२५ ऑक्टो, २०१५

देवाने क्वार्टर का बनवली ? (नास्तिक पुराण भाग २ )


आमच्या कॉलनितला -  माझा एक जुना मित्र -  हल्ली फार दारुडा बनला आहे. सुरवातीला शनिवारी  एक क्वार्टर प्यायचा, मग मंगळवार - गुरुवार - शनिवार चे दारु व्रत सुरु झाले . मग रोज पिऊ लागला.  कोटा वाढत - वाढत गेला . आता  पट्ठ्या दिवसाला अक्खी बाटली = १ खंबा  = ४ क्वार्टर… रीचवू लागला आहे . भल्या सकाळी  - पहाटे सहालाच मदिरेची आचमने   सुरु  करतो  . असो .  एकदा मी त्याला रस्त्यात पकडून  त्याचे बौद्धिक घेत होतो . दारू पिण्याचे दुष्परिणाम वगैरे - वगैरे समजावत होतो  …….तेंव्हाहि  स्वारी अर्थातच टुल होती. त्या टुल अवस्थेतही त्याची दारुवरील निष्ठा कमी झाली नव्हती. बर्याच वाद विवादनंतर त्याने दारू बंद नाही केली  तरी दारूचे प्रमाण कमी करायचे मान्य केले . हुश्श ! क्षणभर पॉज घेतला आणि मग बेवड्याने ब्रम्हवाक्य उद्गारले :

" देवाने क्वार्टर का बनवली असेल ?  काहीतरी विचार करूनच क्वार्टर बनवली असेल ना ? हे माप देवाच ! यापुढे एक क्वार्टर हून जास्त नाय पिणार . जेंव्हा देवाने क्वार्टर बनवली - ती  दिवसाचा कोटा म्हणून  ! त्याहून  अधिक पिणे हे पाप आहे !"  

बेवड्याचे वाक्य म्हणून हसून सोडून देऊ नका . बेवड्याने स्वत:च्या  नकळत…  एका महत्वाच्या तात्विक प्रश्नाला हात घातला आहे.

देवाने पृथ्वी का बनवली ? देवाने ऋतुचक्र का बनवले ? देवाने फळे - फुले - झाडे का बनवली ? देवाने माणुस का बनवला ? देवाने क्वार्टर का बनवली ? 






क्वार्टर काही देव बनवत नसतो - दारुच्या कारखान्यात ती बनते. हे शुद्धीतल्या माणसाला सहज कळते . इतर प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी थोडी शुद्धी वाढवावी लागते. नशा कमी करावी लागते.
देवाने क्वार्टर का बनवली ? 
हा प्रश्न अतिशय मुलभुत आहे - देव क्वार्टर बनवत नाही पण दारुगुत्तेवाला तरी देवानेच बनवला ना?  विश्वाच्या देवाचे ध्येय काय ? निर्मिक - निर्माता देव काय सांगतो ? 

माणसाच्या विचार सृष्टीत दोन प्रकारचे देव आहेत . विश्वाचा देव आणि मनुष्याचा देव.

मनुष्याचा देव आपल्या रोजच्या व्यवहारात आहे .  आपण त्याला नवस बोलतो , नमाज पढतो, आरती करतो , प्रसाद देतो,  कधी क्रुसावर टांगुन अश्रू ढाळतो . हे दोन प्रकारचे देव सर्व धर्मात आहेत . इसाई , इस्लाम  धर्मात त्याला एकच मानले  आहे तरी हि दोन्ही कामे मात्र  त्याना  करावीच लागतात. 

१) विश्वाचा देव :  हा  सहसा अव्यक्त निराकार असतो.   क्वार्टर - क्वार्टर वाला - दारुगुत्तेवाला - व्यसन मुक्तीवाला. चोर आणि पोलिस  या सार्याना निर्माण करतो. जन्म देतो . त्यांची मने आणी हेतूही तो तयार करतो. या विश्वाच्या  हेतूचा बोध म्हणजेच  , समग्र तत्वज्ञान होय .
 क्वार्टर :  पिणार्या -विकणार्या - बनवणार्या - व्यसनमुक्ती केंद्र चालवणार्या माणसांची साखळी तो - विश्वाचा देव - तयार करतो.

२) मनुष्याचा देव : हा व्यावहारिक असतो .  उपास , उपासना , नवस , नमाज, नागबली, प्रार्थना , यज्ञ याग,   कर्मकांड, ब्राम्हण भोजने  याबदल्यात हा माणसांची व्यक्तिगत कामे करून देतो . क्वार्टर खरेदी करण्यासाठी पैसे आणि पैशासाठी नोकरी  देणारा हा देव आहे.  हा सेटिंग करतो. पोरे पैदा करून देतो , पोरी सुद्धा पटवून देतो - सर्व धर्मात याचे खासा विधी आहेत .

 बुद्धिमान माणसाला मनुष्याच्या देवाचे कपडे काढणे काढणे सोप्पे असते. असले देव  अट्टल मानवी गुणधर्म दाखवतात, --  लबाड्या करतात , हाणामार्या करतात, द्वेष करतात , चिथावणी देतात , वर्ण , शोषण , विषमता , जिहाद, क्रुसेड  सारे काही जन्माला घालतात. निदान शुद्धीतल्या माणसाला  हि फालतुगिरी आहे हे कळायला हरकत नसावी. मुद्दा विश्वाच्या देवाचा आहे !






ग्रह , तारे , नक्षत्र , पृथ्वी ,  माणुस, प्रेम , मैत्री ,  हास्य …… कीटक , प्लेग , महामारी , युद्ध आणि भुकंप हे सारे एकाच वेळी तयार करणारा देव अनाकलनीय आहे .

 देवाचे हे स्वरूप भयावह , अफ़ाट , महान , पितृतुल्य आणि गूढ आहे ---- त्याचे कोणी खंडन करू शकत नाही -- कारण खंडन करणार्याचे मन, मेंदु , बुद्धी आणि हेतुसुद्धा "तो" च ठरवत असतो !!

विश्वाच्या देवाला बायपास  करण्यासाठी मनुष्याच्या देवाने उपास तापास कर्मकांडे नमाज आरत्या तयार केल्या आहेत . करोडो प्रकाशवर्षे आणि अब्जावधी किलोमिटर लांबीचे विश्व तयार करणारा देव पाच फुट माणसाच्या फालतू सुखदु:ख , संपत्ति , वासना ,  भ्रष्टाचार आणि डील फीट  करण्यासाठी मनुष्याचा देव नावाचा मध्यस्त नेमतो अशी श्रद्धा आहे. त्यासाठी धर्म तयार करतो अशीही श्रद्धा आहे.

एका प्रश्नाची निट चर्चा केली तर विश्वाच्या देवाचे हे लफडे समजायला निश्चित पणे मदत होईल - तो प्रश्न आहे
देवाने क्वार्टर का बनवली ?"  

हिंदुचा देव, मुस्लिमांचा अल्लाह आणि ख्रिस्त्यांचा गॉड 

चला तर मग या तिघांना हा प्रश्न विचारूया ! इथे एक मात्र लक्षात ठेवले पाहिजे कि --  हा प्रश्न राम , कृष्ण  , मुहम्मद , जिजस , बुद्ध आणि  महावीर याना नाही . इंटर्नेट वर यातल्या प्रत्येकाच्या विरोधातले आणि  बाजूचे असे  भरपुर लिखाण उपलब्ध आहे. आपल्याला त्यांच्या जन्मदात्याला  प्रश्न विचारायचा आहे ! आपला प्रश्न राम,  दशरथ , दशरथाचा फादर  … आणि सार्या  मानवजातिचे निर्माण ,  नियमन, निर्दालन -  हेतूत:  करणार्या हिंदुच्या देवाला आहे , येशूच्या आकाशातल्या बापाला आहे …. आणि अडाणी निरक्षर  मुहम्मादाला दिव्य कुराण सांगणार्या इस्लामी अल्लाहला आहे.  हा बाप प्रश्न आहे ! -  तू क्वार्टर का बनवली  ? 

ल्ला - गॉड - देव यांना लघुरुपात अगॉद  म्हणूया. पण प्रश्न विचारताना एकेकाला पकडून विचारूया. कारण प्रत्येकाचे उत्तर वेगळे आहे .  ….


अगॉद  अल्ला-गॉड-देव तसे बुद्धिमान समजले जात असले तरी सतत युद्धमान असतात. भांडणे न करता  हे उत्तर  हि त्रिमूर्ती कसे देते हे पाहणे मनोरंजक ठरेल.  कारण सर्व धर्मातल्या सर्व देवतांचा जन्म याच प्रश्नातून झाला आहे . हा बाप प्रश्न आहे ! -  तू क्वार्टर का बनवली  ?

-----------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------

या अवखळ जगातले सौदर्य , प्रेम , जिव्हाळा , खोबरे, सरबत, आनंद पाहून देव मानणे सोपे आहे ---- 
  दारिद्र्य , भूकंप , भूक , विषमता , रोगराई आणि महामारी पाहिल्यावर खरा प्रश्न  उभा राहतो.  आणि आपापल्या परीने अगॉद ने याचे उत्तर दिले आहे. 
-----------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------


हिंदुचा देव : पुनर्जन्माचा कावा 

हिंदुच्या समृद्ध अडगळीत विश्वाचा देव उलगडणारी  अष्टदर्शने आहेत . हा  धर्माचा तात्विक भाग झाला. प्रथम मुद्दा आचार धर्माचा घेऊ. आचार धर्म हा मनुष्याचा देव .  हिंदु हि भौगोलिक ओळख आहे . धर्म नाही . हिंदुचे हजारो आचार धर्म आहेत. जाते जाते कुलाचार : जातीचा कुळाचार हा धर्म समजला जातो . कुळाचार म्हणजे आपले देव , त्याची पूजा , संस्कार , जेवण , कपडे, सण , बारसे , लग्न , समारंभ , मयत  याची परंपरा . सर्व जातीच्या सर्व कुलाचारात पुनर्जन्माचे स्थान महत्वाचे आहे . किंबहुन पुनर्जन्माचा सिद्धांत  हाच हिंदुच्या हजारो  धर्माचा मसावी होय . मयताच्या लाडूला कावळा शिवणे  हा विधी सर्व हिंदू जातीत हिट आहे. कारण पुनर्जन्म सगळ्यांना फीट  आहे .





" मेरे करन  अर्जुन आयंगे "  म्हणून टाहो फोडणारी वेडी म्हातारी  हा आमच्या हिंदुचा  लसावि आहे. पुनर्जन्मावर बॉलीवूड मध्ये अनेक सिनेमे बनतात . आणि त्यांचे हिंदू  प्रेक्षक ते सिनेमे हिट करत असतात . इथे मुद्दा हिरो  कोणत्या धर्माचे आहेत ? हा कधी येत नाही . मुद्दा पुनर्जन्म हिट आहेत -  हा आहे.

पूर्व संचित हि हिंदूची महत्वाची कल्पना आहे . मागच्या जन्माच्या कर्मा नुसार पुढचा जन्म मिळतो .   हि कल्पना भविष्य सांगताना , कुंडली काढताना , मुंज , लग्न , सोळा संस्कार , मयत आणि तेरावे घालताना महत्वाची असते . आणि बॉलीवूडचे सिनेमे हिट करताना सुद्धा महत्वाची असते.

‘कर्मफलसिद्धान्त किंवा कर्मविपाक’ नावाचा सिद्धान्त, हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानात (एवढेच नव्हे, तर भारतात निर्माण झालेल्या शीख ,बौद्ध,  जैनादि सर्वच धर्मामध्ये थोड्याफार फरकाने ) सुप्रसिद्ध व मान्यताप्राप्त आहे. माणूस जी बरीवाईट कर्मे करतो, त्याचे बरेवाईट फळ, त्याला ‘या जन्मात’ किंवा त्याच्या आत्म्याला ‘पुढील जन्मात भोगावेच लागते’ असे हा सिद्धान्त सांगतो. तसा स्पष्ट उल्लेख मुंडक, छांदोग्य व बृहदारण्यक या उपनिषदांमध्ये आहे, तसेच ‘पुनर्जन्म’ ही वैशिष्टय़पूर्ण उपनिषदीय कल्पनासुद्धा मूलत: त्यावर म्हणजे कर्मफलसिद्धान्तावर आधारलेली आहे. (बेडेकर शरद, लोकसत्ता लिंक)

सुख आणि दु:ख हे माणसाला आलटून पालटून भोगावे लागते. दु:ख का ? याचे हिंदु उत्तर आहे -  पूर्वजन्माचे संचित ! मागील जन्मातले पाप / पुण्य या जन्मातल्या सुख दु:खाचा हिशोब करत असते . भगवद्गीतेत त्याचे उल्लेख येतात आणि हिंदुच्या मनावर ते कोरले गेले आहे . भले त्यांनी गीता वाचली नसेल .

                        वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि।  
                                                तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही।।      गीता २- २२                        

जुने कपडे बदलून नवे धारण करावेत त्याप्रमाणे आत्मा नवे शरीर धारण करत असतो .  हि नवी शरीरे म्हणजेच नवा जन्म - पुनर्जन्म  आहे . असे पुनर्जन्म हे आपोआप घडत असतात . देव लोक्स मात्र आपोआप मानवी जन्म घेत नसून स्वत:च्या इच्छेने वा दुसर्या देवाच्या शापाने घेत असतात .

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
                           तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ गीता  ४-१३  

हिंदूचे भगवंत पुढे म्हणतात कि,  ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णांचा समूह, गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या   मी कर्ता असूनही अर्जुना , मला- तू अकर्ताच समज.  कारण हा जो पुनर्जन्माचा सिद्धांत आहे तो खरे तर देव आणि सृष्टीनिर्मात्या इश्वराच्याहि वर मानला गेलेला आहे . हे जे नवे जन्म मिळणार आहेत ते मागील जन्माच्या कर्मानुसार आणि या जन्मीच्या गुणानुसार मिळणार आहेत . मागील जन्मातील पूर्वसंचित - या जन्मीचे गुण ठरवत असते हे ध्यानात ठेवले पाहिजे . 

पुनरजन्म , कर्मविपाक आणि चातुर्वण याची अशी गुंफ़ण आहे . 

-----------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------

दु:ख , रोग , भुकंप , विषमता , जाती श्रेणी  का आहे ?
अस्पृश्यता  का आहे ? देवाने   क्वार्टर का  बनवली ? 
यावर   हिंदु देवाने उत्तर दिले आहे -- पुनर्जन्म ! मागील जन्मीची पापे फेडण्यासाठी या जन्मी दु:ख भोगण्यासाठी देव त्याला क्षूद्र वा  बेवडा बनवतो ! खरोखर कित्ती कित्ती थोर  आहे हा हिंदु देव ! मागील जन्मीच्या पापाबद्दल कावा करून तो  बेवडा आणि क्वार्टर बनवतो !

-----------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------

हिंदुच्या देवानाहि दारू व्यर्ज नाही . श्रीकृष्णाचे यदुकुलिन वंशज दारू पिउन झिंगले - त्यात मारामार्या झाल्या आणि या यादवी युद्धात त्या कुलाचा नाश झाला हि गोष्ट आपण वाचली असेलच . यादवी हा शब्द सुद्धा तिथूनच आला आहे .  सोमरस पान  हा वैदिक यज्ञात महत्वाचा भाग आहे . देवाना यज्ञात आहुती म्हणूनसुद्धा सोमरस द्यायचा असतो . तो सोमरस  त्या बाप्पाला डायरेक्ट पोचत असतो ! सोमरस हे एक मादक पेय आहे . भगवान शिवशंकर स्वत: सुद्धा भांग पीत असत आणि त्याचे भक्त आजही ती प्रसाद म्हणुन घेतात . आजही काशी येथे सरकारमान्य भांग विकणारी दुकाने महादेवाच्या मंदिराच्या आवारात आहेत .

  .


 मुस्लिमांचा अल्लाह : राजकारणी देव 

इस्लामला शराब हराम आहे हे आपल्याला ऐकून माहित असेलच ! 
नास्तिक बुद्धीने कुराण हदीस आणि पैगंबर चरित्र याचा अभ्यास केला कि अल्लाहचा एक गुण ध्यानात येतो ते म्हणजे हा देव राजकारणी आहे . हा स्वर्गाची (जन्नत ) आश्वासने देतो .  जहन्नूम म्हणजे नरकाची भीती दाखवतो - आणि खलिफ़ाचि गादि  शाबूत ठेवतो. प्रश्न असा आहे कि , सर्व शक्तिमान अल्लाह…  काफिर आणि क्वार्टर सारखे  नापाक पदार्थ का बनवतो ?

काफिर बनवतो ते एक कट  म्हणून . आणि कपट  म्हणूनच क्वार्टर बनवतो . हे एक अल्लाचे भारी आहे .  सर्व शक्तिमान असून सुद्धा तो काफिरा ची निर्मिती आणि क्वार्टर चे  प्रोडक्शन चालू ठेवतो . त्यामुळे मोमिनांचि श्रद्धा मजबूत ठेवता -येते  म्हणून अशा अडचणी अल्लाने  मुद्दामहून निर्माण केलेल्या असतात .






बनिये का दिमाग और मियाभाई  कि डेअरिंग अल्ला जवळ आहे . म्हणुन तो रईस  आहे . आणि इस्लामी बंद्यांचि लढाऊ धर्मभावना जागृत रहावी म्हणून अल्ला इब्लीस काफिर आणि नापाक शराब बनत असते  . त्यामुळे अल्लाहने   काफ़िरंच्या हृदयावर अज्ञानाची मोहोर ठोकली आहे . आणि बनिया दिमाग वापरात डेअरिंग मात्र मियाभाय ला आंदण दिले आहे .  यामुळे इमान म्हणजे श्रद्धा मजबूत राहते .

इमान म्हणजे काय ?
 (१ ) अल्लाह त्याचे (२) देवदूत , देवदूत सांगतात ते (३) कुराण , कुराण देवदुताने ज्याला सांगितले तो  (४) प्रेषित मुहम्मद आणि कुराणानुसार वागल्यास (५) अंतिम निर्णय दिनी  होणारा अल्लाचा फैसला स्वर्ग कि नरक ? या पाच गोष्टीवर श्रद्धा ठेवण्याला इमान  असे  इस्लाम धर्मात म्हणतात.  यातले एकही खोटे म्हणून चालत नाही कारण प्रत्येक गोष्ट दुसर्यावर अवलंबुन असते . एकाला मानले नाही तर दुसरे खोटे ठरते ….  क्रमाने सारेच खोटे ठरते .



आता हे ईमान कायम ठेवणे हि अल्लाची जवाबदारी नसून मोमिनांचि जवाबदारी आहे . अल्लाने  काफिर आणि क्वार्टर का तयार केले ?  असा उद्धट प्रश्न विचारू नये हे खरेच .... पण कोण्या इमान वंताच्या  टाळक्यात हे प्रश्न आलेच  तर अल्लाहने कुराणात त्याचे उत्तर देऊन ठेवले आहे . ते उत्तर असे आहे:

                                                     कुराण ३:५४ ومكروا ومكر الله والله خير الماكرين

हे ( काफिर) अल्लाविरुद्ध कट करतात आणि अल्लाही त्याविरुद्ध कट करत असतो . अल्ला हा सर्वश्रेष्ठ कटकर्ता आहे . या अरबी आयातीत  मक्कार (कपटी) हा मुळ धातू वापरला आहे . हा शब्द मराठीतही आल्याने त्याची  अर्थछटा  आपणास माहित आहेच ! अशा अर्थाच्या अनेक आयती कुराणात आहेत . त्या एकत्रित रित्या इथे पाहता येतील  

एकुणात काफ़िरांच्या हृदयावर  अल्लानेच अज्ञानाची मोहोर ठोकली आहे . मग क्वार्टर नावाची सैतानी गोष्ट हि अल्लाच्या अशाच  व्यापक कटाचा भाग असते .दारू पिऊ नये कारण दारू पाजून मुस्लीमात फूट पाडणे हा सैतानाचा डाव आहे असेही अल्लाने एका ठिकाणी म्हटले आहे.   (कुराण ५ : ९०, ९१) 

 कधीकधी सैतान अल्लाहला भारी पडतो , किंवा तोही अल्ला च्याच कटाचा एक भाग असतो . एकून मामला गोलं गोल  आहे . असले बौद्धिक प्रश्न विचारीत बसण्यापेक्षा सरळ अल्लाच्या आज्ञेचे पालन करावे आणि स्वर्गात जागा बुक करावी . स्वर्गात मात्र अल्लाने दारूची सोय केलेली आहे .कुराणात स्वर्गातल्या दारुविषयी असे म्ह्टले आहे -  


                                                                             कुराण ४७:१५ 

                                                           47:15

कुराणातल्या स्वर्गात केवळ दुध , तूप आणि मधाच्या नद्या नाही , जे पितात त्यांच्यासाठी दारुच्या नद्या सुद्धा आहेत .          कुराण ४७:१५ 

पण हि दारू पिणाचि परवानगी जे इमान्वंत बंदे स्वर्गात जातील त्यांनाच आहे . भूलोकात दारुबंदी आहे .
 अर्थात हि दारू स्वर्गीय असल्याने ती चढत नाही ! आता चढत नाय तर प्यायाचीच कशाला ? असा चावट प्रश्न कुणि विचारू नये ! अल्लाला चावटपणा आवडत नाही !!



ख्रिस्त्यांचा गॉड : मद्यसमर्थक भगवान 

हिंदुचे देव काही दारूचे विरोधक नाहीत . अल्लाने स्वर्गात  फक्त दारू दिली आहे . पण हे दोघेही बळच कर दारुबंदिचा आग्रह धरत असतात. गॉड त्या मानाने बरा ! त्याचे देवदास सतत पीत असतात . ख्रिस्ती पाद्री वाइन घेतात. येशूचे रक्त आणि मांस म्हणुन पाव आणि वाइन चर्च  मध्ये वाटली जाते . इथे हा प्रसाद आहे हे ध्यानात धरावे . येशूच्या देवदासांनि कधीही दारुचा निषेध केलेला नाही . पण इतर वाइट गोष्टी का घडतात ? दुष्काळ , पूर , भूकंप हे सारे का घडते ?






पापी सैतान कधी कधी देवाला वरचढ ठरून अशी कामे करतो . हि वाट बायबल मध्येही मोकळी आहेच .जेनेसिस हा बायबलचा पहिला अध्याय त्याची पहिली ओळ म्हणते कि देवाने स्वर्ग आणि पृथ्वी बनवली . (जेनेसिस १:१) आता जे त्या देवाने बनवले ते त्याच्याच इच्छेने चालणार ! पाश्चात्य बुद्धिवाद्यांनी हा प्रश्न अनेकदा चर्च ला विचारला आहे . त्यासाठी बायबल मधीलच काही व्हर्सेस काढून दाखवल्या आहेत . उदा बायबल मधील खालील श्लोक पाहू .




Deuteronomy 11:17

 then the anger of the Lord will be kindled against you, and he will shut up the heavens, so that there will be no rain, and the land will yield no fruit, and you will perish quickly off the good land that the Lord is giving you.

  देव चिडला कि दुष्काळ , भूकमारी , रोगराई , वणवे आणि भुकंप होतात असे वर्णन बायबल मध्ये ठीक ठिकाणी येते.  (उदा : James 5:17. आणि  Numbers 16:30-34). सीन म्हणजे पापमुक्ती नावाची कल्पना ख्रिस्ती धर्मात मध्यवर्ती  आहे . मनुष्य पापी असल्याने त्यावर देवच संकटे ढकलतो  Romans 8:19-21.  मुळात मनुष्य हा देवाचे बाळ असला तरी तो पापी आहे . एडम इव्ह ने ज्ञान वृक्षाचे फळ खाल्ल्यापासून  मनुष्य पापी आहे . मग बिचारे चर्च या माणसाला पाप्तून मुक्त करण्यासाठी येशूची दिक्षा देत फिरत असते . आणि त्याउप्पर हे सारे देवाचेच प्लानिंग आहे तो वाइटातुन चांगले काढतो , अशी मखलाशीही आहे . (Romans 8:28).

कदाचित त्यामुळेच भुकंप , पूर इत्यादी  काही आले कि तेथे चर्च धावून जाते आणि सेवाकार्यातून येशूच्या धर्माचा प्रसारही करते. वाइटातुन ख्रिस्त्यांसाठि  चांगले घडते ते असे !!




समारोप 


ख्रिस्ती देव मद्य समर्थक आहे . त्याचे देवदास दु:ख आणि रोगराई बरी न करता तिथे जाउन पाप मुक्तीचे धार्मिक औषध वाटत फिरतात. अगदी मदर तेरेसाही रोग्यांना बरे न करता त्यांची सेवा करत त्यांना पाप मुक्तिकडे घेऊन जात असे . त्यावरील पुर्ण लेख येथे वाचता येईल .  मुस्लिमांचा अल्लाह स्वर्गात दारू देण्यास तयार आहे , पण त्यासाठी अट हि कि भूतलावर धर्म सोडुन इतर कोणतीही नशा करायची नाही . हिंदुचा देव त्याहून भिन्न आहे . त्याच्या पुनर्जन्माच्या सिद्धांताला खुद्द देवाचीही गरज भासत नाही इतका तो मुलभुत आहे … आणि सर्व दु:खांची उत्तरे पूर्वजन्मीच्या कर्मात तिकडे मिळुन जातात . 

अगॉद  हि सगळी लबाडी आहे असे म्ह्टले तर भावना दुखवायचा संभव आहे . पण खरोखर हि काही लबाडिच असावी असे वाटत नाही … मानवी विकासाच्या रानटी  टप्प्यावर जेंव्हा अनेक उत्तरे मिळत नव्हती तेंव्हा माणसाच्या डोक्यातून देव जन्माला. पाउस का पडतो ? फुले का फुलतात ? आंबा गोड का लागतो ? या प्रश्नांची उत्तरे देवाने दिली . पण खरा अवघड प्रश्न पुढे आ वासून उभा होता …। 

दुष्काळ का पडतात ? भुकंप का होतात ? रोगराइत माणसे का मरतात ? देवाने क्वार्टर का बनवली ?

अगॉद  देवाला याचे उत्तर देता येईना … मग माणसाच्याच मेंदुतुन धर्म जन्मला असावा . त्याने अल्लाचे कट , ख्रिस्त्यांचे पाप हिंदुचे कर्म वगैरे शोधून काढले असावे .  देवाच्या आणि पर्यायाने धर्माच्या नावे नीतीनियम सांगायची पद्धत चालू झाली असावी . 

आज आपल्याला यातील बहुसंख्य गोष्टींची माहिती आहे . भूक , रोगराई , भूकंप आणि दुष्काळ का पडतात ? ते आपल्याला माहित झाले आहे . अनेक रोगावाराची औषधे हि मिळाली आहेत . जीवसृष्टीची निर्मिती कशी झाली ? आणि खगोलशास्त्रातील  अवकाश कसे आहे ? याबाद्दल आपल्याजवळ बरीच माहिती आहे . कोणत्याही ध्र्म्ग्रंथात हि माहिती नाही . हे देवालाही माहित नाही , कारण या देवाचा जन्म ज्या आपल्या रानटी  पुर्वजांच्या मेंदुतुन झाला.  त्यांना ती माहिती नव्हती . पण आता अगॉद   देव आणि धर्म याचे काही प्रयोजन उरते काय ? 

तरीही देव अजून शिल्लक आहेतच. धर्मही आहेत . ते अधिक अधिक टोकदार बनत आहेत .  हिंसक बनत आहेत . प्स्युडो सायन्स ची निर्मिती कारून आजचे रानटी  लोक देवा धर्माला जगवू पाहत आहेत. धार्मिक पूर्वजांना लबाड म्हणण्यात अर्थ नाही . त्याकाळी ज्ञान फार सीमित होते … पण आजच्या धर्म धुरिणांना लबाडच म्हणावे लागेल . वा दया दाखवून मूर्ख अंधश्रद्धाळु इतकेच म्हणता येईल . 

मानवी जीवनात भावनेला महत्वाचे स्थान आहे . आणि फारसा विचार करायच्या भानगडीत आपण  पडत नाही . ज्या दिवशी विचार केला त्यादिवशी  धर्म संपला . देव मेला. जर देवा धर्माविरुद्ध लढायचे असेल तर नव्या नास्तिक अस्मिता , नवे नास्तिक देव , नवे नास्तिक पंथ कामाचे नाहीत . ती वाटचाल विरुद्ध दिशेने असेल . लोकशाही मार्गाने चर्चा करून . विचार फुलवत नेउन यातून मार्ग मिळेल आणि नव्या नास्तिक  नैतिक पायावर मानवता उभी करता येईल . 

नीती आणि तत्वज्ञान याचा विचार आणि चर्चा सुरु केली कि फटाफट सारे अगॉद  देवधर्म मरून पडू लागतात . 


आगामी : 
नास्तिक पुराण भाग ३  : नास्तिकता :   थोडे नैतिक थोडे अध्यात्मिक 

१)  माझ्या कारट्याचे देव : http://drabhiram.blogspot.hk/2015/10/blog-post_10.html
२) देवाने क्वार्टर का बनवली ? : 
३) नास्तिकता :   थोडे नैतिक थोडे अध्यात्मिक  
४ ) माणुसकीचा झरा : नास्तीकता 



१९ ऑक्टो, २०१५

एका चित्राचा इतिहास : अणि एक जिनियस चित्रकार

तुम्हाला जुने नोकिया फोन आठवतात का ? त्यात कन्नेक्टिंग  पिपल म्हणून सुरवातीला हाताला हात लागत असे . त्याला काही संदर्भ बायबलचा आहे . मायकेल एंजोलोचे अजरामर चित्र त्याच्याशी मिळते जुळते आहे . त्याआधी आपल्याला ज्यू , ख्रिस्ती आणि इस्लाम या सेमेटिक धर्मातला परस्पर संबंध समजावून घ्यावा लागणार आहे .








ज्यू - ख्रिस्ती - इस्लाम  असा तो काल प्रवाह आहे  . पहिल्यातून दुसरा आणि दुसर्यातून तिसरा धर्म आला .
ख्रिस्ती लोकांचे बायबल जुना ज्यू करार मानते - पण देवाने केलेला नवा करार म्हणजे म्हणजे येशु मुखाने आलेली वाणी होय अशी त्यांची श्रद्धा आहे . इस्लाम मुहम्म्दाला शेवटचा प्रेषित मानतो .

 हे सगळे स्वत:च्या आधीच्या ईश्वर दत्त प्रेषीतांना मानतात . पण पुढच्या प्रेषीतांना मानत नाहीत . म्हणजे . ज्यू लोक्स येशूला भामटा मानतात म्हणून त्याला क्रुसावर चढवून ठार मारतात . पण हि श्रद्धा दोन्ही बाजूने आहे . इस्लामी लोक्स  येशुला मानतात . पण शेवटचा प्रेषित म्हणून मुहम्मदाचे नाव घेतात . या आधीचे प्रेषित मान्य पण जुने धर्म मान्य नाहीत अशी ती गोंधळि भूमिका आहे .  प्रेषित म्हणून अरबस्तानात उगवलेले इतर लोक्स मुहाम्म्दाने तोतये प्रेषित म्हणून जाहीर केले . आणि नंतर तोतये प्रेषित मारून टाकले .

 एडम मात्र या सगळ्यांचा सेमेटिक प्रथम पुरुष आणि मनु   आहे .

या खालच्या चित्रात  जो नागडा माणुस  दिसतो आहे . तो एडम होय .तो पहिला माणुस . या सेमेटिक धर्मांचा युग मनु .  ज्यू , ख्रिस्ती , इस्लाम आदी सेमेटिक धर्मानुसार देवाने पृथ्वी बनवली - माणुस बनवला - प्रकाश बनवला . एण्ड द ग्वाड सेड लाइट - एण्ड देअर वोस लाइट - हे वाक्य बायबलच्या पहिल्या पानावर येते . बायबल जुना करार आणि नवा करार अशा दोन भागात आहे . ओल्ड टेक्स्टामेंट - जुना करार म्हणजे ज्यू लोकांचा धर्म ग्रंथ होय .

हे चित्र मायकेल एंजेलो चे आहे . या बुद्धिमान आणि प्रतिभावान मायकेल एंजेलो चे  नाव लिओनार्डो दा विंची बरोबर घेतले जाते . गेल्या पाच शतकात युरोपात जे प्रबोधन झाले त्याचे हे दोन  आधार आहेत . व्होल्तेर इतकेच त्यांचे महात्म्य आहे .

 मायकेल एंजोलेचा ख्रिस्ती  केथालिक  पोप शी पहिल्यांदा संबंध १५०५ साली येतो . पोप त्याला स्वत:ची कबर बनवायची आज्ञा देतो .मेल्यानंतर पोप ला स्वत:ची एक सुंदर कबर असावी असे वाटते .  मायकेल ला भरपूर पैसे देऊन बोलावण्यात येते … पुढे  काहीतरी फाटते आणि मायकेल पळुन जातो . त्याला पैशावरून चोर म्ह्टले जाते . पण चर्च या प्रतिभावान कलाकारास टाळू शकत नाही … पुढे त्यास व्हेटिकन चर्च वर चित्रे काढण्याचे कोण्ट्र्याक्ट दिले जाते . मायकेल ऐकत नाही । त्यावर  प्रचंड राजकीय दबाव टाकला जातो ।

पंधराव्या शतकातले चर्च हा प्रकार निट समजून घेतला पाहीजे . हजारो स्त्रियांना जिवंत जाळून मारण्यासाठी यांनी विच हंट चे कार्यक्रम चालवले  आहेत . पोप ला लाच देऊन स्वर्ग मिळवता येतो . आणि त्यासाठी मरताना स्वत:च्या कबरीत पोप ने देवाला लिहिलेलि  चिट्ठी ठेवावी लागत असते . ह्या चिट्ठ्या रोमन केथोलिक चर्च विकत असे . हे चर्च आणि पोप लोक्स ….  मायकेल एंजेलो नावाच्या बुधिमंताला  फारसे आवडत नसतील तर तो दोष त्या काळच्या चर्चचा आहे . पण पुढे  या बुद्धिमान मूर्तीकाराला चर्चने मारून मुटकून चित्रकार बनवले आणि - व्हेटिकन च्या भिंती रंगवण्याचि सक्ती केली .







हे चित्र मायकेल एंजोलोने काढलेले अजरामर चित्र आहे . त्यात नागडा एडम हा सेमेटिक युगमनु अर्ध मृतावस्थेत दिसतो . एडमचे पडिक जननेंद्रिय आणि त्याचा पडलेला हात त्याच्या मृतावस्थेची साक्ष आहेत . म्हातार्या बलवान दाढीवाल्या देवाने त्याच्या हाताला स्पर्श केला तर , तो जिवंत होणार आणि - भूतलावर जीव सृष्टीची निर्मिती होणार . मायकल एंजेलो  नावाच्या प्रज्ञावंताने उभा केलेला हा अर्धमृत एडम खरोखर पहाण्यासारखा आहे . हे चित्र मायकेल ने पवित्र व्हेटिकन मधील सर्वात महत्वाच्या सिस्टिन चेपेल मध्ये काढले आहे .

खरी गंमत यापुढेच आहे . ख्रिस्ती परंपरेत देवदुतांना पंख दाखवले जातात . मायकेल ने काढलेल्या चित्रात देवदुतांना पंख नाहीत . सारे देवदुत देवाला धरून लटकत आहेत . देव ज्या पोकळीतून बाहेर येतो आहे … ते  पोर्टल निट पहा . ते मानवी मेंदुचे क्रोस सेक्शन आहे . म्हणजे एडम  ला देवाने जिंदगी  दिलेलि  नसून . मानवी मेंदुतुन देवाची निर्मिती झाली असे मायकेल एंजेलो ला सुचवायचे आहे .

देवाने माणुस नाही बनवला - माणसाच्या मेंदुतुन देव जन्माला 


देव हि संकल्पना मानवी मेंदुतुन निर्माण झाली असे स्पष्ट  पणे सांगणारी हि कलाकृती …. केथोलिक ख्रिस्त्यांच्या सर्वात पवित्र चर्च -व्हेटिकान मधल्या - सर्वात महत्वाच्या सिस्टिन चेपेल मध्ये मायकेल एंजेलो ने चीत्तारून ठेवली आहे . सलाम त्याला !






या युगमनु  एडम ने पुढे कंटाळा आला म्हणून देवाला म्ह्टले इव्ह (स्त्री )  दे . मग देव म्हटला फुकट काय मिळत नाही . मग  एडम ने छातीतली एक बरगडी देवाला तोडुन दिली . देवाने त्यातून इव्ह नावाची स्त्री तयार केली … त्या दोघाना सैतान सापाने ज्ञान वृक्षाचे फळ खाण्याची चुगली केली … एडम आणि इव्ह ने ज्ञान वृक्षाचे फळ खाल्ले मग देव चिडला . त्याने चिडून शाप दिला . म्हणून मानवी जात मर्त्य आहे … अन्यथा माणुस अमर होता.

ज्ञान मिळवले हे पहिले पाप … तेच पाप पिढ्यान पिढ्या चालू आहे . हे जे ज्ञान फळ आहे त्याला बायबल मध्ये (सफ़रचंद ) एप्पल म्ह्टले गेले आहे . हे अर्धे खाल्लेले एप्पल पुढे स्टिव्ह जॉब्स ने आपल्या कोम्पुटर बनवणार्या  कंपनीचे बोधचिन्ह बनवले .  ज्ञानाचा प्रवाह अव्याहत चालू आहे . सर्व धर्माची धर्मसत्ता मेली . शिल्लक मरत जाणार आहे .  सनातनी  चर्चच्या छाताडावर प्रतिभावान मायकेल इंजेलो ने कोरलेले चित्रशिल्प आजही आपला ठसा शाबूत ठेउन  आहे .



१८ ऑक्टो, २०१५

भन्नाट तरी नेमका - शोध !


मुरलीधर खैरनार यांनी लिहिलेली  शोध हि कांदबरी … मी विकत घ्यायच्या आधीपासूनच वाचत होतो .  फ़ेसबुकावार त्याच्या नोंदी येत . त्याने उत्सुकता चाळवली गेली होती . संजय सोनावणि शोध मुरलीधर खैरनार

नास्तीकाची ओळख

 नास्तीकाची ओळख

रसेल चे पुस्तक " मी ख्रिश्चन का नाही ?" असे आहे…  भगत सिंगचे पुस्तक " मी नास्तिक का आहे ?" असे आहे . या दोन्ही भूमिका संपुर्ण  पणे वेगळ्या आहेत . पौर्वात्य आणि पाश्चिमात्य धर्मात भरपूर फरक आहे . त्यामुळे दोन्हीकडच्या नास्तिकांच्या भूमिका वेगळ्या असणार आहेत .

भारतातील सामाजिक प्रश्न , धार्मिक संघर्ष आणि बुद्धिवाद या सर्वाला एकाच वेळी हात घालायचा असेल तर प्रश्न अधिकच जटिल  बनतो .


मी नास्तिक आहे काय - हो
माझा  धर्म हिंदु / सनातन आहे काय ? - नाही
पाश्चिमात्य (सेमेटिक ) धर्म आणि भारतीय धर्म यात फरक आहेत काय - हो
भारतीय धर्म अधिक चांगले आहेत काय ? नाही . दोन्ही वाईटच आहेत
हिंदु म्हणजे काय ? - ऐतिहासिक  उत्तर सांगता येत नाही . कारण असे काही अस्तित्वात नव्हते


मी हिंदु नास्तिक आहे काय ? नास्तिक मी निश्चित आहे .  हिंदु किंवा अगदी ब्राम्हण हि ओळख सुद्धा पुसणे अशक्य आहे.

हिंदु असणे आणि जात नाकारता येते का ? - हो नाकारता येते . पण इतरांच्या मनातून ती जात नाही . त्यासाठी अनेक पिढ्या प्रयत्न करावे लागतील.

जर सामाजिक प्रश्न , धार्मिक संघर्ष आणि बुद्धिवाद या सर्वाला एकाच वेळी हात घालायचा असेल तर स्वत:ची ओळख पुसण्याचा फारसा उपयोग नाही . कारण वाचक किंवा श्रोते ती ओळख अध्यारूत  ठेवणार आहेत .  जे आहे ते वास्तव स्वीकारून. बदलण्याचा प्रयत्न करणे अधिक इष्ट आहे .

हिंदू - मुस्लीम - किवा इतर कोणताही लोकांबद्दल सारखेच प्रेम बाळगून त्यात बुद्धिवाद , विज्ञान निष्ठा आणि आधुनिक सामाजिक विचार याचा प्रसार करणे अधिक महत्वाचे आहे . वाद विवाद प्रसंगी स्वत:ची ओळख (इतरांच्या मनातील ) गृहीत धरावी लागते . त्यावर भाष्यही करावे लागते . त्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही . अर्थात हे माझे सध्याचे मत अनुभवातून बनले आहे . बदल करायला कायमच उत्सुक आहे .
- अभिराम

नासदीय सूक्त

१७ ऑक्टो, २०१५

सावरकरांचा बुद्धिवाद


सावरकरांचा बुद्धिवाद 

महाराष्ट्राचे गमतीदार विचार विश्व 



सावरकरांचे  गायीबद्दलचे विचार एकिकडे - त्यांचे हिंदुत्व दुसरीकडे , मुस्लिम विरोध एका टोकाचा आणि १८५७ च्या पुस्तकातली इस्लाम स्तुती दुसर्या टोकाला , वेद हे पाच हजार वर्ष जुने ग्रंथ असतील तर ते पाच हजार वर्ष मागासलेले ग्रंथ आहेत असे म्हणणारे बुद्धिवादी सावरकर एका बाजुला आणि  हिंदुसभेचे  अध्यक्ष दुसर्या बाजूला !

महाराष्ट्राच्या गमतीदार विचार विश्वाला सावरकर विचार विसंगत वाटतात ! पण ते योग्य नाही !
  
नवे शिकत सतत विचार बदलत जाण्यात काहीच चूक नाही .  भारतीय विचारपटलावर  सावरकर नावाचा बुद्धिवादी त्याच्या प्रज्ञेने चमकून उठला पण कालगतीत त्यांचा बुद्धिवाद मात्र विस्मृतीत गेला. आज जे हिंदुत्व वादि  सावरकरांना पूज्य मानतात ते बुद्धीवादाशी दूरान्वयेही संबंधित नाहीत आणि पुरोगामी म्ह्णविणार्याना सावरकरांशी सोयरसुतक नाहि. हि गमतीची परिस्थिती का बरे उद्भवली असावी ?   सदर लेखात या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे. 

महाराष्ट्राच्या विचार विश्वात मोठ मोठी आंदोलने झालेली आहेत. विद्रोह इथे नवा नाही. पण धर्म  संस्कृतीचे जू फेकून देऊन कोणतीही पुरोगामी परंपरा शोधण्याच्या भानगडीत न पडता,  नीतिमत्तेचे निकष आपण ठरवू पाहतो काय ? हा विचारार्ह प्रश्न आहे.  


बुद्धिवाद म्हणजे काय

  इस्लाम हि  विचारधारा आपण उदाहरण म्हणून घेउ.  इस्लामी पंडित योग्यतेचे निष्कर्ष कुराण पाहून ठरवणार आहे. बुरखा घालावा कि नाही ? याचे उत्तर शोधण्यासाठी कुराणाकडे चला अशी हाक इस्लामी धर्म पंडित देईल . बहुसंख्य इस्लामी  पंडित कुराणा नुसार बुरखा घातलाच पाहिजे असे आग्रही मत मांडतील. काही मोजके इस्लामवादी कुराणातल्या आयतिंचे (श्लोकांचे) उलट सुलट अर्थ लावून - बुरखा घातला नाही तरी इस्लामला चालते ! अशी भूमिका घेतील . या प्रकारच्या मोजक्या इस्लामवाद्यांना महाराष्ट्र  पुरोगामी म्हणत असतो.  हमीद सारखा एखादा अपवाद सोडता पुरो आणि प्रतिगामी मुसलमान योग्य अयोग्यतेचे निष्कर्ष कुराण पाहून ठरवणार आहेत. बुरखा घालावा कि नाही ?  याबद्दल वेग वेगळी मते पहावयास मिळतील. पण त्याचा आधार मात्र कुराणात शोधला पाहिजे यावर एकमत आहे. कुराण वाद मान्य आहे . मतभिन्नता फक्त त्यातील अरबी शब्दांच्या अर्थाबद्दल आहे  .  हा बुद्धिवाद नाही . ग्रंथ प्रामाण्य आहे . 

 महात्मा गांधी, दयानंद सरस्वती,  विवेकानंद  यांनीहि  बहुतांश वेळा हिंदु धर्मातील सुधारणांबाबत अशीच ग्रंथ प्रामाण्य वादि भूमिका घेतली आहे. हा बुद्धिवाद नाही .   

सावरकर म्हणतात " सर्व   धर्म ग्रंथांचे  स्थान  ग्रंथालयातिल कपाट ! आज कसे वागायचे त्याचा निर्णय आम्ही बुद्धीने घेऊ ! राम आणि कृष्ण , गीता आणि वेद हे वंदनिय पूजनीय आदरणीय ग्रंथ ! आज आचरणीय नाहीत , अनुकरणीय नाहीत !!" 

नीतीमत्तेचे निकष कोणते असावेत ? धर्म ग्रंथ नव्हे बुद्धी ! असे जो म्हणतो त्यास बुद्धिवादी असे म्हणता येइल. श्रुति (वेद)  स्मृती  पुराणोक्त आचार धर्माचा विध्वंस हवा अशी सावरकरांचि गर्जना आहे.


बुद्धिवाद  आणि हिंदुत्व वाद 



बुद्धिवादी मनुष्य धार्मिक असू शकत नाही ,  रुढार्थाने हिंदुत्व वादि हि असू शकत नाही.  तरीही बुद्धिवादी सावरकर हिंदुत्व वादी कसे काय झाले ? याचे आकलन झाल्याशिवाय   त्यांच्या बुद्धीवादाचे आकलन होणार नाहि. नवे शिकत सतत विचार बदलत जाण्यात काहीच चूक नाही . मते बदलणे- नवे शिकणे हा बुद्धीवादाचाच एक आयाम आहे.  सावरकरांचे विचार कालानुक्रमे पाहू . १) समाजवादी क्रांतिकारक, २) अंदमानचे नास्तिक , ३) रत्नागिरीचे समाजसुधारक आणि ४) हिंदुत्वाचे भाष्यकार या त्यांच्या आयुष्यातल्या चार टप्प्यावर त्यांनी बुद्धिवाद , धर्म आणि हिंदुत्व याविषयी व्यक्त केलेली मते पाहुया.  


१ ) समाजवादी  क्रांतिकारकांचा राजपुत्र  : साल १९०७ वय वर्ष 

१९१० पर्यंत  सावरकरांचे  मुख्य सहकारी  समाजवादी होते. मादाम भिकाजी रुस्तुम कामा यांनी स्टुटगार्ड च्या आंतर राष्ट्रीय परिषदेत स्वतंत्र भारताचा नवा  ध्वज फडकावला होता .  या  तत्कालीन ध्वजाचे  करते डिझायनर सावरकरहि  होते . हि  स्टुट्गार्ड ला भरलेली समाजवादी परिषद होती . (२२ ओगस्ट १९०७) .



मादाम भिकाजी रुस्तुम कामा 




हिंदु , मुस्लिम आणि बौद्ध यासाठी तीन रंग , हिंदु मुस्लीम एकतेसाठी  सूर्य चंद्र आणि तत्कालीन भारतातील आठ प्रांत (प्रोव्हिन्स ) दर्शवणारी आठ कमळे असा हा सर्व धर्म समभावी ध्वज -  हिरव्या रंगाचे स्थान सर्वात वर आहे


याकाळात  सरोजनी नायडुंनि - क्रांतीकारकांचा राजपुत्र  असे संबोधन सावरकरांना वापरले होते. ते एक सार्वत्रिक समकालीन आकलन होते.

अभिनव भारत हे नाव सावरकरांना मेझीनिच्या यंग इटाली वरून सुचले आहे. अभिनव भारत संस्थेने इंग्लंड बर्यापैकी दणाणून सोडले होते . मेझिनी हा लोकशाहीवादी आणि समाजवादा कडे कल  असलेला विचारवंत आहे.  सावरकर लंडन मध्ये शिकत असताना शामजी कृष्ण वर्मांच्या संपर्कात आणि संस्थात एकरूप होते . शामजी कृष्ण वर्मा हे इंग्लंड मधील समाजवादी , मुक्त चिंतक (फ्री थिंकर्स ) उदारमतवादी युरोपियनांच्या  चांगलेच संपर्कात होते . या गटात अनेक मुस्लिम क्रांतिकारी सामील होते . मिर्झा अब्बास , असफ अली , सिकंदर हयात खान यांच्याशी सावरकरांचा परिचय आणि मैत्री याच काळात घडली आहे . मिर्झा अब्बास यांनी इंग्लंडमधुन भारतात पिस्तुले पाठवण्याच्या कामी सावरकरांना सहाय्य केले होते . असफ अलिंनि  आपल्या मित्राचे वर्णन करताना लिहिले आहे " सावरकर हा माणुस तलवारीच्या धारी सारखा तल्लख आणि   पर्वतावरच्या धबधब्यासारखा  अस्वस्थ आहे. जेमतेम वीस  वर्षाचा हा देशभक्त त्याच्या संपर्कात येणार्या  प्रत्येक व्यक्तीच्या मनावर गारुड घालत  जातो  " संदर्भ :(5 Stormy years: Srivastav Pg 25,1983 ).

 

अभिनव भारत संस्थेचे तरुण क्रांतिकारक

 (डावीकडून )
 
उभे - मित्रा, एम पिटी आचार्य हरनाम सिंग,  सैय्यद हैदर , राजन , गाय अलरेड
बसलेले - व्हीव्ही एस अय्यर , शर्मा ,विनायक  सावरकर , निरंजन पाल , आर एम खान अमीन 

सावरकरांनी इंग्लंड मधून काही ब्राउनिंग पिस्तुले भारतात पाठवली होती. त्यातल्या एकाचा वापर करून अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर जेक्सन ला यमसदनी धाडले. लंडन येथे  मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला ठार मारले या दोन्ही कारस्थानाचे  सूत्रधार म्हणून अटक झाली . ब्रौनिंग पिस्तुले आणि जहाल शिकवण दोन्हीही सावरकरांची होती.   लहानपणीच घरातल्या त्यांनी अष्टभुजा देवीसमोर स्वातंत्र्यासाथि मारण्या मारण्याची शपथ घेतली होती . भारतात क्रांतियुद्ध पेटवणे हा त्यांना ईश्वरी संकेत वाटत असे. या काळात ते सर्व धर्म समभावी  आणि ईश्वरावर श्रद्धा असलेले आस्तिक होते.  कैद झाल्या नंतर अटकेतल्या  आस्तिक सावरकरांनी क्रांतीकारी मित्रांना लिहिलेले शेवटचे पत्र -  





२) अंदमानचा नास्तिक  : साल १९११ वय वर्ष अट्ठावीस


 १९११ साली सावरकरांना ५० वर्षाची शिक्षा ठोठावली गेली. त्यातली ११ वर्षे सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात काढली आहेत. हि अकरा वर्षे हालाखीची , श्रमाची , कोलूची , विजनवासाची आहेत . येथे सावरकरांच्या राजकीय भूमिकेत प्रक्षोभ आढळतो .  या काळात सावरकरानि   दीर्घ वाचन - लेखन केले.   साहित्य - इतिहास - कविता याबरोबरच सामान्य कैद्यांचा सहवास त्याना लाभला . इथे सावरकर नास्तिक (अज्ञेय वादी) बनतात.

तुरुंगातील कष्ट आणि हाल सोसताना त्यांच्या मनात येऊ  पाहणारे आत्महत्या , सृष्टीचे ध्येय , मनुष्याचे ध्येय आदी विचाराचा बौद्धिक काथ्याकुट करताना ते लिहितात:
"कसले स्वत:चे कर्तुत्व घेऊन बसला आहेस ? तुझे,  त्यांचे, ह्या सर्व मनुष्यजातीचे काय पण ह्या सूर्याचे देखील ह्या प्रचंड विश्वाच्या उलाढालीत तिळमात्र तरी महत्व आहे काय ? " (माझी जन्मठेप २:८४ )
हाच विचार पुढे त्यांच्या एका लेखात अधिक विकसित झालेला  आहे : - " मनुष्य जातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले आणि प्रतिकूल ते वाईट अशी नीती - अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे . देवास आवडते ते चांगले - आणि मनुष्याला  जे सुखदायी ---- तेच  देवाला आवडते----- ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत ; कारण त्या असत्य आहेत . " (संदर्भ ६:६)




सावरकर लिहितात : - 

" अकराशे आठ सत्यनारायणांच्या पूजा केल्या तरी ऐहिक यश मिळणार नाहि. …. सारे जग निर्देव करू निघालेला रशिया आज परम बलिष्ठ म्हणून यशस्वी झालेला आहे. …. श्रीकृष्णाची द्वारका समुद्रात बुडाली , प्रत्यक्ष मादिनेतली मशीद घोडशाळा बनली  , जेहोवा चे सुवर्ण मंदिर तडकले , जीजसला रोमने कृसिफाय केले । रामास हराम समजणारे सुद्धा वैज्ञानिक बळाने यश मिळवू शकतात.….  अद्ययावत वैज्ञानिक सामर्थ्य संपादावे … चळवळीत ते  सामर्थ्य असेल तर भगवंताच्या अधिष्ठानावाचून काही अडत नाही. ते सामर्थ्य नसेल तर कोटि कोटि जप केले तरी काही फरक पडत नाही . हाच सिद्धांत !''   (संदर्भ ६:१३)

अंदमानातला छळ ,  मानसिक त्रास, विजनवास, दीर्घ एकांत, चिंतन यातून सावरकर नास्तिकते कडे झुकू लागतात . आणि सर्व धर्मांची चिकित्सा करू लागलेले दिसतात. हे त्यांचे तत्वचिंतन आहे. मनुष्याचा देव त्यांनी नाकारला आहे आणि विश्वाची आद्यशक्ति (देव) म्हणून वैज्ञानिक नियम ग्राह्य मानले आहेत .
(संदर्भ : ६:६)

###############################################
न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः ।
नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकाः ॥

स्वर्ग नाही, मोक्ष नाही, परलोकीचा  आत्मा नाही 
वर्ण -आश्रम ,  कर्मकांडे फळ  तुला  देणार नाहीत ।। - चार्वाक 
###############################################



काशितली दोन सम्मेलने

२००१ साली प्रकाशित झालेल्या समग्र सावरकर वाड्:मयाच्या पाचव्या खंडातल्या १९८ व्या पानावर  सावरकरांचा एक विनोदी  लेख आहे . त्याचे नाव काशितली दोन सम्मेलने : माकड महासंमेलन आणि भाकड महासंमेलन .  काशी नगरीस ज्ञानवापी असेही म्हणण्याचा प्रघात आहे . तर काशीला ब्राह्मणांचे एक संम्मेलन   भरले होते . श्रुती स्मृती पुराणोक्त धर्म आज लागू आहे काय ? या विषयाचा निवाडा लावण्यासाठी हे आयोजन होते .  त्याचवेळी सावरकरांनी हा लेख लिहिला आहे .  तात्याराव सावरकरांनी आपले एक "" मनकवडे ""  नावाचे काल्पनिक वार्ताहार काशीच्या ज्ञानवापिस पाठवले.……  





तर श्री मनकवडेना दोन संमेलने दिसली --- पहिले संमेलन माकडांचे होते . काशीस पूर्वी माकडे मुक्त संचार करत . अद्वातद्वा उड्या  मारीत शेपटीने झाडास लोंबकाळित --  भू:भु:क्कार करीत माकडांचे दिवस सुखात चालले होते . मग एके दिवशी काशीच्या ज्ञानवापीत वीज आली. विजेच्या ताराही आल्या . विजेच्या ताराना  शेपटी लागल्यावर विजेचे झटके  आणि चटके बसू लागले. मग माकड महासंमेलनात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला . कि विजेच्या ताराना शेपटीने लटकावे का ? काही माकडे म्हणाली " छट्ट  हा प्रश्नच गैरलागू आहे . विजेच्या तारा नावाचा काही पदार्थ असता तर आपल्या त्रिकालदर्शी पूर्वजांनी माकड-स्मृतीत तसे लिहिले नसते काय ? ज्या अर्थी माकडस्मृतीत वीज नाही तर ती आताही अस्तित्वात असू शकत नाही.  शेवटी बराच गिचगीचाट झाला. माकडी भाषेतल्या दुरगम्य चर्चेतून असे निष्पन्न झाले कि - 

परिस्थिती बदलली आहे तेव्हा माकड स्मृतीत बदल केला पाहिजे………………………

 त्याच वेळी अज्ञान वापिस ब्राह्मणाचे दुसरे संमेलन भरले होते त्याचा निष्कर्ष आला कि परिस्थिती हा शब्दच धर्म बाह्य आहे . अधम धर्म विरोधी आहे . शुद्ध संस्कृत भाषेत ओरडतगिल्ला करत …  असा ठराव पास झाला कि परिस्थितीचा पालट विचारात घेणे हा धर्मद्रोह आहे . पाखंड आहे …………… लेखाचा समारोप करताना सावरकर लिहितात " या ब्राह्मण संमेलनातील ठरावामुळे डार्विनच्या उत्क्रांतीवादास मोठाच धक्का बसला . प्राप्त परिस्थितीत माकडाचा विकास होऊन माणुस झाला…. यापेक्षा माणसाचा विकास होऊन माकडे निर्माण झाली हेच मान्य करणे क्रमप्राप्त आहे. अज्ञान वापितले पंडित धर्म संमेलन हेच दर्शवते !"  

ग्रंथ प्रामाण्य आणि श्रुती स्मृती पुराणोक्त आचार धर्माचा सावरकरांना विध्वंस करायचा आहे . 


 ३) रत्नागिरीचा समाज सुधारक : साल  १९२४ वय वर्ष एक्केचाळीस

 अंदमानात सावरकर नास्तिक बनू लागले पुढे धर्म चिकित्से कडे वळले.  प्राप्त परिस्थितीत हिंदूची जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता सावरकरांना मोडायची आहे. सात स्वदेशी बेड्या मोडल्याशिवाय हिंदुना राजकारणात भविष्य नाही असे सावरकर म्हणतात . या सात बेड्यात  रोटिबंदि , वेदोक्त बंदि वगैरे आहेतच पण त्यातली एक बेडी बेटि बंदीची आहे. त्यांनी  या काळात आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केलेला दिसतो .

सावरकरांनि  या काळात हिंदु संघटना हा शब्द आजच्या धार्मिक अर्थाने वापरलेला नाही . जाति  हि विस्कळित अव्यवस्था संपवुन हिंदुना संघटित करुया अशा  अर्थाने वापरला आहे . याच अर्थाने बासाहेब आंबेडकर किवा गांधिनिहि हिंदु संघटना हा शब्द या काळात वापरलेला आहे.



सदर चित्र सावरकरांनी रत्नागिरीत केलेल्या कामाचे वर्णन करणारे समकालीन चित्र आहे. आजची रत्नागिरी असे चित्राचे नाव आहे . 
   

सदर चित्रात हिंदु संघटना नावच्या देवीच्या हातात   विज्ञान नावाचा परशु दिसतो. पोथीजात जातिभेद नावाचा राक्षस हि देवी मारते आहे !  या काळात सावरकरांनि  लिहिलेल्या पुस्तकांची - लेखांची नावे सुद्धा बरेच काही सांगुन जातात . विज्ञान निष्ठ निबंध , जात्युच्छेदक निबंध , अंधश्रद्धा निर्मूलक कथा , क्ष किरणे अशी त्यांच्या संग्रहाची नावे आहेत . जातिभेदाचा पाया वंशवाद आणि पोथिनिष्ठा आहे. " अनुवंश छे ! आचरटपणा !!  " नावाच्या लेखात सावरकरांनि वंशवादि  जन्मजातिचा धुव्वा उडवला आहे .

दोन शब्दात दोन संस्कृती या लेखात पोथिनिष्ठे  बाबत ते  लिहितात : -

" तो युरोप प्रत्यही अधिक काही शिकून अधिक शहाणा होत आहे . बापाहून शहाणा निघालोच कि नाही ? म्हणुन हुन्कारत आहे . बापाला जे कळत नव्हते ते शिकलो । तर बापाचे बापपण काय उरले? ... हि आमची भीती !
हिंदूसंस्कृतीचे महासूत्र म्हणजे स्मृतीश्रुती पुराणोक्त हेच होय ! आजच्या युरोपियन संस्कृतीचे ' अद्यायावत '.... त्याच्या अगदी उलट ! ते पूजक " आज" चे  आम्ही "काल" चे । ते "ताज्या" चे भोक्ते आम्ही "शिळ्या" चे ! एकुण पाहता युरोपियन संस्कृती "अद्यतन"  आमची "पुरातन !
 धर्मग्रंथ पाच हजार वर्षापूर्वीचा धरला तरीही पाच हजार वर्ष मागासलेला ! जग पाच हजार वर्ष पुढे गेलेले .....परंतू अजूनही आजचे विज्ञान न शिकता .....पाच हजार वर्षापुर्वीच्या शहाण पणाहुन  - अधिक शहाणे व्हायचेच नाही असे आम्ही ठरवून बसलो आहोत .
प्रकृती आणि काळ हि असा.... त्या स्वत:स अपरिवर्तनीय आणि त्रिकाल बाधित समजणार्या धर्मग्रंथांच्या ताडपत्रांचा चुराडा उडवीत …सारखा स्वच्छंद धिंगाणा घालीत असता .......त्या ग्रंथांच्या शेवटच्या अक्षरापलिकडे पाउल टाकायचेच नाही …. असा मूर्ख हट्ट धरणार्या लोकांची संस्कृती त्या त्या धर्म ग्रंथाच्या..... प्राचीन मागास संस्कृतीपेक्षा कधीही अधिक विकासु शकणार नाही ..... हे वेगळे सांगायला नको ! " (संदर्भ : ६:६५)   


रत्नागिरीतील सहभोजन 

 सावारकरांनी  अनेक जुनी मंदिरे दलितांना उघडी करून दिली होती , काही आंतरजातीय विवाह लावून दिले होते हे  पतित पावन मंदिरापेक्षा अधिक महत्वाचे आहे. डॉ आंबेडकरांच्या काळाराम  मंदिर प्रवेश सत्याग्रहाला सावरकरांनि  पाठिंबा दिला होता.

डॉ  आंबेडकरांनी या  कामाबद्दल सावरकरांचे  कौतुक करणारे पत्र लिहिले होते.  आंबेडकर लिहितात -
 " नुसति अस्प्रुश्यता जाउन भागणार नाही . चातुर्वण्याचे उच्चाटन झाले पाहिजे . ज्या थोड्या लोकांना ह्याची आवश्यकता पटलि आहे , त्यापैकी आपण एक आहात हे सांगावयास मला आनंद वाटतो " . (कीर लिखित आंबेडकर चरित्र पृष्ठ २३९, सहावी आवृत्ती )
जाती , भाषा , वंश , प्रांत यापलीकडे जाउन हिंदु समाजाने विज्ञान निष्ठ व्हावे , एकसंघ व्हावे असे विचार सावरकरांनी माडले आहेत . असाच बुद्धिवादाचा उपदेश   या काळात  त्यांनी मुस्लिमांना हि केला आहे . अतातुर्क केमाल पाशाने तुर्कस्थानात पुरोगामी सेक्युलर अशी राजवट आणली होती . मुस्लिम पुरोगाम्यात केमाल चे स्थान कोहिनूर हिऱ्यासारखे आहे. केमाल चे कौतुक करताना सावरकर लिहितात -

"धर्म निराळा , निर्बंध (कायदा ) निराळा , एक शब्दनिष्ठ श्रद्धेचा प्रांत , एक प्रत्यक्ष निष्ठ प्रयोगाचा, त्याचा विषय परलोक नि याचा विषय इहलोक " (४:२११)
 रिलिजन आणि स्टेट वेगळे असावेत. धर्माने इहलोकात लुडबुड करू नये. धार्मिक कायदे नको . अशी सेक्युलर (इहवादी)  , विज्ञान निष्ठ भूमिका घेताना सावरकर दिसतात. सावरकरांनी इस्लाम कुराण , मुहम्मद पैगंबर यांची चिकित्सा केलेली आहे पण त्यावर हीन पातळीची टिका केलेली नाही . 

गाय एक उपयुक्त पशू : माता नव्हे ! देवता तर नव्हेच नव्हे !! : सावरकर 

गाय हा एक उपयुक्त पशु आहे . गोमेध वेदातही तुरळकपणे आढळतात. पशुपुजा हीन दर्जाची आहे . पशूचे मूत्र आणि शेण खाणे हि शिवी आहे . श्रद्धा नाही . अशा प्रकारचे सुस्पष्ट विचार सावरकरांनी या लेखात माडले आहेत . 
 या काळात त्यांनी हिंदु  / संघटन वगैरे शब्द   जातिभेद निर्मुलन , विज्ञान निष्ठा,  शिक्षण अशा अर्थाने वापरलेले दिसतात . बुद्धिवाद शिकवणे - भावी भारताची रचना आधुनिक पायावर करणे अशी त्यांची ध्येये  दिसतात. राजकारणात धर्म आणू  नये . विज्ञान निष्ठा बुद्धिवाद शिकवावा म्हणून त्यांनि गायीच्या प्रतीकाची निवड मुद्दाम हून केली आहे .   त्यामागे अतिशय महत्व पुर्ण कारणे आहेत. आधुनिक राज्यशास्त्रातील व्यक्तीस्वातंत्र्य आणि आणी धर्मनीर्बंधाचा निर्णायक सवाल गोहत्या आंदोलना संदर्भात चर्चिला जातो . आणि हे राजकारणाचे एक महत्वाचे वळण असते . त्यातून पुढच्या दिशा ठरतात . एकदा धार्मिक कायदे सुरु झाले कि शरियत चे पाकिस्तान अथवा  स्मृतीचे विषम हिंदुराष्ट्र हा शेवट आहे. रिलिजन आणि स्टेट वेगळे असावेत. धर्माने इहलोकात लुडबुड करू नये. धार्मिक कायदे नको . अशी सेक्युलर (इहवादी)  , विज्ञान निष्ठ भूमिका घेताना सावरकर दिसतात.
  
सावरकरांचे हे असले  विचार बहुसंख्य हिंदुत्व वाद्यांना मान्य होणे शक्य नाही. संघाचे गोळवलकर गुरुजी सुद्धा नाराज झाले होते.  गोळवलकर लिहितात
" सावरकर हिंदु महासभा आदिंचे ….  हिंदुत्व .. निव्वळ प्रतिक्रियावादी आहे... त्यात हिंदु जीवन मुल्यांचा अभाव आहे... आणि  हिंदु सभेला   कोङ्ग्रेसचाच संमिश्र राष्ट्रवाद मान्य आहे " . (विचारधन ५८-५९ भाविसा २००१)  

गोळवलकरांचे आकलन योग्यच आहे !  

मुस्लिम प्रश्न अस्तित्वात नसता तर सावरकरांनी  हिंदुत्वाचे नावही घेतले नसते . तात्यांची जीवनमूल्ये आधुनिक आहेत. आणि हिंदुत्व हे राजकीय भाष्य आहे.  



४)  राजकीय हिंदुत्वाचा जन्म

भारतीय लोकशाहीच्या राजकारणात हिंदुत्व हा शब्द प्रसवण्याचे दायित्व  विनायकाचे आहे ! सावरकर हिंदुत्व वादि होण्यामागे दोन कारणे आहेत : तत्कालीन घटना आणि अभ्यास

१) तत्कालीन घटना : मुस्लिम लीगचा राजकारणातला वाढता जोर, खिलाफत आंदोलन .  मोपल्यांचे बंड , श्रद्धानंद  प्रकरण  

२) अभ्यास  : 
  • इस्लाम धर्म , कुराण याचा अभ्यास सावरकरांनी या काळाच्या आसपास केलेला दिसतो . इस्लाम धर्मात असहिष्णुतेची, धार्मिक हींसेचि,  (शरिया ) धर्मराष्ट्र स्थापनेची आणि काफिर द्वेषाची मुळे आहेत असे  त्यांच्या लक्षात येते . १८५७ चे स्वातंत्र्य समर लिहिताना इस्लामचा गौरव करणारे सावरकर  - आता मात्र सावध भूमिका घेऊ लागतात.  
  • हिंदुंच्या  सनातन  धर्मात असलेल्या मागास कालबाह्य विषम आणि अन्यायी गोष्टी  हळूहळू  त्यांच्या लक्षात येत  होत्या. मोपला बंडात पराभूत हिंदुत  जातिभेद , विषमता , अस्पृश्यता आणि अडाणी पोथिनिश्ठा   भयानक होती हे त्यांना उमजू  लागले .   मला काय त्याचे ?  या कादंबरित या नव्या आकलनाची  साक्ष दिसते . 
यातून सावराकारांचे हिंदुत्व जन्मले. ते धार्मिक नाही . राजकीय आहे .  मुस्लिम आणि ख्रिश्चन नसलेल्या  भारतीय समाजाला  सावरकर हिंदू म्हणतात.  त्यात धर्माचे काही देणे घेणे नाही . ख्रिस्ती आणि इस्लामने  ज्याना काफिर , हिडन , पेगन म्ह्टले आहे त्या भारतीय लोकांना  सावरकर हिंदू म्हणतात ! पुढे त्यांनाच हिंदुराष्ट्र असेही म्हणतात!!

हिंदुमहासभेचे अध्यक्ष : साल १९३७ वय वर्ष ५१ 

बुद्धिवादाकडुन प्रतिक्रियात्मक राष्ट्रवादाकडे सावरकरांचा प्रवास चालु झालेला दिसतो . हिंदु महासभेचे अध्यक्षपद  ते स्वीकारतात. हा पक्ष सनातनि होता . आजही आहे .  हिंदुमहासभेच्या अधिवेशनात साधे  सहभोजन  हि विरोधाशिवाय होत नव्हते . हिंदु महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका सारांशाने पाहुया  : - (हींदुमहा सभेची अध्यक्षिय भाषणे )
१) एक व्यक्ती एक मत . मुस्लिमांना लोकसंखेच्या प्रमाणाहुन जास्त सत्ता  अधिकार नाही.
२) कॉंग्रेसने राष्ट्रीय रहावे .मुस्लिम  लीग शी लढण्याचे जातीय काम हिंदु सभेने करावे
३) मुस्लिमांना संख्येच्या प्रमाणात  मतदार संघ द्यावेत.
४) फाळणीला विरोध. अखंड हिंदुस्थानचा पुरस्कार.

मुस्लिम लीगचा  दावा होता  कि बहुसंख्य हिंदु लोकसंखेच्या बळावर आपले दमन करतील म्हणून आम्हाला लोकसंख्याच्या टक्केवारिपेक्षा अधिक राजकीय  जागा हव्या . कोङ्ग्रेसला हिंदुसभेच्या घोषणा आणि मागण्या जातीय वाटत होत्या. हिंदु समाज कोङ्ग्रेसचा समर्थक होता . हिंदुसभा आणि सावरकर राजकारणात एकाकी पडु  लागले. त्रस्त आणि संतप्त होऊ लागले .

सावरकर हिंदु महासभेत जायच्या आधी पन्नास वर्ष १८८७ साली सर सय्यदांनि द्विराष्ट्रवाद मंडला होता. हिंदु आणि मुस्लिम हि दोन वेगळी राष्ट्रे आहेत . सत्तेचे वाटप दोन्ही राष्ट्राना समान व्हावे . म्हणून ३०% मुस्लिमाना ५०% राजकीय सत्ता द्या . असा द्विराष्ट्रवादाच्या मागणीचा आशय आहे . सर सय्यद , इक्बाल , जिन्हा या सार्यांनी थोड्या फार फरकाने हीच योजना मांडलि आहे . सावरकरांना द्विराष्ट्रवाद मान्य होता पण सत्तेचे वाटप मात्र  समान नाही अशी त्यांची भूमिका होती !  एक व्यक्ती एक मत असे ते म्हणतात . तात्यांनी केलेला हा व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि धर्मस्वांतंत्र्याचा धिक्कार  आहे!!

इस्लाम धर्मात मुस्लिमांसाठी बंधुभाव उम्मत / इस्लामी राष्ट्राच्या शरियतच्या स्पष्ट संकल्पना आहेत. डॉ आंबेडकरांनी या प्रश्नाचे सखोल विवेचन केले आहे . 




नकाशा : अखंड भारतातली मुस्लिम लोकसंख्येची घनता 

फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५  साली -  बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. --  " पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " ( - Volume 1. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) पान  १४६)

त्यावेळच्या  अखंड भारतातले मुस्लिम लोकसंख्येचे   ~ ३० % हे प्रमाण लक्षात घेतले तर आंबेडकरांच्या लेखनाची खोली लक्षात येते आणि तत्कालीन कोन्ग्रेस किंवा हिंदुसभेला हि  गोष्ट कशी कळली नाही ? याचेही आश्चर्य वाटते .   अखंड भारतात सावरकर मुस्लिमांना लोकसंखेच्या प्रमाणात राजकीय राखीव जागा देत होते. मुस्लिम लीगला हि गोष्ट पटली नाही .  त्याना त्याहून  अधिक जागा आणि सत्तेच्या चाव्या हव्या होत्या . गांधीजिंच्या वाढीव  योजना सुद्धा मान्य झाल्या नाहीत . पुढे फाळणी झाली .भीषण हत्याकांड झाले .  सावरकर उद्विग्न झाले .  

लहानपणिच त्यांनी देशासाठी मरण्याची आणि  मारण्याचीहि  प्रतिज्ञा केली आहे. " देशासाठी मारता मारता मरेतो झुंजेन" अशी प्रतिद्न्या आठ वर्षाच्या विनायकाने घरातल्या अष्टभुजा देवीसमोर घेतली होती .  अखंड भारतमातेवर त्यांचे प्रेम आहे . एखाद्या देवाची पूजा करावी तशी ते त्या भारताची पूजा करत असत . नास्तिक आणि बुद्धिवादी झाल्या नंतरही त्यांची देशभक्ती तशीच राहिली. लाहानपणी मनावर अष्टभुजा आरूढ होती तिचे भारत मातेत रुपांतर झाले .   फाळणी बाबत भूमिका घेताना सावरकर बुद्धिवाद जरासा बाजूला ठेवत देश भक्तीकडे अधिक झुकलेले दिसतात. फाळणी घडून गेली आता अखंड भारत शक्य नाही . योग्यही नाहि. पण   बुद्धिवाद मात्र आजही आवश्यक आहे. 

सावरकर म्हणतात " सर्व   धर्म ग्रंथांचे  स्थान  ग्रंथालयातिल कपाट ! आज कसे वागायचे त्याचा निर्णय आम्ही बुद्धीने घेऊ ! राम आणि कृष्ण , गीता आणि वेद हे वंदनिय पूजनीय आदरणीय ग्रंथ ! आज आचरणीय नाहीत , अनुकरणीय नाहीत !!" 


पुरोगामी आणि हिंदुत्व वाद्यांची गंम्मत !


सावरकरांनि हिंदु आणि मुस्लिम या दोघांनाही असा बुद्धिवाद शिकवला आहे. धर्म ग्रंथाना  वंदन करून ते कपाटात ठेवून द्या आणि कालानुरूप आधुनिक व्हा - हे सावरकरांचे  मत हिंदुनि काही प्रमाणात तरी स्वीकारलेले दिसते . मुस्लिमांनी ते स्वीकारलेले नाही . तसा आग्रह पुरोगामी करत नाहीत . त्यामुळे हिंदुत्व वादि  शक्तींची वाढत चाललेली ताकद पाहून क्रुद्ध होण्यापलीकडे त्यांच्या हाती काही नाही 

.सावरकरांचा  बुद्धिवाद हिंदुत्व वाद्यांनाहि मान्य नाहीच .  एका हातात स्म्रुतिग्रंथ घेऊन , भारतीय परंपरा चातुर्वण्य यावर टिका न करता हिंदुत्व वाद्यांना हिंदु संघटन करायचे आहे. ते केवळ अशक्य आहे. हिंदुच हिंदुत्वाच्या विरुद्ध का उभे राहतात ?  यावर डोके खाजवत बसण्यापलीकडे त्यांच्याहि हातात काही नाहि.  हे द्वैत जोपर्यंत शिल्लक आहे . तोपर्यंत महाराष्ट्राच्या विचारविश्वात अशाच गमती घडत राहणार आहेत ! 

हिंदुच्या हितासाठी त्यांनी धर्म ग्रंथ  कपाटात ठेवून विज्ञान निष्ठेची कास धरली पाहिजे . जे हिंदुबाबत खरे आहे तेच मुस्लिमांबाबत हि खरे आहे. मुस्लिम समाजाला त्यांचे हित सांगणारा आज कोणि आहे काय ?  


या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सावरकरांच्या बुद्धिवादाची उजळणी करणे त्यामुळेच महत्वाचे आहे. 

- डॉ अभिराम दिक्षित 

---------------------------------------------------------------------------
(६:६०)  हा संदर्भ २००१ साली प्राकाशित झालेल्या, समग्र सावरकर वाङ्ग्मयातिल ६ वा खंड आणि ६० वे पान असा वाचावा. इतर संदर्भ लेखात पुर्ण दिले आहेत.  

















  

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *