला लाइफबुकवर  तिची शाळेतली जुनी मैत्रीण भेटली होती . बायको आश्चर्यचकित आणि खुश होती . यात आश्चर्य वाटण्या सारखे काहीच नाही असा स्मिथ चा हेका होता . गणित आणि संख्याशास्त्र या विषयात स्मिथ ची पीएचडी होती . आरोग्य विभागात डीएनए विषयक प्रचंड आकडेवारी आणि संख्याशास्त्र हाताळणारे जे डिपार्टमेंट असते त्याचा हेड होता . म्हणून बायकोची अक्कल काढायची काहीच गरज न्हवती . तर आपले संख्याशास्त्री मायकेल स्मिथ म्हणत होते की  बिगर ओळखीची माणसे सुद्धा एकमेकांशी सहा स्टेप मध्ये जुळलेली असतात . बिन ओळखीचा माणूस सुद्धा सोशल मीडियावर दिसतो . कधी कधी - पीपल यु नो ? या रकान्यात सुद्धा दिसतो . आफ्रिकेत राहाणारा एखादा अनोळखी व्यक्ती सोशल मीडियावर मित्राच्या मित्राचा मित्र असू शकतो . साधे संख्याशास्त्र गधड्या बाईला कळत नाही वगैरे वगैरे ..


आफ्रिकेत राहाणारा एखादा अनोळखी व्यक्ती - सोशल मीडियावर - मित्राच्या मित्राचा मित्र असू शकतो . 


वसूच्या कानांनी नेमके तिला पडलेले प्रश्न स्मिथच्या बडबडीतून फिल्टर केले होते. आपण खोट्या विजया या नावाने फेक अकाउंट काढलेले आहे . जुने मित्र मैत्रिणी फ्रेंड म्हणून घेतलेले नाहीत . मग आपला जुना प्रियकर " विजय " आपल्या फेक अकाउंटला दिसला कसा ? तेही पीपल यु नो मध्ये ?  तिने स्मिथ ला पुन्हा खोदून विचारले . " स्मिथ अननोन माणसे कशी दिसतात सोशल नेटवर्क वर ? तेही सांभाव्य मित्र म्हणून ? "

स्मिथ ने तिच्या कडे कारुण्यपूर्ण कटाक्ष टाकला . सर्व बायका गणितात गधड्या असतात असा स्पष्ट भाव त्याच्या चेहर्यावर वसूला वाचता आला . तिला या पुरुषी डुकरावर हसायला येत होते - तरी हसू दाबत ती उत्तराच्या अपेक्षेने स्मिथ कडे आपल्या टप्पोऱ्या डोळ्यातून वसू पहात होती .

लहान मुलाला समजावावे तश्या सुरात स्मिथ ने सुरवात केली . आपली ओळख दोन तीन वर्ष जुनी आहे. तू मला त्यापूर्वी ओळखत होतीस का ? " नाही "  हे वसूचे अपेक्षित उत्तर ऐकल्यावर स्मिथ च्या चेहर्यावर विजयाचे तेज पसरले . साफ चूक डॉ वसू - यू आर रॉंग . माणसांच्या महाजालात आपली एका अर्थाने ओळख होतीच . माझे बॉस व्हीनसन्ट ना तू अनेक वर्ष ओळखतेस बरोबर ? " हो ओळखते " म्हणजे आपली प्रत्यक्ष ओळख नसली तरी आपला एक कॉमन फ्रेंड होता . व्हिन्सेंट शी तुझी ओळख व्हायच्या आधी तुझ्या बॉस मार्फत अप्रत्यक्ष ओळख होतीच . म्हणजे त्या काळी आपल्या मध्ये दोन टप्प्याचे कॉमन फ्रेंड होते . बरोबर ? वसूचा कोरा चेहरा पाहून स्मिथ ने आपला तर्क पुढे वाढवला . आणि पटवून द्यायला दुसरे उदाहरण झाले . अमेरिकेचे माजी लोकप्रिय अध्यक्ष बराक ओबामा यांचे नुकतेच निधन झाले होते. तोच धागा पकडत स्मिथ ने वसूला पुढचा प्रश्न विचारला - " तू बराक ओबामांना ओळखतेस ? तिच्या उत्तराची वाट न पाहता त्यानेच उत्तर फोडले यस - तू ओळखतेस . अप्रत्यक्षरीत्या ओळखतेस . इतकंच काय तर पृथ्वीवरील कोणताही व्यक्ती बराक ओबामांना अप्रत्यक्षरीत्या ओळखतोच . हे मी गणिताने सिद्ध करू शकतो - असे म्हणताना स्मिथ चे डोळे लकाकत होते .




होय - बराक ओबामांना तुम्ही अप्रत्यक्ष रित्या ओळखता , आणि अरनॉल्ड ला सुद्धा !
मित्राचा मित्र मित्राचा मित्र असे करत तुमची बराक ओबामांशी ओळख निघू शकते . बरोबर ? आपल्या प्रष्णांची उत्तरे मिळेपर्यंत स्मिथ वाट पहात नसे. स्वतः:च उत्तर देऊन पुढचा प्रश्न विचारत असे . दोन वर्षांपूर्वी माझा बॉस हा आपला कॉमन फ्रेंड होता म्हणजे आपल्यात एका फळीचे अंतर होते डॉ वसू ! त्यापूर्वी आपल्या ओळखीस कदाचित दोन टप्पे असतील - त्यापूर्वी तीन ... बरोबर ? अगदी अगदी बरोबर - पण मी छातीठोकपणे पणे सांगतो की तुझी आणि ओबामाची  अप्रत्यक्ष ओळख शोधण्यासाठी सहा टप्पे लागतील . कदाचित कमीच पण जास्त नाही . वसूला स्मिथचे म्हणणे समजत होते पण पटत न्हवते . तिचा प्रश्नार्थक चेहरा पाहून स्मिथने आपले गणिताचे घोडे पुढे दामटले. गणित म्हणजे कागदी आकडे नाहीत डॉ वसू . गणिताच्या चष्म्याने पहा - सारे जग स्पष्ट होते ... सगळी कारण मीमांसा कार्य कारण भाव - सारा मेट्रिक्स स्पष्ट दिसू लागतो.






कोणताही माणूस कमीत कमी  चाळीस ते पन्नास लोकांना छानपैकी जवळून ओळखत असतो . आपले १५- २० नातेवाईक , दहा मित्रमैत्रिणी आणि दहा पंधरा व्यावसायिक ओळखी तर असतातच . आधुनिक शहरी माणसे खरे तर त्याहून जास्त लोकांना ओळखतात - पण आपण कमीत कमी आकडा घेऊ . समजू सर्वसाधारण माणूस सहसा चाळीस ते पन्नास लोकांना ओळखतो. त्याचा एव्हरेज आला ४५. या पंचेचाळीस ओळखीच्या लोकांपैकी प्रत्येक जणांच्या किमान ४५ ओळखी असणार आहेत . ज्यांना ते जवळून ओळखतात पण आपण फारसे ओळखत नाही . आपल्या जवळच्या ओळखीच्यांची जवळची माणसे किती ? आपले ओळखीचे पंचेचाळीस गुणिले प्रत्येकाचे वेगळी ओळख असलेले पंचेचाळीस . ४५ X ४५ =  २०२५ . इतक्या लोकांना आपण पहिल्या टप्प्यात ओळखत असतो . भूमितीय वाढ हे प्रचंड आकडे असतात वसू ! तुझ्या आणि बराक ओबामाच्या ओळखीत फक्त सहा टप्पे आहेत असे मी म्हटलो ते म्हणूनच . सहा वेळा ४५ ला ४५ ने गुणायचे . पंचेचाळीस चा सहावा घात  होतो . ४५^ ६ = 8303765625 . आठ अब्ज !

पृथ्वीची लोकसंख्या किती  ? या प्रष्णाच्या उत्तरासाठी मात्र स्मिथ थांबला. वसू थोडेसे आठवत म्हणाली- " साधारण असेल आठ नउ अब्ज ."  एक्सयाटली ! यु आर राईट वसू . प्रत्येकाच्या विभिन्न ओळखीची ४५ माणसे पकडली तर सहा टप्प्यात आपण जगाचीच लोकसंख्या कव्हर केली आहे. त्यामुळे कोणीही माणूस अमेरिकन प्रेसिडेंट ला सहा टप्प्यात ओळखणारच आहे ! म्हणून मी म्हणतो गणित ही जगातली सगळ्यात सूंदर स्त्री आहे.

 " बायकोसमोर असं काहीतरी बोलतोस आणि मग मार खातोस " हसत हसत वसू बोलली .

ती खूप दिवसांनी हसली होती .

तिच्या मेंदूंत काहीतरी ग्रेट सापडल्याच्या तारा झंकारल्या होत्या . नेमकं काय ते डिफाइन होत न्हवत . स्मिथच्या बडबडीत ते शक्यही न्हवत . तोपर्यंत त्यांची गाडी मिटींगच्या ठिकाणीपर्यत पोचली होती .  तिथे उभे असलेले बंदूकधारी सैनिक पाहून वसुला थोडासा धक्का बसला . आरोग्य मंत्र्याला इतके सैनिक? गेस मीस्टर  प्रेसिडेंट इज ऑलरेडी देअर . या स्मिथच्या वाक्याने मात्र तिचे शन्का निरसन झाले . आता हा प्रेसिडेंट कशाला तडमडला इथे ? असा विचार करत वसू बैठकीच्या खोलीत शिरली.






वसूला या युद्धखोर प्रेसिडेंट बद्दल मनस्वी चीड होती. कुठे चीनवर बॉम्ब टाक , आफ्रिकेत हल्ले कर यावर करोडो डॉलर चा खुरदा उधळण्यापेक्षा तेच पैसे विज्ञानाच्या मूलभूत संशोधनाकडे का वर्ग करू नयेत ? असा तिचा रोकडा प्रश्न असे . मिटिंग सुरु झाली होती आणि या विज्ञान विषयक बैठकीचे अध्यक्ष साक्षात प्रेसिडेंट होते . वसूला आनंदच झाला. बाबा सुधारला वाटतं ! वसुला बैठकीत काय होणार याचा अंदाज होता . एक गोष्ट सोडून . ...

आरोग्य मंत्री नैरोबी शहराची माहिती सांगत होते. नैरोबी ही दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकेतील केनिया नावाच्या गरीब देशाची राजधानी . त्याची राजकीय चर्चा करण्याचे कारण हळूहळू उलगडत गेले. डॉ वसुंधरा सुब्रमण्यम यांनी वर्तवलेले भविष्य खरे ठरले होते. नॉर्ड व्हायरस चा जन्म झाला होता . नैरोबी शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरला होता . तेथील जिवाणू शाहणे होत होते आणि एकही अँटिबायोटिक काम करत न्हवते . वेगवेगळ्या रोगांच्या साथी झपाट्याने पसरत होत्या . निम्मी लोकसंख्या साथीच्या रोगांनी आजारी होती . शेकडा दहा लोकांनी मृत्यूला कंटाळले होते . रोगांच्या अनामिक भीतीने जनजीवन विस्कळीत झाले . कायदा सुव्यवस्थेचा संपूर्ण बोऱ्या वाजला होता . लूटमार दंगलींनी थैमान घातले होते . त्याची राजकीय ब्रेकिंग न्यूज बरेच दिवस चालू होती . पण या दंगलींचे कारण राजकीय नाही - वैद्यकीय आहे - हे मात्र बेमालूमपणे लपवण्यात आले होते. अमेरिकन सैन्याने जाऊन संपूर्ण शहराला वेढा घातला होता . शहर क्वारनटाईन केले होते . क्वारनटाईन म्हणजे साथीच्या रोगाचा प्रसार बंद करायला आतील माणसांना कोंडून ठेवायचे आणि बाहेरील लोकांना आत जाऊ द्यायचे नाही . त्यामुळे शहरात वैद्यकीय मदत सुद्धा पोचत न्हवती .

अमेरिकेत साथ येऊ नये . आपल्या देशात नॉर्ड व्हायरस पसरू नयेत म्हणून ही तातडीची मिंटिंग बोलावण्यात आली होती. तर एकूण योजना अशी होती की जर नैरोबी शहर बॉम्ब टाकून संपूर्ण नष्ट केले तर . तर हे साथीचे रोग काबूत येतील का ? वसूच्या डोक्यात संतापाची तिडीक गेली . या मुर्खांना कसं समजवावं ? भावनांना आवर घालत डॉ वसू शांतपणे बोलू लागली. - " मिस्टर प्रेसिडेंट बॉम्बनी माणसं मरतात - जिवाणू नाही . विषाणू तर नाहीच नाही . तिथल्या पाण्यात जनावरात हवेत सर्वत्र ते असतील . कधीही बाहेर येतीलच . माणसं मारली तरीही. " प्रेसिडेंटच्या पुढच्या वाक्याने मात्र वसुच्या पायाखालची जमीन सरकली .

" इन द इंटरेस्ट ऑफ अमेरिकन पीपल . वी आर गोइंग फॉर फ्युजन व्हेपन्स "

दुसऱ्या महायुद्धात वापरेल्या अणुबॉम्ब पेक्षा भयंकर असे हायड्रोजन बॉम्ब वापरायची चर्चा चालू होती. फ्युजन रिएक्शन म्हणजे सूर्यासारखी न्यूक्लिअर रिएक्शन पृथ्वीवर चालू करणारा बॉम्ब टाकायचा.  असले बॉम्ब या आधी कधीही वापरले गेले न्हवते २०२३ च्या भारत पाक युद्धात सुद्धा नाही . याचे भयंकर परिणाम काय होतील याचा कोणालाच नीट अंदाज न्हवता . पण ही युद्धखोर माणसे - साथीच्या रोगावर तो वापरत होती . या बॉम्बने माणसं नव्हे तर व्हायरस सुद्धा मरतील हे सत्यच होतं .

या साथी जगभर पसरल्या तर सारी मानवजात धोक्यात येईल हे वसुला समजत होतं . पण म्हणून बॉम्ब ? त्या बैठकीत काहीही बोलायची परवानगी वसुला मिळाली नाही . उलट तिला असे आदेश मिळाले की , स्मिथ आणि अजून एक न्यूक्लिअर फिजिसिस्ट बरोबर काम करून २४ तासात अहवाल दे . या अस्त्राचा उपयोग केला तर रोगांच्या साथी आटोक्यात येतील काय ?  उद्या बरोब्बर याच वेळी संध्याकाळी ४ वाजता अहवाल सादर करा . त्याच बैठकीत निर्णय होईल . सभा तहकूब .

सुरक्षेच्या कारणास्तव तिन्ही शास्त्रज्ञाना २४ तास आरोग्य मंत्र्याच्या ऑफिस मध्येच राहायचे होते . आणि बहुदा सरकारच्या सुक्षेसाठी त्याचा बाहेरच्या जगाशी संपर्कही तोडण्यात आला होता ...... 

दिवस दुसरा : सायंकाळी ४ वाजता 


वसू शांतपणे बोलायला उभी राहिली . ती अहवाल सादर करत होती ... 

" मिस्टर प्रेसिडेंट एक हायड्रोजन बॉम्ब इथे वॊशिंग्टन वर पण टाकायला पाहिजे. चाचपू नका ! माझं बोलणं नीट लक्ष देऊन ऐका . तुम्हाला पटेल .. नैरोबीतले रोग ही साथ नाही . नॉर्ड व्हायरस हा खरा साथीचा रोग आहे . तो अमेरिकेत कधीच पोचला आहे किंवा पोचणार आहे.  नॉर्ड व्हायरस  म्हणजे काय ? ते आधी समजून घ्या . एका सोप्या उदाहरणाने स्पष्ट करते मिस्टर प्रेसिडेंट . 

नॉर्ड ला उपमा - जिवाणूंचा  सोशल मीडिया अशी आहे . सोशल मीडियात ज्याप्रमाणे माणसांच्या महाजालात माहितीची देवाण घेवाण चालू असते . नेमकी तशीच माहितीची देवाण घेवाण नॉर्ड करत असतो . एका जिवाणूंकडून दुसर्या जिवाणूकडे अतिशय वेगाने तो माहिती पोचवतो . ही कसली माहिती आहे ? औषधाशी कसं लढायचं याची ती माहिती आहे . साथीचे रोग पसरत आहेत याच कारण नॉर्ड ने औषधे निकामी ठरवली आहेत. 

सर्व कमिटी मेंबरच्या स्क्रीन वर आत्ता डॉ स्मिथ चे प्रेसेंटेशन मी दाखवते आहे . कुठल्याही सोशल नेटवर्क मध्ये एक व्यक्ती दुसर्यापासून फक्त सहा स्टेप दूर असते . स्मिथ ने त्याचे सारे गणित मांडले आहे .  जे माणसाबाबत खरे आहे . तेच जिवाणू - ब्याक्टेरिया बाबत सुद्धा खरे आहे . 




गेले काही महिने नैरोबीत ही साथ सुरु आहे असे आपण कालच म्हणाला होता . इतके दिवस चालू असलेला मानवी प्रवास . जिवाणूंचे जनरेशन यावरून हे सहज सिद्ध करता येते की तो व्हायरस अमेरिकेत आत्ताच पोचलेला आहे. त्याचे सविस्तर गणित स्मिथ ले लिहिलेले आहे . मिस्टर प्रेसिडेंट फक्त सहा स्टेप . मी आणि तुम्ही आजपर्यंत एकमेकाला ओळखत होतो का ? यापुढे मात्र तुम्ही मला कधीच विसरणार नाही ! कारण आपल्याच  देशावर  बॉम्ब टाकायचा अहवाल सादर करणारी स्त्री तुम्ही जन्मात  विसरू शकता काय ? तुमच्यात आणि माझ्यात आधी फक्त एका स्टेपच अंतर होत . आरोग्य मंत्री आपल्या दोघांनाही ओळखत असत. आता ते अंतर मिटलं . ब्याक्टेरियाच्या सोशल नेटवर्क नुसार नैरोबी आणि वॊशिंग्टन मध्ये सुद्धा फक्त सहा स्टेप आहेत . स्मिथ च्या गणिता नुसार नॉर्ड अमेरिकेत पोचला आहे . सविस्तर डिटेल पुढच्या स्लाईडवर .... " 


दिवस तिसरा : स्मिथ चे घर 

रेड  वाईन , स्विस चीज , मधातली टर्की , बडबड्या स्मिथ आणि त्याची भोंदू बायको. या सगळ्यांबरोबर वसूची मस्त मजा सुरु आहे . वसुंधरा माणसाच्या नेटवर्क मध्ये रमली आहे . मस्त खळखळून हसते आहे ....

कालच  वसू आणि स्मिथ या दोघांनी मिळून अमेरिकन सरकारला मस्तपैकी टोपी घातली आहे. माणसाचे आयुष्य जवळ जवळ ऐंशी वर्षाचे असते त्यात त्याला अनेक ओळखी पाळखी करायला वेळ मिळत असतो . पण ब्याक्टेरियाचे आयुष्य काही मिनिटांचे फार तर काही तास . त्या आयुष्यात त्याला नॉर्ड इन्फेक्ट करणार कधी आणि तो अमेरिकेत पोचणार कधी ? त्याला शेकडो वर्षे लागायला पाहिजे ! पण स्मिथने गणितात आणि वसूने जीवशास्त्रात मुद्दामच काही सौम्य चुका केल्या ! त्यामुळे तो व्हायरस अमेरिकेत आत्ताच दाखल झाला आहे अशी तद्दन खोटी थाप सरकारी मुर्खांना पचवता आली .

पण त्याचे परिणाम फार सुखद होते . युद्धखोर अध्यक्षांचा अणुबॉम्ब घरीच गंजत पडला . डिफेन्स चे बजेट नॉर्डविषयी अधिक संशोधन करण्यासाठी वर्ग करण्यात आले . दुसरे क्रिस्पर व्हायरस वापरून नॉर्डचे जीवशास्त्रीय दमन करणे शक्य होते . त्या संशोधनासाठी  सरकारने डॉलर्सच्या राशी उभ्या केल्या होत्या . काही महिन्यातच हे संशोधन बाहेर येणार . वसूच त्या प्रोजेक्ट ची लीडर होती . त्याच्या पहिल्या क्लिनिकल ट्रायल आफ्रिकेतल्या  नैरोबीत घेतल्याने तेथील रुग्णांना मोफत औषधोपचार मिळणार होते .

सेव्हिंग द वर्ल्ड आनंदी आनंद . ठेवणीतली रेड वाईन टर्कीबरोबर झिंग आणत होती हास्यांचे फवारे उडत होते कारण स्मिथ ओठाचा चंबू करून मूर्ख प्रेसिडेंटची नक्कल करून दाखवत होता. विशेतः वसूनं वॊशिंग्टन वर हायड्रोजन बॉम्ब टाका असे नम्रपणे सुचवल्यावर प्रेसिडेंट चा बावचळलेला चेहरा स्मिथ साक्षात अवतरून दाखवत होता .

वसुला वाईन मिळाली , हास्य मिळाले , पुन्हा नवे मित्र मिळाले , सोशल सर्कल मिळाले. सगळं काही होतं तिच्यापाशी . ज्ञान पैसा , मित्र ... एक गोष्ट सोडून - तिचा विजय ...

खूप उशीर झाला .. बारा एक पर्यंत पार्टी चालली . डिनर झाल्यावर आपल्या वसूने  फोनवरील लाइफबुक उघडले . आणि विजय ला खऱ्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली .

खोकत खोकत विजय उठला . अमेरिकेला परत आल्यापासून त्याची प्रकृती बरोबर न्हवती . पण वसूची फ्रेंड रिक्वेस्ट पाहिल्यावर तो चैतन्याने सळसळला . तीन महिन्यापूर्वी नैरोबीहून तो परतला होता . त्याच्या आयुष्यात तीन महिन्यात पहिलीच चांगली बातमी . तीन महिने त्याचा साधा खोकला कुठल्याच औषधाला दाद देत न्हवता .


समाप्त -

डॉ अभिराम दीक्षित

-------

अधिक वाचन करण्यासाठी

१) स्मिथचे गणित - https://en.wikipedia.org/wiki/Six_degrees_of_separation

२) वसूचे संशोधन - https://en.wikipedia.org/wiki/Bacteriophage






सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *