१७ मार्च, २०१४

विज्ञानाच्या चष्म्यातून जाती



विज्ञानाच्या चष्म्यातून जाती 


( जात पात  आणि जातिव्यवस्था यातला मूर्खपणा विज्ञान , बुद्धिवाद , गणित आणि लॉजिकने खोडून काढणारा मनोरंजक लेख …… )


तुमचे पूर्वज किती ?


स्वत:च्या जातीविषयी अभिमान हे सर्व भारतीयांचे समान लक्षण आहे . आपल्या पूर्वजांविषयीचा अभिमान आणि मग त्यातून उद्भवणारा स्व जातीविषयक अभिमान मग त्यातूनच उगवणारा इतर जाती विषयीचा तुच्छतावाद हे भारतीय समाजाचे आणि परिणामि इथल्या अनेक धार्मिक , सामाजिक आणिक राजकीय विचारधारांचे प्रमुख अंग आहे .  आनुवांशिकता , डी एन ए , असे विज्ञान सदृश शब्द वापरून या पुरातन मानसिकतेचे समर्थन केले जाते . प्रस्तुत लेखात आपण विज्ञानाच्या चष्म्यातून जातींकडे पहायचे आहे .

चला तुमच्या आराम खुर्चीत जरा रेलून बसा .हातात एक गरम कॉफीचा वाफ़ाळता कप  असू द्या  .  आपण मेंदूचा व्यायाम करणार आहोत . तुमचे पूर्वज किती ? तुमच्या पूर्वजांच्या संख्येत जातीव्यवस्थेचे गुपित  दडले आहे . आई  आणि बाप हे दोन पूर्वज झाले . आजी आजोबा दोन्हीकडचे पकडले तर ४ होतात आणि दोन पिढ्यांमागे पुर्वजांची संख्या होते ४. तीन पिढ्या मागे गेले तर हि संख्या आठ वर जाते . आपल्या पैकी प्रत्येकाला आठ पणजी पणजोबा आहेत . हि संख्या भूमितीय गतीने वाढत जाते. जितक्या पिढ्या मागे जायचे आहे तितक्या वेळेला दोन या संख्येला दोन ने  गुणायचे आहे . साधे शाळेतले गणित ! आजी आजोबांच्या पिढीत म्हणजेच दोन पिढ्या मागे आपल्या पूर्वजांची संख्या दोनाचा दुसरा घात = ४ एव्हढी असते. तीन पिढ्या मागे गेले तर पूर्वजांची संख्या ८ आहे . चार पिढया पूर्वी दोनाचा चौथा घात म्हणजे आपले १६ पूर्वज होतात . इथ पर्यंत ठीक आहे .   जितक्या पिढ्या मागे जायचे तितक्या वेळेला दोन ला दोन ने गुणले कि आपल्याला पूर्वजांची संख्या मिळते . ज्या पिढीतल्या पूर्वजांची संख्या शोधायची आहे त्या संख्ये एव्हढा दोनाचा घात त्या पिढीतल्या आपल्या पूर्वजांची संख्या दाखवेल हे गणिती सूत्र आपल्याला मिळाले !

पण जातीचा अभिमान केवळ या सोळा पूर्वजा पर्यंतच मर्यादित नाही . प्रत्येक जातीला कमीत कमी दोन हजार वर्षापुर्वीच्या पुर्वाजाबद्दल प्रेम वाटत असते . त्यांचा अभिमान वाटत असतो . आणि दोन हजार वर्षापूर्वीच्या अपमानाचे उट्टेहि काढायचे असतात .


1) गणित पहिले : अफ़ाट पुर्वज 


साधारण पंचविसाव्या वर्षी मुले होतात असे गृहीत धरू . खरे तर इतिहासात यापेक्षा लवकर मुले होत आली आहेत . तरी आपल्या गणिताच्या सोयीसाठी आपण पंचविसाव्या वर्षी मुले होतात असे गृहीत धरू . म्हणजे शंभर वर्षात चार पिढ्या झाल्या. हजार वर्षात चाळीस पिढ्या होतील . आणि दोन हजार वर्षात ८० पिढ्या होतात . आणि आपण आधीच सिद्ध केल्यानुसार दोन हजार वर्षापूर्वी तुमच्या पूर्वजांची संख्या मोजण्याचे सूत्र आपल्याला ठाउक झाले आहेच . ती संख्या येईल दोनाचा ८० वा घात .







दोनाचा ८० वा घात . दोन ला ८० वेळा दोन ने गुणायचे आहे . इथे मात्र आपल्याला सायनटिफ़िक केलक्युलेटर लागणार आहे. एक्स  चा वाय वा घात काढण्याचे एक बटण त्या  केलक्युलेटर वर आहे .
 २ चा ८० वा घात = 1208925819614629174706176 अशी एक अगडबंब संख्या मिळते .
हि संख्या आपण वाचूही शकत नाही . आजही पृथ्वीची तेव्हढि लोकसंख्या नाही . बरे हे पूर्वज एका माणसाचे झाले बरका ! आजच्या सर्व माणसांचे पूर्वज याच गणिताने काढले आणि त्यांची बेरीज केली तर तेव्हढि माणसे उभी करायला शंभर पृथ्व्यांचे क्षेत्रफ़ळ हि पुरणार नाही . या पहिल्या गणिती संकल्पनेला अफ़ाट पुर्वज असे नाव देऊ . काहीतरी चुकते आहे नक्की ! नेमके काय  चुकते आहे ? ? ते पुढे पाहूच …  पण स्वत:ची  जात आणि पूर्वज याविषयी थोडा वेगळा विचार करावा लागणार हे नक्की ....  !! .


नातेवाइकात अंतर्गत लग्ने  होतात . 

एकाच कुटुंबात लग्ने होत असतात . आणि आपण ज्यांच्याशी लगिन  करू शकतो असे आपले रक्त बांधव म्हणजेच "जात" हे तर आपण विसरूनच गेलो कि !  अनेक जातीत विवाह करण्यापूर्वी पदर जुळवण्याचा विधी आहे .  आपल्या आधीच्या पिढ्यात कोणि नातेवाइकानि लग्न केले आहे का ? हे तपासले जाते आणि मग तसा पदर आधीच्या पिढीत जुळला असेल तरच लग्न केले जाते . म्हणजे आपल्या आधीच्या पिढ्यात नातेवाइकात लग्ने  झालेली आहेत . दूरचे चुलत मावस भाऊ बहिण लग्न करत असतात त्यामुळे आपले पूर्वज अगडबंब संख्येत नसतात . समजा तीन पिढ्यांपूर्व आपल्या सोळा पुर्वाजात कोणि चुलत मावस सोयरिक जुळवली असेल तर चार पिढ्या पूर्वीच्या पणजोबांची संख्या कमी भरते….  कारण चुलत मावस बहिण भावांचे काही पणजोबा समान असणार आहेत .  चला म्हणजे आपल्या पूर्वजांची संख्या 1208925819614629174706176 एव्हढी अगडबंब नाही . नात्यातल्या लग्नांना धन्यवाद ! नाइतर लई पितरांचे पारणे फेडत बसावे लागले असते !

चला.  पुन्हा एकदा आरामखुर्चीत रेला . गरम वाफ़ाळत्या कॉफीचा  अजून एक घुटका घ्या . आता आपण  उलटे गणित करणार आहोत . आपले आधीचे गणित साफ चुकले आहे . नव्याने विचार करावा लागणार आहे . दर वर्षी पृथ्वीची लोकसंख्या वाढत जाते हे आपल्याला माहित आहे.  म्हणजे दर एक पिढीत मागे मागे गेले कि पूर्वजांची संख्या कमी कमी  होत गेली पाहिजे कारण साधारणत : एकापेक्षा जास्त मुले होण्याकडे कल असतो . चार पोरांचे आईबाप दोन असतात म्हणजे मागच्या पिढीत पुर्व जांची संख्या वर्ग मुळा  एव्हढी झाली ! पूर्वीचे गणित प्रत्यक्षात उलटे चाललेले दिसते !    मगाशी आपण एका व्यक्तीच्या पूर्वजांची संख्या शोधण्याचा प्रयत्न केला . आता उलटा विचार करू या .


आज  पृथ्वीवरच्या सर्व माणसांचे पूर्वज किती होते ?
ते शोधून काढु ! विचार करायला सोपे जावे म्हणुन एक छोटे गाव उदाहरणार्थ  घेऊ .




2 ) गणित दुसरे : दोनच  पूर्वज : आदम आणि इव्ह


पश्चिम महाराष्ट्रातले एक गाव सावरखेड ! चला तर या काल्पनिक गावात समजा आज पाचशे लोक रहात आहेत . आधीच्या पिढीत किती बरे लोक रहात असतील ?  समजा या गावाची लोकसंख्या स्थिर आहे .  गेले कित्येक वर्षे इथे ५०० च लोक राहतात . मग आजच्या ५०० लोकांचे पूर्वज किती ? इथे काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत .

१) काही लोक नपुंसक असतात .
२) काही लग्ना आधीच मारून जातात
३) काहीची मुले लवकर मरतात

म्हणजे आजच्या पाचशे लोकांचे पूर्वज किती ?  काही लोकाना स्वत:चे वंशसातत्य राखता येत नाही हे लक्षात घेतले तर सहज लक्षात येईल कि ५०० लोकांचे पूर्वज ५०० पेक्षा कमी असणार ! काही वंश प्रत्येक पिढीत नामशेष होणार . आपल्या गणिताच्या सोयीसाठी . ५०० लोकांचे पूर्वज ४९० आहेत असे मानु ! दहा लोक दर पिढीत नपुंसक तरी निघतात किंवा मुले होण्या आधीच खपतात .

एक पिढी पूर्वीचा इतिहास पाहिला तर  सावरखेडात ५०० च लोक राहत होते पण ते सर्व आजच्या सावरखेड करांचे पूर्वज नाहीत . दहा लोकांचा वंश नाश झालेला आहे . म्हणजे आजच्या जिवंत पाचशे लोकांचे एका पिढी पूर्वी ४९० वंशज होते. दोन पिढ्यांपूर्वी देखील वंश नाशाचा जीवशास्त्रीय नियम लागू होतोच ! दोन पिढ्या मागे गेले तर विस वंशाचे सातत्य तुटले आहे . आणि आजच्या ५०० जिवंत लोकांचे उगमस्थान म्हणजे दोन पिढ्यान पूर्वीचे ४८० लोक . कोणत्याहि कुटुंबाची वंशावळ पाहिली तर मुले न झालेले असे अनेक विवाहित आणि अविवाहित लोक दिसतील .









आजच्या लोकसंखेचे पालकत्व कमी पूर्वजांकडे असते हा मुद्दा आहे . जर पन्नास पिढ्या मागे गेले . आणि दर पिढीत दहा लोकांचे वंश सातत्य तुटते असे मानले तर आजच्या सावरखेड गावाचे सर्व लोक एकाच माता पित्याची आपत्ये आहेत. हे झाले सावरखेडचे आदम आणि इव्ह ! याला आपण आदम इव्हचे गणित म्हणु .

हे गणित फार विण्ट्रेस्टिंग आहे ! समजा दर पिढीत दहा नाही एकाच माणसाचे वंश सातत्य तुटते असे मानले तर पन्नास पिढ्यापुर्वि आजच्या लोक संख्येचे ४९० पूर्वज होते असे मानणे भाग आहे . पण मग ५०० पिढ्यांपूर्वी काय ? पुन्हा आपल्याला सावर खेडचे ५०० पिढ्या जुने दोनच आदम इव्ह मिळतात ! म्हण्जे सवाल फकस्त किती पिढ्या मागे जायचे ? एव्हढाच आहे !  गावाची लोकसंख्या कितीही असो ! नपुंसकांची संख्या कितीही असो ! पुरेशा पिढ्या मागे गेले कि सर्वांचे कोमन आई बापच मिळणार आहेत . फकस्त जरा जास्त पिढ्या मागे जावे लागेल ! म्हणजे प्रत्येक गावातले सर्व लोक एकमेकांचे बांधव आहेत हे मानणे भाग आहे .

हे गणितही उघडच चुकले आहे ! कारण गावाबाहेर लग्ने  होतातच . आपले गृहीतकच चुकले होते . च्यामारी ! पण हाच नियम सार्या पृथ्वी लाच लागू केला तर ? पृथ्वीबाहेर लग्न करण्याची पद्धत नाही . दर पिढीत काही लोक नपुंसक निघणारच. काही वंशांचा नाश होणारच .  आणि पुरेशा पिढ्या मागे गेले तर आजच्या सर्व मानव जातीचे समान पुर्वज मिळतील !

आरामखुर्चीत रेलून कॉफीचे घुटके घेत आपण मानवता सिद्ध केली आहे आणि जातिवाद खोटा  ठरवला आहे ! थांबा एका मिनिटासाठी काहीतरी चुकते आहे    हे नक्की ....  !!




3 ) दोनही गणितांचा मसावि :  मानवाची वैज्ञानिक  महामाय 


आपले पूर्वज संख्येने भरपूर आहेत . त्यांनी परस्परात लग्ने  केलेली आहेत आणि अनेक मानवांना स्वत:चे वंश सातत्य राखता येत नाही हे आपण वरील दोन्ही शक्यतात पडताळून पाहिले . या दोन्ही गणिती प्रक्रिया जीवशास्त्रात एकाच वेळी चालू आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे .

पृथ्वीची लोकसंख्या दर सेकंदाला वाढते आहे . याचाच दुसरा अर्थ असा की दर सेकंदाला आजच्या जिवंत माणसांच्या वंश सातत्यातल्या पूर्वजांची संख्या कमी होते आहे . फक्त किती पिढ्या मागे जायचे ? एव्हढाच हिशेब बाकी आहे . मानवाच्या पुरेशा पिढ्या होऊन गेल्या … कि आजच्या भूतलावरची सर्व ,माणसे एकाच मातेची लेकरे उरणार हे उघड आहे .


आता प्रश्न असा आहे कि खरोखर मानवाच्या इतक्या पिढ्या होऊन गेल्या आहेत का ? उत्तर होय असे आहे !


 आजच्या मानवाची मूळ माता ९९००० ते २००००० वर्षांपूर्वी आफ्रिकेत राहत असावी . मात्र तिच्या काळातील ती एकमेव स्त्री नव्हती. फक्त तिची माता सोडून इतर स्त्रियांना आजच्या एखाद्या जिवंत स्त्री पर्यंत अखंड वंश साखळी निर्माण करता आली नाही . तसेच हि मूळ माता हि एक पदवी असून विशिष्ठ स्त्रीच मूळ माता असेही ठाम सांगता येत नाही . कारण मूळ माता ठरण्यासाठी तिला अखंड वंश सातत्य असलेल्या किमान दोन मुली असणे आवश्यक असते . जेव्हा एखाद्या वंश रेषेतील शेवटची स्त्री मारते तेव्हा हे वंश सातत्य खंडित झाल्याने मूळ माता पदवी पुढच्या पिढीकडे सरकते . म्हणजेच मूळ माता हि विशिष्ट व्यक्ती नसून कालांतराने बदलू शकणारी व्यक्ती असते . 









या स्त्रीला पिढीगणिक बदलू शकणारी कॉमन मदर इव्ह -  वैज्ञानिक  महामाय म्हणतात . 





थोडक्यात सर्व मानवांची आई एकाच आहे . मग बापाचे काय ?



खरी गम्मत इथून सुरु होते . हि  जी कोणि काळानुसार बदलणारी  वैज्ञानिक  महामाय आहे ती केवळ आरामखुर्चीत कॉफीचे घुटके  घेत  - मेंदूचे व्यायाम करत गवसलेली नाही . त्यासाठी शास्त्रज्ञांनी जगातल्या १३५ भिन्न भिन्न जमातींच्या  स्त्रियांचे रक्त तपासले आहे . मायटोकोण्ड्रिया म्हणजे  पेशीचे उर्जा केंद्र . आपल्या डी एन ए चा अर्धा भाग पित्याकडून आणि अर्धा भाग मातेकडून येत असतो .  मात्र आपणा सर्वाना हे मायटोकोण्ड्रिया मात्र फक्त मातेकडून मिळत असतात.  म्हणजे आजच्या सर्व प्रजातीच्या स्त्रियात आणि पुरुषात असलेले मायटोकोण्ड्रिया त्याना त्याच्या मातेपासून मिळाले आहेत . शास्त्रज्ञांनी पिग्मी ते अंदमानी आदिवासी ते आफ्रिकन ते युरोपियन अशा सर्व भिन्न १३५ प्रजातींच्या स्त्रियांचे  मायटोकोण्ड्रियल डी एन ए तपासले . त्यात दर पिढीत होणारे म्युटेशन आणि मोलेक्युलर क्लोक यांच्या अभ्यासावरून निश्कर्ष काढले . त्यानुसार हि मायटोकोण्ड्रियल कॉमन मदर इव्ह -  वैज्ञानिक  महामाय सिद्ध केलेली आहे.हि थेअरि बायबल च्या विरुद्द असल्याने धर्म मार्तण्ड सन्तप्त आहेत। 

 . 
मानवाच्या दर पिढीत काही वंशाचा नाश होत असल्याने हि महामाय दर पिढीतही बदलू शकते ! म्हणजे आजचे सर्व मानवांची माता मिळते पण पिता नाही . कारण दर पिढीत गुणुसुत्रे बदलत असतात . लग्न केल्याने त्यांचे मिश्रण होत असते . त्यामुळे आपल्या रक्तात अनेक पुरुष पूर्वजांची गुणसुत्रे खेळत असतात . आणि तत्कालीन महामायेचा तत्कालीन पती तत्कालीन बाप असतो ! 


आता एव्हढे सगळे समजून घेतल्यावर कोणाला स्वत:चा वंश , जात आणि बापजादे  यांचा अभिमान  बाळगायचा असेल तर खुशाल बाळगावा ! वेदातले पुरुषसुक्त आणि बायबल कुराणातलि एकमेव आणि न बदलणारे  "आदम इव्ह"  हीच मानवी उत्पत्तीची खरी थेअरी मानायची असेल तर खुशाल मानावी !


Ref : River Out of Eden: A Darwinian View of Life is a 1995 popular science book by Richard Dawkins


४ मार्च, २०१४

मुकादमांचां इस्लाम (त्यांच्या चष्म्यातून : भाग ६ )

चश्म्याविषयी थोडेसे :

या मालिकेत आपण आजपर्यंत पाच महत्वाच्या ऐतिहासिक मुस्लिम महापुरुशांच्या विचारांना स्पर्श केला आहे . एका अर्थाने पाच अतिशय वेगवेगळ्या दृष्टीकोनातून इस्लाम धर्मा कडे पाहिले आहे.  परकाया प्रवेश करून - दुसर्‍याच्या नजरेतून तिसर्‍याकडे पहाण्याची तर मजाच काही और आहे. माझ्या लहानपणी मिस्टर इंडिया नावाचा एक सिनेमा आला होता. हातात वैज्ञानिक जादूचे घड्याळ बांधून अनिल कपूर अद्रुष्य व्हायचा. काहि केल्या तो मोगँबोला दिसायचा नाही. मग मोगँबो लाल काचेच्या चश्म्यातून बघायचा. अनिल कपूर दिसायचा. आपण चश्म्याचा रंग बदलला की नजरेसमोरचे दृष्य बदलते. कविळ झालेल्याला पिवळे दिसते म्हणतात. एकाच घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पहाता येते हा मुद्दा आहे. जर एकाच घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पहाता येत असेल तर विचारधारांकडे आणि धर्मप्रवाहांकडे तर हजारो दृष्टीकोनातून पाहता येईल . अकबरापासून हमीद पर्यंतचे हे थोर पुरुष आणि धर्माकडे  पहाण्याचा त्यांचा चष्मा आपण पाहिला. त्यात एक गोष्ट सामाईक आहे. कोणती बर ?



 अकबर हा मध्ययुगातला अतिश्रीमंत बादशहा आहे . तो फिरायला निघाला कि त्यामागे चवर्या - पंखे घेऊन धावणारे हुजरे  , सुगंधी सरबते घेऊन फिरणार्या दासी , अकबराची स्तुती करायला पाळलेले पगारी भाट यांच्या लवाजम्याची झुंबड उडते आहे . पण हिंदुस्तानच्या  शहन्शहाचे यात मन  रमत नाही . खलबतखाने - इबादत खाने उघडत अकबर धर्मचीकीत्सक बनतो . धर्मचीकीत्सेची पहिली पायरी म्हणूनच कि काय ? पण तो धर्मसहीष्णू बनतो आणि सर्व धर्मांना समान न्याय देण्याचे धोरण अवलंबतो . पण अकबराची जिज्ञासा त्याला त्याला तिथे थांबू देत नाही … त्याने इबादत खान्यात सर्व धर्माच्या धर्मप्रेमी मंडळी ची तडाखेबंद भाषणे आणि चावरे युक्तिवाद ऐकले आहेत . थोड्या बर्या आणि थोड्या वाईट अशा गोष्टी सगळ्याच धर्मात असतात असे त्याला वाटू लागते . मग तो म्हणू लागतो कि जनतेच्या भल्यासाठी धर्मात हस्तक्षेप करणे हा राजाचा अधीकार आहे … अशाप्रकारे अकबर सेक्युलर आणि बुद्धिवादी बनत सगळ्या धर्मातले त्याला आवडणारे घटक एकत्र करून दिने इलाही नावाचा नवाच धर्म काढतो ! मुल्ला मौलवी विरोध करतात तर अकबर त्याना चोप देऊन कंदाहारच्या बाजारात विकून टाकतो.

 जे जे अकबराला जमते ते ते हमीद दलवाइना जमू शकणार नाही . त्याना कधी मौलविंच्या धर्मांधते समोर क्षणिक  माघार हि घ्यावी लागेल. काही सामर्थ्य सत्तेचे आहे . पण काही गोष्टी हमीद अशा करेल … जे अकबराला शक्य नाही …. कारण  काही सामर्थ्य काळाचेही आहे . अकबराने दिने इलाहिचा पुढचा प्रेषित म्हणून स्वत:लाच जाहीर केले होते . हमीद तसे करणार नाही. हमीद लोकशाही , धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची भाषा बोलेल. तरी हमीद आणि अकबराला जोडणारा एक धागा आहेच  फकस्त विद्रोही , बंडखोर , नास्तिक , पाखंड नव्हे…  तो धागा आहे उपेक्षेचा . स्वधर्मियाकडून झालेल्या दुर्लक्षाचा आणि पराजयाचा . आणि वेदनेचा . …. अकबराच्या दिने इलाही या धर्माला पंचवीसहून कमी अनुयायी मिळावेत आणि हमीदच्या   मंडळात आज विसही  सत्यशोधक  मुसलमान उरू नयेत ! हा योगायोग खचितच नाही. इस्लामचा गड  चिरेबंदी आहे काय ?
एका अर्थाने आहे आणि एका अर्थाने नाही. धर्माचे वेगवेगळ्या प्रकारे अर्थ निघू लागले कि त्यातले एकमेवत्व आणि अद्वितियत्व कमी होवू लागते. इस्लामचा अर्थ काढणार्या वेगवेगळ्या विचार शाळा ( थॉट स्कूल्स ) आहेत. असगर आली इंजिनिअर किंवा अब्दुल कादिर मुकादम या विद्वानांचीही  एक शाळा आहे. इस्लामचा पुरोगामी अर्थ काढणारी हि शाळा आहे. अब्दुल कादिर मुकादम यांच्या विचाराविषयी प्रस्तुत लेखात पहायचे आहे. त्यांनी हमीद दलवाई सोबत मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नावर काम केले आहे . त्यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे पुरोगामी संस्कार आहेत आणि या पुरोगामी चष्म्यातून ते इस्लाम कडे पाहतात . त्यांच्याशी प्रत्यक्ष केलेल्या चर्चेतून आणि चंद्रकोरीच्या छायेत या त्यांच्या पुस्तकावरून प्रस्तुत लेख बेतला आहे .



झाकीर नाईकांचे  इस्लामी गणित : 

झाकीर नाईक हे एक टीव्ही प्रसिद्ध मौलवी आहेत. त्यांची सर्व धर्माच्या शास्त्रांवर व्यासंगी पकड आहे . मुळ  धर्म इस्लाम आहे . वेदात , गीतेत , धम्मपदात , त्रीपिठकात आणि बायबलात इस्लामच आहे . त्यात आता भेसळ झाली आहे . कुरान मध्येच एकमेव सत्यधर्म आहे म्हणून कुराणाकडे चला असा त्यांचा आग्रह आहे. भेसळ युक्त धर्माचा त्याग करून सर्वांनी मुसलमान झाले पाहिजे असे ते सांगत असतात. यु ट्यूब वरच्या एका मुलाखतीत झाकीर नाईकांना मुलाखत कर्ता एक प्रश्न विचारतो. तुम्ही जगभर आणि भारतात इस्लामचा प्रचार करता . सर्वांनी मुसलमान व्हावे असे म्हणता . तुम्हाला इतर देशात तुमच्या धर्माचा प्रचार करायचा अधिकार हवा आहे . मग सौदी अरेबियात इतर धर्माना प्रचाराचा अधिकार का नाही ?

झाकीर नाईक उत्तर देतात : कारण २ +२ = ४ हे आम्हाला माहित आहे . खरा आणि एकमेव सत्यधर्म इस्लामच आहे हे आम्हाला माहित आहे . ज्याना स्वत:चा धर्म खरा आहे कि नाही ? २ +२ = ५ कि ६ कि ४ हे माहित नाही . ते  सर्वच उत्तरे खरी आहेत असे मानतात . सर्वच धर्म खरे आहेत असे मानतात. त्यामुळे ते आम्हाला प्रचार करू देतात आणि आम्ही इतराना करू देत नाही . देणार नाही . इतरांच्या सहिष्णुतेचा असा धार्मिक अर्थ मौलवी झाकीर नाईक काढतात.




मुकादामांचे प्रमेय 

लबाड झाकीर नाईक स्वत:चे बीजगणित सिद्ध करण्यासाठी कुराणच्या ज्या आयती सांगत आहेत त्यांचा मुळातला अर्थ सहिष्णू आहे. झाकीर आणि तत्सम मौलवी इस्लामला बदनाम करत आहेत . इस्लाम हा शांततेचा धर्म आहे . स्त्री पुरुष समानता , लोकशाही , सर्व धर्म समभाव , बुद्धिवाद या सार्याचा कुराण पुरस्कार करते . मौलाना आझाद , इकबाल आणि असगर आली इंजिनिअर यांचे दाखले देत अब्दुल कादिर मुकादम आपले प्रमेय सिद्ध करतात . कुराणात बुरख्याची सक्ती नाही . इतरांनी मुसलमान झालेच पाहिजे असा आग्रह कुराणात नाही हे मुकादम कुराणातल्याच आयतींचे वेगळे अर्थ सांगत पटवून देतात . पण मुकादम तिथेच थांबत नाहीत . तर  कुराणातच प्रेषितांनी आपल्या धर्म ग्रंथाच्या मर्यादा स्पष्ट केल्या असून जर कुराणात किवा हदिसामध्ये आधार मिळाला नाही तर बुद्धीचा वापर करण्यास सांगितले आहे . पवित्र कुराणाने दिलेली हि बुद्धिवादाची शिकवण आहे असे मुकादम आग्रहाने सांगतात .

कुराण पुरोगामी आहेच पण भारताचे संविधान सार्वभौम आहे असे एका टीव्हीवरील मुलाखतीत अब्दुल कादिर मुकादमांनी प्रतिपादित केले होते . धर्म ग्रंथ आणि संविधान यात अंतर आले तर संविधानाचा सेक्युलर कायदा पाळायचा आहे असा अर्थ यातून निघतो . मुकादमान्चा हा विचार सर्वार्थाने क्रांतिकारक आहे . कुराणाच्या अध्ययनातून हा पुरोगामी विचार स्फुरला आहे असे मुकादमांचे प्रमेय आहे . या प्रमेयाच्या आधारे झाकीर नाईकांचे इस्लामी गणित खोडून काढता येते असे मुकादम मानतात . आणि त्यासाठी लेखही लिहितात .



मोरेंची भूमिती 

मौलाना मौदुदि हे जमाते इस्लामीचे संस्थापक त्यांच्या वचनांचा आधार घेत प्रा शेषराव मोरे यांनी मुस्लिम मनाचा शोध हा ग्रंथ लिहिला आहे . प्रेषितांचे चरित्र , कुराण , हदीस त्यावर जमाते इस्लामीच्या विचारवंताची भाष्ये याची मोजपट्टी वापरत मोरेंनी आपला ग्रंथ लिहिला . त्यातल्या प्रत्येक वाक्याला यातलेच संदर्भ दिले आहेत. इस्लाम हा एकमेव सत्यधर्म आहे . इतर धर्म भेसळयुक्त आहेत . इतर धर्मियांना मेल्यानंतर जहन्नुम / नरकाची आग आहे . आणि इमानदार मोमिनाना जन्नत . पण इस्लाम केवळ पारलौकिक धर्म नाही ती एक जीवनपद्धती - "दिन" आहे. इस्लामी कायद्याचे राज्य - शरीयतचे राज्य स्थापन करण्यासाठी प्रत्येक मुस्लिमाने (प्रयत्नांची पराकाष्ठा ) जिहाद केला पाहिजे. दार उल हार्ब चे रुपांतर दार उल इस्लाम मध्ये व्हावे म्हणून प्रयत्नशील राहिले पाहिजे. प्रेशित मुहम्मदाचा आदर्ष  ठेवून (मक्का काल - मदिना पूर्वार्ध ) शक्ती कमी असताना इतर  धर्माशी तडजोड करून इस्लामचा प्रचार केला पाहिजे . आणि शक्ती वाढली कि काफिरांशी युद्ध (जिहाद बा सैफ) केले पाहिजे . इस्लामचे एकमेव अद्वितीय आग्रही धर्मरूप मोरे मौदुदिंचे दाखले देत सांगतात. मोरेंच्या पुस्तकाला जमाते इस्लामीच्या विद्वानांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ते लिहितात " मोरेंनी इस्लामचा अर्थ मराठी वाचकाना सांगून फार मोठे काम केले आहे . त्याबद्दल त्याना शाह फैसल पारितोषिक दिले पाहिजे. मोरेंवर अल्ला स्वर्गातून पुष्पवृष्टी करेल"  असे म्हणत जमाते इस्लामीच्या पंडितांनी प्रस्तावनेत शेषराव मोरेंचे कौतुक केले आहे आणि त्याचे निष्कर्ष योग्य ठरवले आहेत . इस्लाम केवळ परमेश्वराची आराधना करत स्व चा / जगाचा शोध घेणारा धर्म नाही . इस्लाम हा एकमेव सत्यधर्म - दिन आहे. राजकीय भूगोल बदलणारा धर्म आहे अशी मोरेंची भूमिती आहे . आणि जे जे मुस्लिम कुराणाच्या आधारे पुरोगामित्व सांगतात ते वस्तुत: मक्का काळातले तडजोडीचे इस्लामी राजकारण करत धर्म रक्षण करत असतात कारण मदीनाकालीन युद्धासाठी त्याना शक्ती वाढवायची असते असा मोरेंच्या भूमितीय सिद्धान्ताचा व्यत्यास आहे.



मुकादमांचा पवित्र लढा 

इस्लामचा टोकाचा अर्थ काढणारे झाकीर नाईक , जमाते इस्लामी एका बाजूला आणि शेषराव मोरे दुसर्या बाजूला . मुकादमांचा  संघर्ष दोघांशी आहे . कुराण अपरिवर्तनीय एकमेव आहे अशी मुकादमांची लेखी भूमिका आहे पण कुराणाचे अर्थ काढणार्या वेगवेगळ्या परंपरा आहेत . त्यातल्या पुरोगामी परंपरांकडे मोरे दुर्लक्ष करतात आणि जमाते इस्लामीचीच री ओढतात असा मुकादमांचा आक्षेप आहे . त्यांचा आक्षेप १००% खरा आहे . मुकादामानी केवळ मोरेंचे खंडन केलेले नाही , जमाते इस्लामी , झाकीर नाईक आणि शहाबुद्दीनच्या भूमिकान्वारही टीका केलेली आहे . इस्लामचा उपयोग करून जर मुस्लिम समाजात पुरोगामित्व आणता येत असेल तर त्याला विरोध का करता ? असा खडा सवाल अब्दुल कादिर मुकादम विचारतात . मराठीतून या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे . मुकादमांचे विचार अकबराशी जुळत नाहीत … हमिदशीही जुळत नाहीत . पण स्वधार्मियांकडून उपेक्षेचि वेदना या तिघाना जोडते . असगर अलींच्या किंवा मुकादमांच्या
तुलनेत  जमाते इस्लामीची मान्यता मुस्लिम समाजात कितीतरी अधिक आहे . आणि जमाते इस्लामीचा मुस्लिम मान्य  इस्लाम मोरे रिपीट करत आहेत. बहुसंख्य मुस्लिम समाज मुकादामांचे  लिखाण मराठीतून असल्याने त्यांच्या पुरोगामी विचारापासून वंचित राहतो आहे. मात्र हा विचार  मराठी वाचाकांपार्यात पोचवण्याचे पवित्र बुद्धिवादी कार्य ते पार पाडत आहेत. शेवटी कुठेतरी सुरवात करावी लागते. अकबर आणि हमीद दलवाइच्या बाबतीत जसा सत्तेच्या आणि कालाच्या सामर्थ्याचा विचार केला तसाच विचार असगर आली इंजिनिअर किंवा अब्दुल कादिर मुकादम यांच्या बाबतीत केला पाहिजे .

 एक सवाल : 

कुठल्याही धर्माच्या अनुयायाला मला एक प्रश्न विचारायला आवडतो . बरोबर काय ? आणी चूक काय ? याचा फैसला आम्ही    कायद्याच्या - संविधानाच्या आणि मुख्यत : विवेक बुद्धीच्या तराजूत करतो. धर्माच्या तराजूत करत नाही. तुम्ही हा फैसला कोणत्या तराजूत करता ? हा प्रश्न झाकीर नाइकना आहे , जमाते इस्लामीला आहे आणि अब्दुल कादर मुकादम यांनाही आहे .

" कुराणातच विवेकबुद्धी  सांगितलि असल्याने मी विवेकवादी आणि बुद्धिवादी आहे " असे उत्तर ते देणार नाहीत याची खात्री आहे!

काही असो शेवटी उपयुक्तता वादाला महत्व आहे. धर्माचा उपयोग करून आणि त्याचेच वेगवेगळे पुरोगामी अर्थ काढून मुस्लिम स्त्रियांच्या तलाकचा , पोटगीचा प्रश्न  सुटला तर कोणाला नको आहे ? पाहुया !

पुन्हा चष्मा : 

जगाकडे पाहण्याचा आपला एक दृष्टीकोन असतोच . तो इतर लोकान्पेक्षा वेगळा असतो . दुसर्याच्या चश्म्याबद्दल आदर बाळगणे . त्याच्या चष्मा घालायच्या हक्काबद्दल आदर बाळगणे हे पुरोगामित्वाचे मुलभुत लक्षण आहे. माझा स्वत:चाही एक चष्मा आहेच . तरी शक्य तितक्या तटस्थपणे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व सहा भाग वेगळा विचार करू पाहणार्या इस्लाम विचारवंतावर आहेत    . हि सर्व माणसे विचारी आणि भल्या हृदयाची आहेत . मुस्लिमांचे हित कोणता चष्मा पाहतो याचा निर्णय वाचकांवर सोपवत आहोत . आणि हित म्हणजे काय ? याचाही निर्णय वाचकांनीच करायचा आहे .


अब्दुल कादिर मुकादम यांची विचारसरणी बुद्धिवादी नाही हे पहिले समजून घ्यावे लागेल . मुस्लिम समाजात सुधारणा करण्यासाठी इस्लामचा वेगळा आधुनिक अर्थ काढावा इतकाच त्यांचा सुधारणावाद मर्यादित आहे. कुराणाचे प्रामाण्य ते नाकारत नाहीत - स्वीकारतात . कुराणात स्त्री स्वातंत्र्य आहे , समता आहे , सहिष्णुता आहे, शांतता आहे ..... लोकशाही , विज्ञान निष्ठा सारे काही आहे ! म्हणून मुस्लिमांनी त्याचे पालन केले पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. 

धर्माचा उपयोग धर्माविरुदची तलवार म्हणून करण्याचा त्यांचा मानस आहे . धर्माचे काही बिघडत नाही . तलवार मात्र बोथट झाली आहे . मुकादम एकटे नाहीत . असगर आली इंजिनिअर इत्यादी मुस्लिम समाज सुधारकांचि देखील हीच भूमिका आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने हमीद दलवाईंच्या बुद्धिवादी विचाराचे दफन करून - असगर अली स्वीकारले आहेत.

हि भूमिका मोडरेट सनातन्यांच्या हिंदु धर्म विषयक भूमिकांशी तंतोतंत जुळते . हिंदु धर्मात मुळात अस्पृश्याता नव्हती , चमत्कार नव्हते - धर्म चांगला - काही ठेकेदार वाइट अशी ती भूमिका आहे.

हिंदु किंवा मुस्लिमात धार्मिक अतिरेकी हे संख्येने फार कमी असतात. हे तथाकथित मोडरेट लोक्स धर्माची ढाल तयार करून अतिरेक्यांचे संरक्षण करतात. धर्म चांगला आचार वाइट हि भूमिका बुद्धिवादी नाही - धार्मिकच आहे. मोडरेट दुष्ट नाहीत .... सज्जन आणि सभ्य आहेत .... त्यांच्या मार्गाने धर्मसुधारणा होईल असा अंधविश्वास त्याना आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखमालेत भारतातील मुस्लिम राजकारणाचा रंजक वेध घेतला आहे. त्यासाठी काही देखणे  चरित्रनायक निवडले  आहेत .
त्यांच्या चशम्यातून ……

१) कुरुंदकरांचा अकबर : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_6.html 
२) 1857 चा (मोरेंचा ) जिहाद : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_8496.html
३) जनतेचा प्यारा अश्फाक : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_1247.html
४) मौलाना अबुल कलामांची आझादी : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post.html
५) हमीदचे मुसलमान : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post_15.html
६) मुकादमांचा इस्लाम : http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post.html
७) डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html


सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *