१६ सप्टें, २०१५

चार्वाक नावाचा चमत्कार

हजारो वर्षापूर्वी भारतात  विज्ञान  होते का   ?
उत्तर होय असे आहे.
पुराणातली विमाने म्हणजे विज्ञान  नाही . विज्ञान हि विचार करायची पद्दत आहे . त्याला बुद्धिवाद  – अथवा –    विज्ञाननिष्ठा असे म्हणतात. चमत्कार म्हणजे अपुरे  ज्ञान .  प्रत्येक घटनेला कार्य कारण भाव असतो . तो शोधत येऊ शकतो . दाखवता येतो .  म्हणुन प्रत्यक्ष  हेच प्रमाण मानले पाहिजे. असा उद्घोष हजार वर्षापूर्वी  दुमदुमत होता .  आपण अतिशय अभिमानाने जगातल्या पहिल्या बुद्धीवाद्याचे कौतुक केले पाहिजे .
चार्वाक हा प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी विचार येथे होता. हजारो वर्षापूर्वी –  भारतात .
वेदप्रामाण्य धिक्कारामुळे  वैदिक धर्माने त्यांना नास्तिक ठरवले   तर ऐहिक सुखांचा आनंद   शोधल्यामुळे  जैन, बुद्ध अशा  श्रमण मार्गाच्या तत्त्ववेत्त्यांनीही त्यांची कठोर निंदा केली. शरीर पीडेचा  वा दु:ख मुक्तीचा श्रमण मार्ग  चार्वाकाला अप्रस्तुत वाटतो . चार्वाक सुखवादी अहे.चार्वाकाच्या मूळ संस्कृत श्लोकांचे येथे मी मराठि श्लोकात रुपांतर केले आहे. 
————————————————————————————————————————
यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ नास्तिमृत्युरगोचर:।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:।।

जग रे भावा समाधाने – सुखी रहा इहलोकी  ।   
राख झाली देहाची की – उरते ती सारी माती ।।
परिश्रम  कर . पराक्रम कर.  आणि  समाधानाने सुखाने जग . म्रुत्युनंतर  एकदा शरीराची राख झाली कि सारे संपते . पुनर्जन्म चांगला मिळावा या  भितिपोटि  कर्मकांड करत बसू नका . समाधी अवस्था झूट . केवल  ज्ञान थाप . आत्मा बकवास . निब्बाण  अशक्य .
————————————————————————————————————————
चार्वाकाचे  हे उपदेश  विशुद्ध ऐहिक – जडवादी आहेत .त्याला परलोक तुच्छ , वेंद  नको, उपनिषद नको, ब्राम्हण  , अरण्यक – स्मृती इत्यादी ग्रंथ नको.
 बुद्धाच्या अष्टांग मार्गावर त्याचा विश्वास नाही.  जैनाची केवल ज्ञान हि चार्वाकाला  थाप वाटते .   जैन, बौद्ध,  वैदिक या सार्यांची टीका सहन करत आणि त्यांची उलटी खिल्ली उडवत चार्वाक –  भारतात हजारो  वर्षे दुमदुमत राहिले .
शेवटच्या चार्वाकाचा ऐतिहासिक उल्लेख  अकबर बादशहाच्या  काळात आढळतो . हा शहाणा  अकबराची भेट घेऊन त्याला आपली नास्तिकता पटवून देत होता .धर्माची  चर्चा आणि चिकित्सा करण्यासाठी अकबराने इबादतखाना नावाचे नवे ऑफिस उघडल्याचे इतीहासाने नोंदवले आहे. तिथे त्याने सगळ्या धर्माच्या पंडितांशि चर्चा केल्या .   उत्तर आयुष्यात १५८२ साली  अकबराने इस्लाम  धर्म सोडून दिला आणि दिने इलाही नावाचा नवाच  धर्म काढला .त्याच्या  या नव धर्माला –  धर्म ग्रंथच  नव्हता . मौलवी / पंडित हि भानगड पण नव्हती . या  नव धर्म  स्थापनेवर कदाचित चार्वाक  मताचा अंशत: प्रभाव  असावा. अकबर कृत  दिने इलाहीच्या काही मताशी  चार्वाकाचे विलक्षण साम्य आढळून येते .
————————————————————————————————————————
न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः ।
नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकाः ॥
स्वर्ग नाही, मोक्ष नाही, परलोकीचा  आत्मा नाही 
वर्ण -आश्रम ,  कर्मकांडे फळ  तुला  देणार नाहीत ।।
————————————————————————————————————————
————————————————————————————————————————
अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम्‌ ।
बुद्धिपौरुषहीनानां जीविका धातृर्मिता ॥
यज्ञाचे ते अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदंड , राख फासती अखंड 
बुद्धी आणि पौरुष नाही   –  त्या षंढांच्या पोटाचा  धंदा ।।
————————————————————————————————————————
कर्म करत रहा, फळ अत्ता मागू नकोस, पुढल्या जन्मी तुला ते मिळेलच. त्यानुसार तुझी जात/ वर्ण  ठरेल अन त्यावरून लायकी; ही धार्मीक शिकवण म्हणजे आपला  सुप्रसिद्ध कर्म- फल  सिद्धांत होय . ती त्याकाळची अर्थव्यवस्था सुद्धा आहे . पण त्यात शोषण आहे . आणि ते जन्मजात आहे .  
कर्म सिद्धांत , पुनर्जन्म , चातुर्वण –  वंशशुद्धी व तिच्यामुळे येणारा अहंकार यावर चार्वाकांनी कठोर टीका केली. पुनर्जन्म हा मुर्खपणा मानून हिणवला .  वंशशुद्धी ही वस्तुस्थिती नसून आभास आहे, तो आपले वरिष्ठत्व टिकविण्यासाठी केलेला प्रचार आहे असे चार्वाक मानतात.चार्वाक विचार वेदप्रामाण्य, ईश्वराचे अस्तित्व, पुनर्जन्माचा सिद्धान्त, यज्ञादी कर्मकांडाची उपयुक्तता हे सर्व एकाच वेळी नाकारतो . केवळ ‘प्रत्यक्ष’ हेच प्रमाण मानतो .
बौद्धांचि दु:ख्मुक्तीची धडपड , निर्वाण ,  जैनांचा अनेकांतद – सारी दर्शने   – चार्वाक काहीच  जुमानत नाही. यज्ञाच्या आगीत बुधलाभर  तूप जाळून परलोकाची हाव   धरण्यापेक्षा….  तेच  तूप पिऊन शरीर व मन धष्टपुष्ट आणि  सशक्त  करा – असा जगण्याचा सरळ  साधा सोपा  आणी सुंदर  अर्थ चार्वाकाला अभिप्रेत आहे.
————————————————————————————————————————
कृषिगोरक्षवाणिज्यदण्डनीत्यादिभि: बुधै:।
एतेरैव सदोपायैर्भोगाननुभवेद्भुवि ।।
शहाण्यांनी या जगात शेती, गोपालन, व्यापार, प्रशासन सेवा इत्यादी कामे करून
 मिळालेल्या द्रव्याच्या साह्याने सुखोपभोग घ्यावेत, हाच लोकायतांचा आदर्श आहे.
————————————————————————————————————————
चार्वाक हि प्राचीन नास्तिकांचि भारतीय उपाधी आहे. यात ब्राह्मण आहेत, राक्षस आहेत, दैत्य आहेत, ऋषिमुनी आहेत,राजे महाराजे – गोर गरीब सारे आहेत —- गम्मत  म्हणजे  कधी कधी देव पण आहेत  ! ( ज्याना इथर पोथ्या देवता म्ह्णतात ते) देवांचा गुरू बृहस्पती हा पहिला चार्वाक असल्याचे मानले जाते. शंकर- पुरंदर-  बृहस्पती अशी चर्वाकांची वैचारिक परंपरा सांगितली जाते. हि परंपरा अस्तिकांच्या ग्रंथातुन शोधता येते  . चार्वाक लोक्स ग्रंथ लिहिण्याचा भानगडीत पडले नसावेत किंवा आस्तिकांनि ते ग्रंथ नष्ट केले असावेत .
हे चार्वाक लोक  हजार वर्ष आस्तिकांना धर्माविषयी प्रश्न विचारून भंडावून  सोडत आले आहेत . या प्रश्नावर डोकी खाजवत – त्याचे खंडन मंडन  आणि  त्या चर्चेतून विविध भारतीय दर्शने – श्रद्धा  अणि तत्वज्ञ तयार झाले  असे अनेक अभ्यासक मानतात. चार्वाक विचारतो : –
————————————————————————————————————————
शुश्चेन्निहतः स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति ।
स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते ॥
यज्ञामध्ये बोकड मेला – जर तो आता स्वर्गी जाइल   ।
 यजमानाच्या पित्यासाठी मार्ग गवसला आम्हाला  ॥

यज्ञामधे बळी दिलेले बोकड जर स्वर्गात जात असतील तर यजमानाच्या  बापाला त्याच रस्त्याने थेट स्वर्गात का पाठवू नये ?  
————————————————————————————————————————
प्रत्यक्ष हेच प्रमाण. बाकी सब झुट . बाप  दाखव नाही तर श्राद्ध  कर – काल्पनिक थेअर्या चालणार नाहीत . जे प्रयोगात समजले तेच विज्ञान . प्रत्यक्षात दिसले तेच ज्ञान .  प्रत्यक्ष, अनुमान व शब्द या तीन प्रमाणांच्या आधारे घटना, परिस्थिती यांची चिकित्सा करून सत्यासत्यता पडताळून पाहता येते असा सिध्दांत चार्वाकांनी मांडला.
धार्मिक छू छा  मंतर  – वेद मंत्र –  इत्यादी लिहिणारे हरामखोर –   भंड, धूर्त, आणि निशाचर आहेत.असे स्पष्टपणे सांगितले .
————————————————————————————————————————
त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचराः ।
जर्भरीतुर्फरीत्यादि पण्डितानां वचः स्मृतम्‌ ॥
वेदांचे कर्ते भंड, धूर्त, आणि निशाचर   । 
जर्भरी, तुर्फरी, वगैरे अर्थहिन बकवास   ॥
जर्भरी, तुर्फरी असे (निरर्थक) वा आर्ष रानटी शब्द वेदात येतात . त्याची चार्वाकाने चेष्टा केली आहे
————————————————————————————————————————
आज ज्याला नास्तिक बुद्धिवादी विचार  म्हणून जगभर ओळखले जाते –  तो विज्ञान निष्ठेचा  विचार या भारत  भूमीत हजारो वर्षा आधी बहरून उठला होता याचा मला अभिमान आहे. लोकायत म्हणजे इहलोकविषयक प्रणाली. हे चार्वाक लोक अतिशय  नीतिमान होते. मृदुभाषी होते . सभ्य होते .  चार्वाक चे मराठी भाषांतर गोड बोलणारा असे होते.  चारू म्हणजे  गोड, मनाला रुचेल तेच आणि वाक्‌ म्हणजे सांगणारा. 

 धर्म निंदा – ईश्वर निंदा सोडुन –  त्यांचा कोणताही गुन्हा आणि पाप आस्तिकांच्या ग्रंथात सुद्धा नोंदवलेले  नाहीत.  य़ज्ञाचे कर्मकांड, त्यात होणारा वेळेचा व द्रव्याचा नाश आणि त्यातील प्राणी  हिंसा हे चार्वाकांच्या यज्ञविरोधामागील कारण होते. चातुर्वण्य हे संस्कृतीचे अधिष्ठान मानायलाही त्यांचा विरोध होता. युक्तिवाद आणि चर्चा करणार्या  एका चार्वाक पंथी ब्राम्हणाला – तू तर राक्षस आहेस – असे संबोधून आस्तिक ब्राम्हणांनी  जाळून मारल्याची नोंद महाभारतात येते . 

परंतु चर्वाकांच्या हिंसेचे – चोरीचे – खुनशी वृत्तीचे एकही उदाहरण मिळत नाही . एकही नाहि. विरोधकांच्या ग्रंथात हि नाही.  




 जीवनाचे ध्येय | असे सुखप्राप्ती
सुखानेच तृप्ती | माणसांना

– विंदा करंदिकर (चार्वाक दर्शन )




शरीराला आणि इंद्रियाना होणार्या सुखमय भावनाना चार्वाक सुख मानतात . इथे सारा न्याय प्रत्यक्ष हेच प्रमाण असा आहे. मनाला होणारा संतोष  हि त्याना अभिप्रेत आहे. प्रियेच्या बाहुपाशात खरे सुख अशा अर्थाची चार्वाक वचने आहेत. 

जगाला बुद्धिवाद आणि नैतिकता शिकवणारे चार्वाक अतिशय सुखाने स्वत:चे संसारि आणि व्यावसायिक जीवन जगत असावेत असे मानायला जागा आहे. 


 गम्मत म्हणजे काही सवाई चार्वाक देखील तयार होते . लोकायतचे अपडेटेड व्हर्जन म्हणजे :
 तत्त्वोपप्लव सिंह अर्थात विचारावर झडप घालणारा सिंह .

  तत्त्वोपप्लव सिंह हा चार्वाक मताचा एकच ग्रंथ सध्या शिल्लक दिसतो .  त्याचा लेखक  जयराशी भट्ट हा  सातव्या  शतकांत होऊन गेला.  वैदिक, बौद्ध आणि जैन यांच्यावर या ग्रंथात  सडकून टीका केलेली आहे. पण तो चार्वकालाहि जुमानत नाही . इझम किंवा विचारसरणि चूक आहे . अनुभव आणि विवेक बुद्धी माणसाला प्रयत्न पूर्वक मिळवता येते . सर्व लोकांच्या अधिकतर हितासाठी विवेक वापरावा . चार्वाका सकट  कोणत्याही पुस्तकी इझम च्या नादि लागू नका असे जय्रराशी भट्ट स्पष्टपणे सांगतो . चार्वाक मताला जुनाट म्हणणारे नवे चार्वाक जन्माला येत होते . यालाच   विज्ञान निष्ठ विचार  असे म्हणतात .  भारतात लघु रुपाने  का होईना – पण हा विचार होता . हे अतिशय अभिमानस्पद आहे 

आजचे बुवा, बाबा, जटा, दाढ्या –  जनावरांचे मूत्र पिणारा भारत – हे  वास्तव पाहिले कि चार्वाक येथे जन्मावा हे  एक आश्चर्यच वाटते .   जणु चमत्कार !  



(प्रस्तु लेख अनेक संदर्भ ग्रंथ व इंटर्नेट वरील उपलब्ध लेखांवर आधारित आहे .  संस्कृत श्लोकांचे मराठी रुपांतर लेखकाने केले आहे. )


अधिक वचनासाठी संदर्भ ग्रंथ :

चार्वाक – इतिहास आणि तत्त्वज्ञान – सदाशिव आठवले (प्राज्ञपाठशाळा – वाई)
‘आस्तिकशिरोमणी चार्वाक’ – आ.ह. साळुंखे
भारतीय तत्वज्ञान – श्रीनिवास दीक्षित 
लोकायत – स. रा. गाडगीळ – लोकवाङ्मय गृह
वेध चार्वाकाचा – उदय कुमठेकर – अभय प्रकाशन नांदेड.
चार्वाकमंथन – संपादकः उदय कुमठेकर – परामर्श प्रकाशन, तत्त्वज्ञान विभाग्, पुणे 
चार्वाकवाद आणि अद्वैतवाद – डॉ. प्रदीप गोखले – टिळक महाराष्ट्र विद्यापीठ 
लोकायत (इंग्रजी ) – देविप्रसाद चट्टोपाध्याय – 
सर्वदर्शनसंग्रह – माधवाचार्य – प्र. फोटोझिंको प्रेस पुणे, (शासकीय प्रकाशन)
‘भारतीय जडवाद’  –  राममनोहर लोहिया 
‘जडवाद’ – मानवेन्द्रनाथ रॉय ( अनुवाद : बा.र. सुंठणकर  ) कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे 
‘विचारमंथन – स.रा. गाडगीळ 

६ टिप्पण्या:

  1. माझी अशी धारणा होती कि चार्वाक हा कोणी एकच इहवादी विचारवंत भारतात होऊन गेला. सदर चार्वाकाचे लेखन उपलब्ध नाही, केवळ त्याच्या चिचारांचे नंतरच्या काळात इतरांनी केलेले उल्लेख उपलब्ध आहेत असेही माझ्या वाचनात आले होते.
    परंतु, आपल्या लिखाणावरुन असे दिसते कि, इहवादी विचार परंपरा शतकानुशतके चालु राहिली होती व त्या इहवादी, विञानवादी परंपरेतील सर्वांनाच चार्वाक म्हणता येईल.

    उत्तर द्याहटवा
  2. माधवाचार्यांच्या चौदाव्या शतकातील "सर्वदर्शनसंग्रहा"मध्ये लोकायताविषयी पुढील उतारा आला आहे :

    तदेतत्सर्वं बहस्पतिनाप्युक्तम् -
    तर हे सर्व बृहस्पतीनेही म्हटले आहे

    न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः ।
    नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकाः ॥१॥
    स्वर्ग नाही, मोक्ष नाही, पारलौकिक असा आत्माही नाही,वर्ण, आश्रम आदींची कर्मकांडे फळ देणारी नाहीच नाही.

    अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम् ।
    बुद्धिपौरुषहीनानां जीविका धातृर्मिता ॥२॥
    अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदंड (साधूंची क्रिया), शरिराला राख फासणे - बुद्धी आणि पौरुष नसलेल्यांच्या उपजीविकेसाठी विधात्याने (या सर्व गोष्टी) निमाण केल्या आहेत.

    पशुश्चेन्निहतः स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति ।
    स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते ॥३॥
    ज्योतिष्टोम यज्ञात मारलेले जनावर जर स्वर्गात जाते, तर यजमान स्वतःच्या पित्यालाच का मारत नाही?

    मृतानामपि जन्तूनां श्राद्धं चेत्तृप्तिकारणम् ।
    निर्वाणस्य प्रदीपस्य स्नेहः प्रज्ज्वलयेच्छिखाम् ॥४॥
    मेलेल्या जिवांची तृप्ती जर श्राद्धाद्वारे होऊ शकत असेल, तर तुपाने विझलेल्या दिव्याची ज्योतही मोठी होईल.

    गच्छतामिह जन्तूनां व्यर्थं पाथेयकल्पनम् ।
    गेहस्थकृतश्राद्धेन पथि तृप्तिरवारिता ॥५॥
    येथे प्रवासाला जाणार्‍या जगणार्‍या लोकांसाठी शिदोरी बनवणे व्यर्थ म्हणावे - घरच्याघरी केलेल्या श्राद्धाने आयतीच रस्त्यात तृप्ती होईल.

    स्वर्गस्थिता यदा तृप्तिं गच्छेयुस्तत्र दानतः ।
    प्रासादस्योपरिस्थानामत्र कस्मान्न दीयते ॥६॥
    दानामुळे स्वर्गात असलेल्यांची तिथल्या तिथे तृप्ती होत असेल, तर इमारतीत वरच्या भागात राहाणार्‍यांसाठी अन्न येथे (खाली) अन्न का देत नाहीत?

    यावज्जीवेत्सुखं जीवेदृणं कृत्वा घृतं पिबेत् ।
    भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥७॥
    जोपर्यंत जगावे, सुखाने जगावे, कर्ज घेऊन तूप प्यावे. राख झालेल्या देहाचे पुन्हा येणे कुठचे?

    यदि गच्छेत्परं लोकं देहादेव विनिर्गतः ।
    कस्माद्भूयो न चायाति बन्धुस्नेहसमाकुलः ॥८॥
    देहच सोडून गेलेला जर परलोकात जात असेल, तर नातलगांच्या जिव्हाळ्यामुळे तो वारंवार परत का येत नाही?

    ततश्च जीवनोपायो ब्राह्मणैर्विहिस्त्विह ।
    मृतानां प्रेतकार्याणि न त्वन्यद्विद्यते क्वचित् ॥९॥
    तर उपजीविकेसाठी ब्राह्मणांनी उपाय सांगून दिले आहेत, नाहीतर येथे मेलेल्यांसाठी प्रेतकार्ये कदापी अस्तित्वात नसती.

    त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचराः ।
    जर्भरीतुर्फरीत्यादि पण्डितानां वचः स्मृतम् ॥१०॥
    वेदांचे कर्ते भंड, धूर्त, आणि निशाचर आहेत. जर्भरी, तुर्फरी, वगैरे (निरर्थक) बोल पंडितांकडून ऐकल्याचे आठवतच असेल.

    अश्वस्यात्र हि शिश्नं तु पत्नीग्राह्यं प्रकीर्तितम् ।
    भण्डैस्तद्वत्परं चैव ग्राह्यजातं प्रकीर्तितम् ।
    मांसानां खादनं तद्वन्निशाचरसमीरितम् ॥११॥
    (अश्वमेध यज्ञात) पत्नीने घोड्याचे शिश्न घ्यावे हे माहीतच आहे. (आणखी) याहून वेगळ्या गोष्टी घ्याव्यात असे भंडांनी सांगितलेलेही प्रसिद्ध आहे. त्याच प्रमाणे मांस खाण्याचे विधीही निशाचरांनी निर्माण केलेले आहेत.

    - - -
    स्रोत : "चार्वाकमंथन" परामर्श ग्रंथमाला, तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, २००१.

    उत्तर द्याहटवा
  3. लोकायत किंवा चार्वाक दर्शन

    लोकायत हे बौद्ध आणि जैन दर्शनांसारखेच एक अवैदिक दर्शन आहे. इतर दर्शने वेदप्रामाण्य मानतात वा त्यांना वळसा घालतात पण शक्य तो सरळ टक्कर घेत नाहीत. लोकायताचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेव दर्शन आहे ज्यात वेद, परलोक व देव या तिघांनाही फेटाळून लावले आहे. चेतनावाद हा सर्व धर्मांचा व दर्शनांचा अविभाज्य भाग आहे.शरीर ह्या हाडा-मांसाच्या गोळ्यापेक्षा चेतन जीव हा निराळा आहे हा झाला चेतनावाद. सर्व धर्म चेतनावादावर अवलंबून आहेत व लोकायतने त्यावर तोफ डागली म्हणून सर्वांनीच चार्वाक मतावर कठोर हल्ले केले व त्यातही बुद्ध धर्म आघाडीवर राहिला. याचा एक परिणाम म्हणजे चार्वाक मताचा एकही अधिकृत ग्रंथ वा त्यावरील टीका आतापर्यंत मिळत नव्हत्या. बृहस्पतीसूत्र व जयराशीभट्टाचा तत्वोप्लवसिंह हे अलिकडे उपलब्ध झालेले ग्रंथ एवढेच अपवाद. मग हे दर्शन समजावून घ्यावयाचे तरी कसे?
    तीही एक गंमतच आहे.विरोधक चार्वाकाचे मत म्हणून एक वाक्य देतात व त्यावर जोरदार टीका करतात. अशी मते एकत्र करावयाची व त्याला म्हणावयाचे लोकायत दर्शन. आता विरोधकांकडून फार सरळपणा (Fairness) अपेक्षित करण्यात अर्थ नाही. उदा. श्री सातारकर यांनी दिलेले व सर्व साधारणपणे सगळ्यांना माहित असलेले

    "यावज्जीवं सुखं जिवेत् ऋणं कृत्वा धृतं पिबेत्" हे वचन विद्यारण्य़स्वामींनी सोळाव्या शतकातील सर्वदर्शन संग्रहात भोगवादी लक्षण म्हणून दिले. पण मुळात ते नवव्या शतकातील न्यासमंजिरीत असे आहे
    " यावज्जीवं सुखं जिवेत् नास्ति मृत्युरगोचर:" यात कोठेही भोगवाद नाही. विरोधकावर टीका करावयाची म्हणून विपर्यास केला आहे. असो. आता थोडक्यात दर्शनाचा इतिहास व मते बघू.
    (१) काल... सुरवात जवळजवळ वेदकालापासूनच. महाभारतातील उल्लेख व पाली बुद्ध वाड:मयामधील टीकेवरून इ.स.पूर्व ५०० नक्कीच.या काळातच उपनिषदांनी वेदांवर टीकेला सुरवात केली होती.
    (२) मान्यता .. बुद्ध्पूर्व काळामध्ये विद्वान ब्राह्मणांच्या व राजनीतीच्या अभ्यासाचा विषय होता. आश्रमांमध्ये व यज्ञ काळीही चर्चा चाले. समाजात कसे वागावे-दण्डनीतीचा अभ्यास- याचे शिक्षण हा मुख्य उद्देश.
    (३) आचार्य ... देवगुरु बृहस्पती पासून सुरवात. चार्वाक हा नंतरचा. शक्य आहे कीं चार्वाक ही व्यक्ती नसून पंथ वा उपाधी होती. लोकायत व बृहस्पत्य ही दुसरी नावे.
    (४) काही सुत्रे
    पृथ्वी,आप,तेज,वायू ही चार तत्वे; यांच्या संयोगास शरीर,इंद्रिय अशा संज्ञा आहेत, त्यातून चैतन्याची निर्मिती होते.
    चेतनायुक्त शरीर म्हणजेच पुरूष.
    प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे.
    अनुमान प्रमाण नाही ( परलोकाबाबतीत).
    परलोक नाही.
    अर्थ व काम हेच पुरूषार्थ आहेत.
    दण्डनीति हीच एक विद्या आहे व यातच कृषि,गोरक्ष वाणिज्य समाविष्ट आहेत.
    तीन वेद हा धुर्तांचा प्रलाप आहे.
    उद्याच्या मोरापेक्षा हातचे कबुतर बरे.
    (५) काही नित्कर्ष (निरनिराळी मते)
    हे असूरांचे म्हणजे आर्यपूर्व रहिवास्यांचे (सिंधू संस्कृती?) दर्शन आहे.
    याची सुरवात सांख्य व तंत्रापासून झाली.
    हे लोकायत म्हणजे लोकांचे दर्शन असल्याने राजसत्तेने ते दडपून टाकले.
    उत्पत्ती पूर्व मिमांसेपासून झाली.
    अर्वाचिन अब्यासाचा मूलस्त्रोत म्हणजे श्री देविप्रसाद चटोपाध्याय यांचा इंग्रजी ग्रंथ Lokaayat. या
    वरून मराठीत गाडगीळ, आठवले, कुरुंदकर, साळुंखे थिटे इत्यादींची पुस्तके. देविप्रसाद व हे बहुतेक सर्व वामपंथी विचारसरणीचे.

    उत्तर द्याहटवा
  4. 'चार्वाक' या शब्दाचा अर्थ गोड बोलणारा.(चारु वाक् यस्य सः|) हे दर्शन म्हणजे 'लोकायत.' बृहस्पतिने रचले आणि चार्वाक इत्यादी शिष्यांद्वारे सगळीकडे पसरविले. यती "कृष्णमिश्र" यांनी लिहिलेल्या प्रबोधचंद्रोदय या नाटकात अगदी सोप्या पद्धतीने या दर्शनाचे विवेचन केले आहे. अन्य अनेक ग्रंथांचा उल्लेख विद्वान् मित्रांनी केला आहेच.
    त्यांच्या मतानुसार प्रत्य़क्ष हे एकमेव ज्ञानाचे प्रमाण आहे. पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेता येतो तेवढेच खरे.. म्हणून आकाश हे महाभूत ते मानत नाहीत. महाभूते चारच-पृथ्वी, आप,तेज आणि वायू. आत्मा मानत नाहीत त्यामुळे अर्थात पुनर्जन्म सिद्धांत मानत नाहीत.श्राद्ध, पक्ष इत्यादी पितरांसाठी करावयाचे विधी त्यांना पटत नाहीत. किंबहुना श्राद्धानिमित्त ब्राह्मण भोजन घालणे म्हणजे खालच्या मजल्यावरच्या व्यक्तीला जेवायला देऊन वरच्या मजल्यावरच्या माणसाला तृप्त करण्यासारखे आहे असे उद्गार त्या दर्शनाचे मत स्पष्ट करताना कोठेतरी वाचल्याचे स्मरते.

    आत्मा मानणे म्हणजे जे दिसते (शरीर) ते नाही(विनाशी मानणे) आणि जे दिसत नाही(आत्मा) तो आहे(अविनाशी मानणे) असे त्यांचे मानतात. त्यामुळे परलोकही मानत नाहीत. कर्मविपाकसिद्धांतावरही विश्वास नाही, म्हणून ह्या जन्मी जे करायचे ते करून घ्यावे, पुढचा जन्म वगैरे नसतो हे त्यांचे मत आहे.

    ऋग्वेदाच्या दुसर्‍या मंडलात इंद्रसूक्ते प्रामुख्यानी आहेत. त्यातील ( २.१२) या सूक्तात 'अदेवयु:' या नावाने उल्लेखिलेले 'इंद्राला न मानणारे' काही लोक असावे असा उल्लेख सायणाचार्यांच्या भाष्यात येतो. हा गट पुढे नास्तिक लोकांचा निर्माण झाला असावा,कदाचित ही चार्वाकदर्शनाची सुरुवात असेल असा अंदाज ऋग्वेदाच्या अनेक अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. चार्वक सारखे विचार पण समाजा साठी ठिक नाही ....

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *