१ नोव्हें, २०१५

सरदार पटेलांचे "त्व " कोणते ?

हल्ली ज्या अर्थाने हिंदुत्व वादि विरुद्ध सेक्युलर अशी उभी फाळणी देशात दिसते . त्या अर्थाने पटेल हिंदुत्व वादि  नाहीत.  पण  हल्लीच्या अर्थाने पटेल सेक्युलरही नाहीत . नरहर कुरुंदकर लिहितात : 

 “ नेहरू वाटतात तितके डावे नव्हते, ते मध्यकेंद्राच्या डावीकडे होते. सरदार वाटतात तितके उजवे नव्हते. ते मध्य केंद्राच्या उजवीकडे होते.  पटेल सावरकरांचे किंवा गोळवलकरांचे अनुयायी जाहीरपणे कधी नव्हतेच; पण मनातूनही कधी नव्हते. १९४५ च्या निवडणुकीत काँग्रेसला मुसलमानेतर (हिंदुबहूल ) मतदारसंघांत ९१ टक्के मते मिळाली.  जिन्हांच्या लीगला - मुस्लीम मतदारसंघांत ८६ टक्के मते मिळाली. हे सत्य डोळ्यांसमोर दिसत असताना भारतीय राष्ट्रवादावर मुसलमानांची श्रद्धा गृहीत धरता येत नाही, ती त्यांनी आपल्या वागणुकीने सिद्ध केली पाहिजे, आणि राष्ट्रवादी म्हणवणाऱ्या मुसलमानांनी स्वत:च्या समाजातील जातीवादाविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले पाहिजे, असा आग्रह सरदार पटेल धरीत.  ( आकलन, सरदार पटेल : काही समज-गैरसमज )





तत्कालीन राजकीय नेत्यांच्या हिंदु मुस्लिम प्रश्नावर  असलेल्या भूमिकांना फ़ाळणिचा आयाम आहे . लीगने फाळणीची मागणी केलेली आहे . मुस्लिम मतदार संघातुन त्याना भरघोस मते मिळत आहेत . जनसामान्य मुस्लिमांचा पाठींबा लीगला मिळत आहे त्यावेळी सरदारांनी हि मते व्यक्त केली आहेत .
नरहर कुरुंदकरांनि पुढे याच लेखात सरदार पटेल हे मुस्लिम विरोधी नव्हते असा निर्वाळा दिला आहे . त्यावर चर्चा करण्या आधी मुस्लिम विरोध म्हणजे नेमके काय ? ते पाहू .


भारतातील मुस्लिम विरोधी भूमिका : 

टोकाची मुस्लिम विरोधी भूमिका काय असू शकते ? सर्व मुस्लिमाना मारून टाकावे अथवा पाकिस्तानात हाकलून द्यावे हि टोकाची वेडपट्पणाचि भूमिका झाली . अशी वेडसर भूमिका भारतीय राजकारणात कोण्या जवाबदार नेत्याने घेतली आहे काय ? उत्तर 'नाही'  असे आहे .

सावरकर हिंदुत्व वादि  मानले जातात. त्यांच्या इतिहास लेखनाचा संदर्भ न घेता राजकीय भूमिकांचा संदर्भ घ्यायला हवा . हिंदुमहासभेच्या अध्यक्ष पदावरून त्यांनी सलग त्यांचा राजकीय हिंदुत्वाचा  विचार मांडला आहे .  हिंदुच्या न्याय हक्काचे रक्षण इतकाच तो अर्थ आहे . मुस्लिम लीगच्या अव्वाच्या सव्वा मागण्या मान्य करून त्याना सत्तेत चाळीस पन्नास टक्के वाटा देऊ नये असे सावरकरांचे मत आहे .   त्यांच्या अखंड भारतात मुस्लिमांना लोकसंख्ये च्या प्रमाणात राखीव जागा / स्वतंत्र मतदार संघ द्यायला सावरकर तयार आहेत . अल्प्संख्यकांच्या संस्कृतीचे रक्षण होउइल अशी घटनात्मक तरतूद सावरकरांना हवी आहे . कुराण , पुराण ,  वेद , बायबल सारे टाळून सावरकरांना विज्ञान निष्ठ राज्यघटना हवी आहे . (अधिक वाचनासाठी येथे क्लिक करावे )









सावरकर आणि  गोळवलकरांचे हिंदु धर्माच्या उपयुक्ततेबद्दल मतभेद आहेत. सावरकरांना आज सर्वच धर्म कालबाह्य वाटतात .  संघाच्या गोळवलकरांचे आणि सावरकरांचे कधी फारसे जमले नाही. हे अनेक सभात एकत्र दिसतात . पण राजकारण विरुद्ध चालले . स्वातंत्र्य  पूर्व काळात सावरकरांच्या  हिंदु महासभेविरुद्ध संघाने कधी उमेदवार दिले, कधी प्रचारही केला . सावरकरांची विज्ञान वादी भूमिका गोळवलकरांना  मान्य नव्हती. गोळवलकरांच्या मते हिंदु धर्म - संस्कृतित काहीतरी भारी आहे . विशेष आहे . जगातील इतर धर्मापेक्षा हिंदु धर्म श्रेष्ठ आहे . गोळवलकर लिहितात
 सावरकर हिंदु महासभा आदिंचे ….  हिंदुत्व पोकळ आहे... नकारात्मक आहे .. निव्वळ प्रतिक्रियावादी आहे... त्यात हिंदु जीवन मुल्यांचा अभाव आहे... आणि  हिंदु सभेला   कोङ्ग्रेसचाच संमिश्र राष्ट्रवाद मान्य असणे हि एक विकृत धारणा आहे ". मा स गोळवलकर  (विचारधन ५८-५९ भाविसा २००१) 
 सावरकर अज्ञेय वादि  (नास्तिक) आणि विज्ञान निष्ठ आहेत . त्याविरुद्ध गोळवलकर हे धार्मिक अर्थाने हिंदु धर्माचे भक्त आहेत. सावरकर गोळवलकर या दोघांचा मुस्लिम लीगच्या जातीय राजकारणाला विरोध आहे पण गोळवलकर तरी मुस्लिमांच्या विरुद्ध आहेत म्हणजे नेमके काय आहे ?  गोळवलकरांनी ३० जानेवारी १९७१ रोजी कोलकत्ता येथे डॉ जिलानी या मुस्लिम पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत आपली मुस्लिम विषयक भूमिका स्पष्ट केली आहे. आजही संघाची मुस्लिम विषयक अधिकृत भूमिका हीच आहे . त्यामुळे संघ सर्व धर्म समादार मंच , राष्ट्रीय मुस्लिम मंच असे अनेक प्रयोग करून पाहत असतो . हिंदु आणि मुस्लिमात परस्पर सामंजस्य कसे निर्माण होईल ? या डॉ जिलानिंच्या प्रश्नाला उत्तर देताना  गोळवलकर म्हणतात :

 व्यापक प्रमाणावर धर्माची खरी खरी शिकवण द्यावी . सध्याच्या राज्यकर्त्यांचि धर्महीन शिकवण सोडुन द्यावी.  हिंदुना  हिंदु धर्माचे व मुस्लिमांना इस्लाम धर्माचे खरेखुरे शिक्षण द्यावे. कारण सर्वच धर्म मनुष्याला महान , पवित्र आणि मंगलमय होण्याची शिकवण देतात."  (समग्र श्रीगुरुजी , खंण्ड ९, भाविसा २००६ , पृष्ठ १९२ ) 

आधुनिक विचार सोडुन दिला पाहिजे. खरा इस्लाम आणि खरा हिंदु धर्म शिकवला तर हिंदु मुस्लिम सामंजस्य निर्माण होईल असे गोळवलकरांचे अधिकृत मत आहे. गोळवलकरांचा समान नागरी कायद्याच्या सक्तिलाहि  विरोध होता.  (समग्र श्रीगुरुजी , खंण्ड ९, भाविसा २००६ , पृष्ठ १९६,९७ ) 


हि त्याकाळची मुस्लिम विरोधी म्हटली जाणारी मते आणि माणसे  निट समजून घेतली पाहिजेत आणि त्या पार्श्वभूमीवर सरदार पटेलांचे तत्कालीन विचार समजून घेतले पाहिजेत. आणि मगच पटेलांचे  ' त्व ' ठरवले पाहिजे.  



---------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------

सावरकर - गोळवलकरांचा मुस्लिम विरोध म्हणजे तत्कालीन मुस्लिम लीगच्या मागण्यांना विरोध आहे . सावरकर मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात  राखीव जागा देऊन तत्कालीन २३% मुस्लिम लोकसंखे सकट अखंड भारत मागत आहेत. . जर सावरकरांच्या स्वप्नातले अखंड भारत अस्तित्वात आले असते तर आज भारत पाकिस्तान आणि बांग्लादेश मिळुन जगातल्या सर्वात मोठ्या मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशात  आपण राहत असतो .  त्यात सावरकरांच्याच  विचारानुसार आज मुस्लिमांना लोकसभेत ३०% हून अधिक राखीव जागा  मिळाल्या असत्या . गोळवलकर हिंदु आणि मुस्लिमांना आधुनिक न करता त्यांना धर्म शिक्षण  द्या म्हणत  आहेत … असा हा ३०% मुस्लिम लोकसंख्येचा आणि धर्मशीक्षणाने परिपुर्ण अखंड हिंदुस्थान तत्कालीन  हिंदुत्व वाद्यांना हवा आहे !

सरदार वल्लभ भाई पटेल हा एकमेव राष्ट्रीय नेता फ़ाळणिच्या समर्थनार्थ उघडपणे पुढे आलेला दिसतो. १४ जून १९४७ च्या कोन्ग्रेस महासमितीच्या बैठकीत फ़ाळणिवर गरमा गरम चर्चा झाली.   खुल्या दिलाने फाळणीचे संपुर्ण समर्थन करणारे पटेल हे पहिले कोन्ग्रेस नेते आहेत .  व्ही पी मेनन हे पटेलांचे सहकारी आणि संस्थाने खालसा करणारे प्रत्यक्ष कर्मचारी . मेनन यांनी ट्रान्स्फर ऑफ पॉवर इन इंडिया नावाचे पुस्तक लिहिले आहे . त्यात पटेलांचे विचार येतात . इतर अनेक संदर्भ ग्रंथातुन दृगोच्चर होतात .  पटेल म्हणतात :

फाळणी कोणाला आवडेल ? कोणालाच नाही ! मुस्लिम बहुसंख्य भागातील आपल्या बांधवांचि सहवेदना मला समजते. माझे हृदय भरून आले आहे . परंतु येथे प्रश्न फ़ाळणिचा नाही . एक फाळणी कि अनेक फ़ाळण्या असा आहे . आपण (कोन्ग्रेसने) वास्तवाचा सामना केला पाहिजे. आपण भावुक वा हळुवार होऊन चालणार नाही . … (केबीनेट मिशन सं. ) काही  सन्मानीय अपवाद वगळता साहेबापासून चपराशापर्यंत सारे मुस्लिम कर्मचारी मुस्लिम लीग साठी काम करत आहेत… त्यांच्या  जातीय नकाराधिकाराने (communal veto) भारताची प्रगती प्रत्येक टप्प्यावर अडवली जाइल. आपल्याला आवडो अगर न आवडो - वास्तवातले पाकिस्तान पंजाब आणि बंगाल मध्ये तयार आहे. … आपल्याजवळ भारताचा ७५ % ते ८० % भाग राहील . आपण आपल्या बुद्धिमत्तेने त्या नव्या भारताला सशक्त बनवूया . मुस्लिम लीगला त्यांच्या मार्गाने जाउद्या … "  (  ट्रान्स्फर ऑफ पॉवर इन इंडिया, पृष्ठ ३८५ व्ही पी मेनन ) 




सरदार वल्लभभाई पटेल यांनी अशीच विधाने वारंवार केली आहेत . उदाहरणार्थ म्हणून त्यांची काही विधाने कालानुक्रमे पाहुया. (पृष्ठ ३११ , मुहम्मद आली जिन्हा ग्रेट एनिग्मा : चव्हाण,  ओथर  प्रेस दिल्लि २००६) 

११ ओगस्ट १९४७ :  मी फाळणी यासाठी मान्य केली , कि  (उर्वरित ) भारत अखंड ठेवण्यासाठी त्याची फाळणी करणे भाग होते . फाळणी स्वीकारली नसती तर भारताचे अनेक तुकडे झाले असते .

२२ ऑक्टोबर १९४७ : आमची फाळणीला मान्यता म्हणजे एखादा रोग ग्रस्त अवयव कापून टाकण्यास दिलेली मान्यता होय जेणेकरून उर्वरित शरीर शाबूत राहते.

इथे सरदार  पटेल मुस्लिम लीगचे प्राबल्य असलेल्या मुस्लिम बहुल भागाला रोग ग्रस्त अवयव म्हणत आहेत . 






डॉ  आंबेडकर हे हिंदु धर्माचे विरोधक आणि राष्ट्रवादी सेक्युलर नेते , त्यांनीही या विषयावर आपली मते अतिशय स्पष्टपणे मांडली आहेत .  फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५  साली   बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. --  
" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " (DrBabasaheb Ambedkarwritings and speechesVolume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) Page 146 )




--------------------------------------------------

स्वातंत्र्य नव्हे सत्तांतर



इथे भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे नेमके काय झाले ते समजून घेतले पाहिजे. सहसा स्वातंत्र्य कसे मिळते ? जुन्या राज्य कर्त्याचे मुंडके उडवले जाते आणि त्याचा राजवाडा जाळून नवा राजा किंवा सत्ता येते . शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोर्याला खतम केल्यानंतर त्याच्या सिंहासनाला लाथ मारली होती . मात्र …. 

 ब्रिटिश व्होइसरोय भारतातून गेला तेंव्हा बिगुल वाजत होते आणि भारतीय सैन्य त्याला सलामी देत होते . भारताला करार करून स्वातंत्र्य मिळाले आणि त्याला सत्तांतर ( Transfer Of Power) असे म्हणतात . बरे हे करार करणे कधीपासून सुरु होते ? गोलमेज परिषदा भरत होत्या . ब्रिटिश भारतीयांनाच विचारत होते - तुम्ही एकमुखी मागणी करा आम्ही मान्य करतो. ब्रिटिश लायब्ररीने या सत्तांतरा सबंधित सर्व कागद पत्रे प्रकाशित केलेलि आहेत. जिज्ञासूंनि ती अवश्य अभ्यासावीत. 

ब्रिटिशांचा युक्तिवाद असा होता कि , भारत हे एक राष्ट्र नाही त्यात अनेक संस्थाने, जाती, धर्म यांची स्वतंत्र राष्ट्रके आहेत . एकतर या सर्वांनाच वेगवेगळे स्वतंत्र करावे किंवा सर्वांनी एकत्र एकमुखी मागणी करावी.
हिंदु - मुस्लिम , दलित - सवर्ण , संस्थाने - ब्रिटिश इंडिया कोणाचेच एकमेकात पटत नव्हते - स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना कशी असावी ? स्वतंत्र मतदार संघ असावेत का ? असल्यास कोणाला ? अल्पसंख्य - दलित यांना जादा हक्क असावेत का ? कोणाचेच एकमत होता होत नव्हते . म्हणुन स्वातंत्र्य लांबणीवर पडत होते.
स्वातंत्र्य मिळवणे याचा भारता संदर्भात अर्थ होता - सर्व जन समूहांनी एकत्र टेबलावर बसून वाटाघाटी करून भावी स्वातंत्र्याचि योजना बनवणे . सत्तांतर ( Transfer Of Power) च्या योजनेबाबत जनासामुहात ऐक्य होत नव्हते हि खरी रड होती .



स्वातंत्र्य म्हणजे काय ?

१९१८ साली भारताला कधीतरी पुर्ण स्वातंत्र्य देण्याची चर्चा  ब्रिटिश सुरु करतात. भारताचे स्वतंत्र्य एका रात्रीत मिळालेले नाही . एडविन मोण्टेग्यु पासून क्रिस्प पर्यंत आणि  गोलमेज परीषदातुन   भारतीय स्वातंत्र्याचि  चर्चा चालू आहे . ट्रान्सफर ऑफ पॉवर - सत्तांतराचा इतिहास म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य लढा आहे .    हे स्वातंत्र्य टप्प्या टप्प्याने हवे यावर एकमत आहे . कारण भारतीय राज्य चालवण्यासाठी संस्थात्मक उभारणी झालेली नाही . मुळात  स्वातंत्र्य म्हणजे काय ? यावर भारतीयात एकमत होत नाही. 

एकत्र पाणि पिण्याचा हक्क दलिताना नाकारणारे राज्य आणि राष्ट्र  डॉ आंबेडकरांना नको आहे. त्यांचा कोन्ग्रेस वर विश्वास नाही . पेरियार स्वामिना हिंदि भाषिकांची दादागिरी नको आहे . पेरियारांनि  स्वतंत्र द्रविडिस्तान ची मागणी गेली आहे. जिन्हांचा मुस्लिम लीग प्रमाणा बाहेर सत्तेचा वाटा मागतो आहे . अन्यथा पाकिस्तान ' स्वपराक्रमाने ' मिळवू अशी दंगलिंचि धमकी देतो आहे . ५५० हून अधिक हिंदू - मुस्लिम  संस्थाने भारतात आहेत . त्यापैकी बहुतेकांना  भारतात सामील होण्याची इच्छा  नाही. 

१९१८ नंतर ब्रिटिशांशि लढणे हे राजकारणात महत्वाचे उरले नाही. सवर्ण - दलित , हिंदु- मुस्लिम , हिंदि - तामिळ असे वाद सामोपचाराने किंवा संघर्षाने सोडवणे हेच भारतीय राजकारणाचे महत्वाचे ध्येय  बनले . सरदार पटेलांच्या भूमिकांची हि पार्श्वभूमी आहे . भारतीयात एकता नव्हती समताही नव्हती - हिंदु मुस्लिमात नव्हती , हिंदि - तामिळात नव्हती , सवर्ण दलीतात नव्हती.  


आता या हिंदु मुस्लिम प्रश्नाबद्दल , भाषिक प्रश्नाबद्दल , जातीय प्रश्नाबद्दल , संस्थानाच्या प्रश्नाबद्दल सरदार पटेलांनी कोणती भूमिका घेतली ? यावरून त्यांचे  " त्व " ठरणार आहे .  






 हैदराबादच्या निजामाची इस्लामी धर्मांध राजवट पटेलांनी चारी मुंड्या चित केली.  पण  हिंदूही किती  (देशद्रोही ) राष्ट्रद्रोही आहेत हे सरदार डोळ्यांनी पाहत होते. रामस्वामी मुदलियार मुसलमान नव्हते, पण त्यांना त्रावणकोर भारतात विलीन करण्याची इच्छा नव्हती. लोहपुरूष सरदार पटेलांनी हिंदु मुस्लिम असा भेद न करता सगळ्या राजा महाराजांना वठणीवर आणले.  (तिरपा ठसा कुरुंदकर उक्त लेख )

सरदार पटेल हिंदुत्व वादि  आहेत काय ? असा मुद्दा आज चघळला जातो आहे . हल्ली ज्या अर्थाने हिंदुत्व वादि विरुद्ध सेक्युलर अशी उभी फाळणी देशात दिसते . त्या अर्थाने पटेल हिंदुत्व वादि  नाहीत.  पण  हल्लीच्या अर्थाने पटेल सेक्युलरही नाहीत .  पटेलांचे " त्व " शोधायचे असेल तर त्याकाळच्या सेक्युलर किंवा उजव्यांशि तुलना करावी लागते . अशी तुलना आपण करू लागलो . कि आजपर्यंतचे पूर्वग्रह धडाधड कोसळून पडु लागतात  अणि पटेलांचि विचारसरणी त्यांचे "  त्व  " लखलखित पणे दिसते .





हिंदुत्व म्हणजे काय ? हाच चर्चेत  महत्वाचा मुद्दा आहे

सावरकर  त्यांची हिंदुमहासभा, गोळवलकर त्यांचा संघ यातले काहीही पटेलांना मान्य नव्हते . आवडत हि नव्हते . पटेलांच्या लिखाणात याचे पुरावे ठिकठीकाणी मिळतील . बराचसा  हिंदु समाज गांधिंच्या कॉंंग्रेस मागे उभा होता.   गांधिंनि तो स्वत:च्या व्यक्तिमत्वाच्या जादूने संघटित केला होता . गांधीजी  संत होते , धार्मिक होते , कधीकाळी जरासे सनातनी सुद्धा होते. पण मुस्लिमांना काय ? कोणालाच  हाणा मारायची भाषा त्यांना कधी  मान्य नव्हती . जशास तसे हा न्याय हिंदु मुस्लिम प्रश्न सोडवू शकत नाही . कारण हा प्रश्न बहुपदरी आहे . हिंदुच्या शेकडो धर्म परंपरा  , हजारो  जाती याना एकत्र करायचे ते द्वेषावर नव्हे तर वाटाघाटिंवर……  आणि हिंदु मुस्लिम प्रश्न सोडवायचा तोही  वाटाघाटिंवर अशी महात्मा गांधिंचि जीवन श्रद्धा आहे .

इथे नेहरू पटेल गांधिंचे एकमत आहे . पटेलांच्या तरुण वयातल्या एखाद दुसर्या वाक्याला काही अर्थ नसतो. त्यांच्या समग्र आयुष्याचा विचार केला तर पटेल  गांधिभक्तच होते . पटेल आणि नेहरुंना गांधीचे उजवे डावे हात समजले जात असे . या   उजव्या आणि डाव्या बाजुलाही अर्थ आहे . अनेक आर्य समाजिस्ट कोन्ग्रेस मध्ये होते हे ध्यानात ठेवले पाहिजे .


नेमक्या उलट्या बाजूस बसलेले उजवे डावे हात


पटेल हिंदु धर्म वादि होते काय ? त्याकाळी कोण हिंदु धर्म वादि  नव्हते  ? तत्कालीन सगळी कोन्ग्रेस हिंदुच आहे . खरे तर सावरकर आणि गोळवलकर हि मंडळिच पारंपारिक अर्थाने हिंदु नाहीत . सावरकर तर पक्के नास्तिक (अज्ञेय) वादि . सावरकर नावाच्या माणसाला हिंदु हे नाव सोडता त्यातले काहीही प्रमाण नाही . सगळे लक्ष विज्ञान निष्ठ युरोपकडे लागलेले . गोळवलकरांचे बाह्यरूप कितीही हिंदु भासले  तरी तेही पारंपारिक हिंदु नव्हेत . जटा दाढी कमंडलु संस्कृतप्रचुर  धार्मिक भाषा हि हिंदु असण्याची निव्वळ  बाह्य लक्षणे आहेत. मुळात मुस्लिमाना तोंड देण्यासाठी हिंदुनो संघटित व्हा - असे कुठलीच हिंदु परंपरा शिकवीत नाही .  सावरकर गोळवलकराना नेमके तेच (अहिंदु मत ) मांडायचे  आहे .

गोळवलकर हिंदु लोकाना , त्यांच्या आडव्या तिडव्या धर्म भावनाना चुचकारत त्यांचे संघटन करू पाहतात .

याउलट सावरकर हिंदुना  त्यांचे दोष दाखवून देत संघटित व्हा म्हणतात . सावरकरांचे समग्र लिखाण अभ्यासले तर त्यात हेच दोन मुद्दे प्रामुख्याने दिसतात . एक म्हणजे हिंदु समाजाचे दोष आणि त्यातून निर्माण झालेली संघटनेची  निकड (दुसर्या स्थानावर !)

महात्मा गांधी यातले काहीच करत नाहीत . ते सगळ्या मानव जातीने एक व्हावे म्हणतात . त्यावेळी त्यांच्या मागे हिंदुच येणार असतात . हे गांधी नेहरू पटेलांना ठाउक असते .  त्या अर्थाने गांधी नेहरू पटेल हे सारेच हिंदु धार्मिक परंपरेतल्या विचाराने हिंदु संघटक आहेत . सावरकर गोळवलकर आदि लोक्स हिंदुना माहित नसणारा विचार सांगत आहेत .

महत्वाचा  मुद्दा असा कि , पटेल काही नास्तिक नव्हेत .   नेहरू जसे आधुनिक डावे होते तसेही सरदार पटेल नव्हते . गांधीजी  ज्या अर्थाने संत होते - ते संतप्रकरण पटेलांना फारसे आवडत नसावे . पण  तत्कालीन कोन्ग्रेस मध्ये असे अनेक विविध विचाराचे अनेक नेते दिसतात . पण या सगळ्यांनी गांधीजिंना आपला बॉस  मानले होते. पटेल विरुद्ध नेहरू किंवा   पटेल विरुद्ध गांधी असा  संघर्ष चित्रित करणे मुर्खपणा आहे .  . 

तत्कालीन सगळी कोन्ग्रेस हा हिंदु पक्षच  आहे . आजच्या भाजपात नावाला  मुसलमान असतात तसे त्याकाळच्या कोन्ग्रेस कडेही राष्ट्रवादी मुसलमान  होते . आणि त्या  हिंदू कोन्ग्रेस मध्ये   सरदार पटेल हे अधिक उजवीकडचे हिंदु आहेत .






समारोप : एक घटना खेळ खल्लास 

सरदार पटेलांच्या आयुष्यातली एक घटना सांगितली तरी पटेलांचे ''त्व " झटकन समजून येईल. हल्ली बाबरी मशिदीवरून बराच धुमाकुळ झाला.  पण बाबरी पाडण्या  सारखी तंतोतंत घटना सरदार पटेलांनी घडवली आहे . त्यांनी आंदोलन केले नाही . त्यांनी विटा उचलल्या नाहीत . जप केले नाहीत . यज्ञ नाही .  स्वतंत्र भारताचे गृहमंत्री म्हणुन  त्यांनी आदेश दिला . आणि सोमनाथ च्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला.

 सोलंके मुलराजा (साळुंखि / साळुंखे )  नावाच्या राजाने ईसवि सनाच्या ९९० च्या दशकात बांधलेले हे प्राचीन शिवमंदिर आहे . हे प्राचीन मंदिर अनेक इस्लामी  आक्रमकांनि अनेकवार जमीनदोस्त केले .

 या इतिहासावर  डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पाकिस्तानवरील पुस्तकात अनेक  पाने खर्च केली आहेत . हे प्राचीन शिवमंदिर पहिल्यांदा अफ़गाणिस्थाच्या मुहम्मद गजनीने   १०२४ साली पाडले . अल्लाउद्दिन खिलजी ने ते मंदिर १२९० च्या दशकात पुन्हा पाडले तेव्हा पन्नास हजार काफ़िरांचि घाउक कत्तल केली होती. १३७५ साली हे मंदिर मुझफ्फर शहा ने पाडले.मध्ये अनेकदा बांधले गेले - अनेकदा तोडले गेले .  सर्वात शेवटी हे सोमनाथाचे मंदिर औरंगझेबाने तोडल्याची खबर इतिहासाला ठाउक आहे .

मुस्लिम मुर्तिभंजक मंदिर तोडत होते तेंव्हा ते सोमनाथाचे मंदिर हिंदु राजे, राजवाडे,  प्रधान पुन्हा पुन्हा जाउन बांधत हि होते . ज्यांनी हे मंदिर बांधले त्यांनी एकाही नव्या मशिदीचा चुकूनही विध्वंस केलेला नाही . या प्राचीन शिव मंदिराचा जिर्णोद्धार करणार्यात प्रमुख नावे - भीमदेव साळुंकी , गुजराथचा राजा करण , नागपूरकर भोसले , राजमाता अहिल्याबाई होळकर , पुण्याचा पेशवा , कोल्हापूरचे महाराज , ग्वालेरच्या शिंदे सरकार नि हे मंदिर १७ व्या शतकात पुन्हा बांधले होते.

बाकी कोणत्याही राजकारणासाठी फुटीर असलेला हिंदु सोमनाथ च्या जिर्णोद्धाराने  मुळे खुश नक्की झाला . त्या अर्थाने सरदार  पटेल हिंदुत्व वादि म्हणता येतील . पण खरी गंमत नंतर आहे . राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती हे या नव्या मंदिराचे उद्घाटक होते . पण मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला ब्राम्हण मिळेना . हि प्राण प्रतिष्ठा तर्कतीर्थ लक्षुमण शास्त्री जोशी यांनी केली . हा नास्तिक डावा जरासा कम्युनिस्ट लाल माणुस … पत्ता प्राज्ञ पाठशाळा वाई …

 कारण राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभ भाई पटेलांना  या नव्या जिर्णोद्धारित मंदिरात सर्व  जातीच्या हिंदुना प्रवेश मिळवुन द्यायचा होता …… यासाठी प्राद्न्य पाठशाळा वाई इथला नास्तिक माणुस शोधावा लागला - हि हिंदुत्वाची रड आहे

आता पटेलांना कोणते "त्व" लावायचे - हा आपापला प्रश्न आहेय !





आगामी : लोहपुरूष पटेल आणि भारत मातेचे सुपुत्र व्ही पी मेनन

२ टिप्पण्या:

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *