१७ डिसें, २०१३

कॉन्सपिरसी थिअरि : होऊ दे खर्च !


कॉन्सपिरसी थिअरि : होऊ दे खर्च !


आपल्या आजूबाजूला भयंकर कट आणि कारस्थाने सुरु आहेत . आपल्याला उल्लू बनवले जात आहे .फसवले जात आहे. खरे वास्तव वेगळे आहे . आणि दाखवल जातय काहीतरी भलतच ! हे मिडियात येत नाही कारण मिडिया हाच एका महाभयंकर कटाचा भाग आहे

हि अतिशय लाडकी आणि झटक्यात लोकप्रिय ठरणारी थेअरी आहे . अमेरिकेतल्या टोप टेन कोन्स्पिरसी थेअरी खालच्या व्हिडियो लिंक मध्ये पहायला मिळतील . यात औषध कंपन्या पैसे कमावण्यासाठी आजारांचे विषाणू पसरवतात , लोकांचे मेंदु नष्ट - भ्रमिष्ट करून त्यांच्यावर राज्य करण्यासाठी सरकार पाण्यात फ़्लोराइड मिसळते , इल्युमिनाटि नावाचा धर्मगट जगावर राज्य करण्यासाठी - युद्धे , माइंड कंट्रोल रसायने वगैरे वापरत असतो. 








शिवाय पर्ल हार्बर अमेरिकन सरकारने मुद्दामच घडू दिले - अमेरिकन राश्ट्राध्यक्ष रूझवेल्ट ते रोखू शकला असता पण त्याला युद्धात उतरायचे होते । म्हणुन त्याने गुप्तचर यंत्रणेच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले , ९ -११ ची घटना अमेरिकन सरकारनेच घडवली कारण त्यांना मध्यपूर्वेतल्या तेल साठ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध करायचे होते ! अमेरिकन स्वभावाल अनुसरून सर्व कोन्स्पिरसि थेअरी मांडल्या गेल्या आहेत - सर्वच्या सर्व पैशाशी नायतर पेट्रोल च्या भावाशी संबधित आहेत !!

अशीच एक गाजलेली थेअरी होती चंद्रावर माणुस उतरलाच नाही । आणि सामन्य माणसाला पटतील असे त्याचे खोटेच व्हिडिओ नासा ने तयार केले आहेत .त्याबाजुचे आणि विरुद्ध असे हजारो व्हिडियो आणि लेख इंटर्नेट वर प्रसिद्ध आहेत .

भारतातही अशा अनेक कोन्स्पिरसि थेअरी आहेत . 


१ ) नेहरू मुसलमान होता , इंदिरेचा नवरा फिरोझ मुसलमान होता , आणि राजीव आणि त्याच्या मुलांचा ख्रिस्ती बात्मिस्मा सोनियाने घडवला .

२) नथूरामने दंगल घडवण्यासाठी गांधिजिंना मारण्या आगोदर स्वत:ची सुंता केली होती .

३) मक्केत शिवलिंग आहे . ते चादरीखाली लपवले आहे .


हिंदु स्वभावानुसार या सार्या कोन्स्पिरसी थेअरी मुसलमानांशि निगडित आहेत . मुसलमान एडस पसरवतात (गर्दीत सुया टोचून) म्हणुन कर्नाटकात उडपी जिल्ह्यात एक दंगलहि झालेली आहे .


बाम्सेफी मंडळिंनि त्यांच्या स्वभावानुसार काही कोन्स्पिरसि थेअरी स्वीकारल्या आहेत … यात प्रामुख्याने शेटजी - भटजिंचे एक गुप्त मंडळ सतत भारताचा इतिहास , भूगोल , नागरिकशास्त्र इत्यादी बदलत असते . आंबेडकरांचा मतदार संघ पाकिस्तानात जावा म्हणुन गांधीने फाळणी केली. अशा प्रकारच्या थेअरी प्रसूत केल्या आहेत .


या कटकारस्थानाच्या थेअर्यांवर अनेकांचा मनापासून विश्वासही असतो .
आणि हे जगात सर्वत्र चालते .




त्याची कारणे :


१) आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहून निष्कर्ष काढणे हि माणसाच्या मेंदूची पद्धत आहे .

२) पण त्याच वेळी काही महत्वाच्या गोष्टींकडे अधिक लक्ष देणे आपण उत्क्रांतीत शिकलो आहोत . आपल्या आजू बाजूला रेडिओचा आवाज चालू आहे , कावळा ओरडतो आहे , कुत्रा भुंकतो आहे … पण रस्ता क्रोस करताना आपल्याला फक्त ट्रकचा हॉर्नच ऐकू येतो । . बाकी काही नाही .। बिन महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे वरदान मानवी उत्क्रांतीत आपण निसर्गाकडून शिकलो आहोत . जगण्यासाठी ते आवश्यकही आहे .

३) महत्वाचे काय ? आणि बिन महत्वाचे काय ? हे आपण - संस्कार , वाचन , नातेवाइक - मित्र यांकडून मिळणारी माहिती यावरून ठरवतो.

४) मग महत्वाच्या तेव्हढ्याच गोष्टी लक्षात ठेवतो (तथाकथित बिन महत्वाच्या विसरून जातो ).

५) मग आपल्या संस्कारानुसार महत्वाच्या वाटणार्या गोष्टींची एक तर्क संगति आपला मेंदु आपोआप लावतो - आणि त्यातून आपला स्वभाव म्हणा किंवा अनेकांचे सारखे स्वभाव एकत्र येउन जन्माला येणार्या विचारधारा (इझम ) म्हणा - जन्माला येतात आणि वाढतात .

६) पण आपण अनेक तथाकथित बिन महत्वाच्या गोष्टी विसरून गेलेलो असतो . त्यामुळे आपल्या स्वभावाला किंवा विचारधारेला (इझम) ला न मानवणार्या गोष्टी आपल्याला दिसतच असतात .

उदाहरणार्थ अमेरिका हा महाचोर भांडव्लदरांचा देश आहे हे लाडके डावे गृहीतक आहे . मग रशिया सारख्या महान देशा आधी ते कसे काय चंद्रावर पोचतील ? पण त्यांचे चंद्रावर्चे फ़ोटो तर दिसतायत खरे !

७) यावेळी आली हुक्की मारली बुक्की च्या आवेशात एखाद्या कोन्स्पिरसि थेअरी चा जन्म होतो . नासा ने खोटेच व्हिडियो बनवले ! - नवे सत्य स्विकारण्यापेक्षा - कोन्स्पिरसि थेअरी वर विश्वास ठेवणे मानवी मेंदुला अधिक सोपे असते .

८) हे पूर्णत: नैसर्गिक आहे … प्राणि नुसतेच आकलन करत बसला तर मारूनच जाइल त्याला काही निश्कर्ष काढावेच लागतात आणि त्यावर विश्वास ठेवून निर्णय करावे लागतात . 

या उत्क्रांतीच्या देणगितच या थिअर्यांचे मर्म आहे .







१६ डिसें, २०१३

जमाते इस्लामीचा भाईचारा

 जमाते इस्लामीचा भाईचारा 


जमाते इस्लामी हिंद ने - अब्दुल कादिर मौला यांच्या फाशीचा निषेध केलेला आहे. अब्दुल कादिर मौला हे बांग्लादेश जमाते इस्लामीचे नेते . त्यांच्यावर खून , आणि स्त्रिया आणि मुले यांसकट सामुहिक कत्तलिंचे आरोप सिद्ध झालेले आहेत . मिरपुरचा खाटिक या नावाने ते कुप्रसिद्ध होते . त्यावर सिद्ध झालेले आरोप १) एका कवीचा स्वहस्ते शिरछेद . २) ११ वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार . ३) ३४४ जणांच्या गोळ्या घालून केलेल्या सामुहिक हत्याकांडात सहभाग .  .भारतातली जमाते इस्लामी या बांगलादेशी मौलानाच्या समर्थनार्थ उतरली आहे .





बांग्लादेशात ... तसे खून करणे योग्यच आहे म्हणत  समर्थकांनी  फाशीचा निषेध म्हणुन अल्पसंख्य हिंदुंचि घरे पेटवली आहेत .  गंम्मत म्हणजे भारतातल्या जमाते इस्लामी ने सुद्धा त्यांच्या फाशीचा निषेध केला आहे . त्यांना शहीद म्हटले आहे. आणि "" देश "" एकत्र ठेवण्यासाठी अब्दुल कादिरचे कृत्य योग्यच होते अशीही पुस्ती जोडली आहे . हा देश म्हणजे कोणता देश ? एकत्र म्हणजे काय ? आणि जमाते इस्लामीचा भाईचारा म्हणजे काय ?  हे सविस्तरपणे माहित करून घेणे आवश्यक ठरले आहे .



http://jamaateislamihind.org/eng/jih-chief-strongly-condemns-execution-of-bangladesh-jamat-islami-leader/



जमात चा इतिहास 


मौलाना मौदुदि  हे जमाते इस्लामी चे जन्मदाते . मौदुदि चा  जन्म महाराष्ट्रातला . १९४१ साली त्यांनी जमाते इस्लामीची स्थापना केली . जमाते इस्लामीचा मुस्लिम लीग ला विरोध होता . मुस्लिम बहुल पाकिस्तान बनवण्यात जमाते इस्लामीला स्वारस्य नव्हते. त्यांना अखंड भारतात कुराण , हदीस आणि शरिया कायद्यानुसार चालणारी इस्लामी धर्माची राजवट आणायची होति. मौदुदिंच्या दुर्दैवाने देशाची फाळणी झाली . अखंड भारतात अल्ल्लहचा दिन (इस्लाम ) नुसार चालणारी राजवट आणण्याचे स्वप्न भंगले.   मग मौदुदि त्यातल्या त्यात इस्लामी असलेल्या पाकिस्तानात गेले .





पाकिस्तानात दाखल होताच त्यांनी अहमदिया विरुद्ध प्रचार सुरु केला . अहमदिया हा मुस्लीमातला एक अल्प्संख्य गट आहे . त्यांवर मैत्रेय बुद्ध , क्रुश्णादि अवतार यांचा प्रभाव आहे.  नव्या युगात जिहाद बा सैफ (तलवारीचा रक्तरंजित  जिहाद ) लागू पडत नाही असे अह्मदियांचे धार्मिक मत आहे . मौलाना मौदुदिंनि  अहमदिया हे मुस्लिम नसून  " काफर"  आहेत असा विचार मांडला .  विशुद्ध इस्लामी राजसत्ता स्थापना करण्यासाठीच मौदुदि पाकिस्तानात गेले होते . अहमदिया मुस्लिमांविरुद्ध प्रचार हे त्याकडेच टाकलेले एक पाउल होते. . त्याची परिणती १९५३ सालच्या अहमदिया विरोधी दंगलीत झाली . कत्लेआम घडले -  आणि पाकीतानात त्या ठिकाणी मार्शल लो पुकारला गेला .  आजही त्यांची जमाते इस्लामी हि संघटना पाकिस्तानातील प्रमुख राजकीय मूलतत्व वादि पक्ष आहे.


तर फाळणी झाल्यावर जमाते इस्लामीचे जन्मदाते पाकिस्तानात गेले आणि तिथल्या अहमदिया मुस्लिम सारख्या काफ़िरांचा पाडाव करू लागले . फाळणी झाल्याने भारतात उरलेल्या जमातचे  काय होणार ? देशाचे दोन तुकडे झाल्याने जमाते इस्लामी चे दोन तुकडे होणे अपरिहार्य होते.    पण प्रत्यक्षात  जमाते इस्लामीचे तीन तुकडे झाले - एक जमाते इस्लामी हिंद ,दुसरा जमाते इस्लामी  पाकिस्तान आणि तिसरा म्हणजे काश्मीर .  काश्मीर मधलि जमाते इस्लामी ही भारत विरोधी संघटना आहे .  

अशाप्रकारे वेगवेगळ्या भू राजकीय परिस्थितीशी जमात ने जुळवून घेतले ! आणि मुळात एकाच असणारी संघटना तीन वेगवेगळ्या नावांनी काम करू लागली … लवकरच या संघटनेला आणखी एक चौथी उपशाखा काढावी लागणार होती.


बांग्लादेश युद्ध 


इंदिरा गांधिंनि पाकिस्तानशी युद्ध करून त्याचे दोन तुकडे केले . लाखभर पाकि सैन्य डोक्यावर हात ठेवून शरण आले .  याच पाकि सैन्या बरोबर अब्दुल कादिर मौला काम करीत होता .  हे पाकि सैन्य जे अनन्वित अत्याचार स्थानिक बांगलादेशी वर करत होते त्यात अब्दुल कादिर सामील होता .  या युद्धाच्या दरम्यान हजारो  हिंदु, मुस्लिम विचारवंतांचि  कत्तल करण्यात आली . यात डोक्टर , संगितकार , विचारवंत , कवी , तत्वज्ञ यांचा समावेश होता . पाकि सैन्याकडून हि कत्तल झाली त्यात जमाते इस्लामीचे लोक सामील होते . त्यांनि मुख्यत: माहिती पुरवण्याचे काम केले .  कादिर मौला वर एका कवीचे मुंडके स्वहस्ते उडवल्याचा आरोप   सिद्ध झाला आहे. ह्या कत्तल झालेल्या विचारवंतांचे स्मारक आजही बांग्लादेशची राजधानी ढाका येथे आहे .





हे विचारवंत स्वतंत्र बांग्लादेश मागत होते हा त्यांचा गुन्हा होता . कादिर मौला ला पाकिस्तान नावाचा देश एक ठेवायचा होता . त्याचे हे ""देश "" एकत्र ठेवण्याचे प्रयत्न भारतातल्या जमाते ते इस्लामीने वाखाणले आहेत .

मुळात हे बांगलादेशी विचारवंत पाकिस्तान पासून फुटून वेगळा देश का मागत होते ? हेच मुळी  जमाते इस्लामिला समजलेले नव्हते . आजही समजलेले  नाही.  १९७१ पूर्वीच्या अखंड पाकिस्तानात (पाक + बांग्लादेश ) बंगाली भाषिक संख्येने बहुसंख्य होते .  पण देशाची अधिकृत भाषा उर्दू होती . मुठभर पंजाबी मुस्लिमांची दादागिरी सर्वत्र चालू होती . बंगाली अस्मिता इस्लामी भाइचार्याहुन अधिक टोकदार बनली आणि बांग्लादेशाचा जन्म झाला . धर्माच्या आधारावरची राष्ट्रे ठिसुळ तर असतातच पण प्रतिगामी विचारधारा फक्त खड्ड्यात च घेऊन जात असते .


जमाते इस्लामी हिंद 


तर जमाते इस्लामी हिंद या जमाते इस्लामीच्या भारतीय तुकड्याने आपला भाईचारा प्रकट केला आहे . हा भाईचारा बांगलादेशी मुस्लिमांसाठी नाही . बांग्लादेश चा गद्दार जमाती नेता कादिर मौला यासाठी आहे . त्याने पाकिस्तान एक ठेवण्यासाठी केलेले प्रयत्नहि  वाखाणले आहेत . हि सर्व कृत्ये जमातच्या इतिहासाशी सुसंगत अशीच आहेत . अहमदिया असो कि बंगाली भाषिक ,लहान - लहान मायनोरिटि चिरडत पेन इस्लामचे स्वप्न पहाणे हा जमात ए इस्लामीचा मुळ स्वभाव आणि धोरण आहे .  जमाते इस्लामीचा अभ्यास करताना - त्यांच्या परिभाषा समजून घ्याव्या लागतील . अल्प्संख्य , अन्याय , न्याय , देश , जिनोसाइड या बाबतच्या त्यांच्या इस्लामी संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे . आणि कोणत्या परिप्रेक्षातुन त्या बदलतात हे हि लक्षात ठेवले पाहिजे .

८ डिसें, २०१३

धर्म आणि धम्म या संपुर्ण वेगळ्या गोष्टी आहेत

इस्पश्ट बोलू का ? बोलतोच आता … बुद्ध हा एक चांगला धर्म वाटतो मला … 

इस्लाम , ख्रिस्चन , वैदिक किवा इतर कुठल्याही धर्मापेक्ष बुद्ध बरा . हिंदु धर्म नावाची काही चीज अस्तित्वात नाही . हिदु हा लोकसमुह आहे आणि त्याचे अनेक धर्म आहेत. आणि पारंपारिक बुद्ध हा वैदिकांचेच एक्स्टेनशन आहे असे सोनावणि सरांचे म्हणणे आहे . बाकी बाबासाहेबांचे नवयान - भिमयान जवळ जवळ निधर्मी आधुनिक माणसाचे बायबल वाटले . त्यात धर्म गिरी काही नाही . (भाईगिरी च्या चालीवरची ! )

पण जर धर्मगिरी संपवायचीच असेल तर … धर्मांतर हा शब्द का ? धर्म आणि धम्म या संपुर्ण वेगळ्या गोष्टी आहेत असे बाबासाहेब स्पष्ट म्हणतात . एक तर धम्म स्वीकार म्हणावे - किंवा धर्म नकार म्हणावे . धर्मांतर हा शब्द चुक आहे .

धरमगिरी नाकारण्यासाठी जरा वेगळ एप्रोच पाहिजे .

धर्मगिरी (भाईगिरी ) म्हणजे राजकारणात धर्म आणणे . उपरे सर यांचा हेतू राजकारण आहे ? धर्मगिरी आहे ? समाजकारण आहे ? कि अध्यात्मिक ?

हनुमंत उपरे सर विपश्यनेच्या मार्गाने बौद्ध झालेले नाहीत. त्यांचे हेतू अध्यात्मिक नाहीत हे स्पष्ट आहे. त्यांच्या धर्मांतराच्या हेतुमागे राजकारण नाही …. असे सप्रमाण सिद्ध करावे लागेल . त्यासाठी त्यांच्या धम्म स्वीकाराचा हेतूही स्पष्ट करावा लागेल . तसे झाले तर Sanjay Sonawani सर त्यांना पाठिंबा देतील असे वाटते . आपला माझा अंदाज .

बाबासाहेबांनी मी भारत बुद्धमय करेन अशी सिंह गर्जना केली होती . त्या काळी भारताचे समाजकारण बदलून टाकण्यासाठी त्यांना ते अत्यावाश्यक वाटले होते. आता काळ भरपूर बदललेला आहे … अणि यापुढे त्याहून झपाट्याने बदलणार आहे . धर्म आणि धर्मांतराचे संदर्भ बदलत चालले आहेत . . आज भारतात फार मोठ्या प्रमाणावर बुद्ध धम्माचा प्रचार चालू आहे . विपश्यनेच्या मार्गातून हे काम चालू आहे . माझ्या अंदाजाप्रमाणे हे फार मोठे अभियान चालू आहे . आणि त्याची फळे काही वर्शातच दिसतील . फकस्त वैचारिक हाणामारीचा
रोमांन्स त्यात मिळणार नाही . तो बुद्धाचा मार्गही नव्हे . आणि विपश्यनेचे विरोधक कोण आहेत हेही माहित करून घेतले पाहिजेच .

आजचे धार्मिक सनातनी - विज्ञान विद्यार्थ्यांच्या खुनाला दात विचकून हसत हिडिस समर्थन करतात … तेंव्हा हि धर्म भाईगिरी नाकारणे हि एक स्वाभाविक प्रतिक्रिया बनते .

पण धरमगिरी नाकारण्यासाठी दुसरी धरमगिरी उभी करायची का बाबासाहेबांनी सांगितलेला धम्म आजमवायचा . त्याहून महत्वाचे म्हणजे आपल्या सेक्युलर संविधानाला आजचा धर्म ग्रंथ का मानु नये ?

भारत बुद्धमय करायचा हेच अंतिम ध्येय ठेवून आपण चालू . हे मुस्लिमांना आणि ख्रिस्चनांना आधी विश्वासात घेऊन का सांगितले जात नाही ? कि बहुजन हिंदु समाज बुद्ध झाला कि मुस्लिम ,ख्रिस्चन आणि नास्तिक धर्महिनांना सरप्राइज द्यायचे आहे ? कि भारतात इतर धर्म अस्तित्वातच नाहीत ? भारत हे काय हिंदुराश्ट्रा आहे ? आणि त्याचे बुद्ध राष्ट्र बनवायचे आहे ?

आपला देश सेक्युलर राहिला पाहिजे आणि ते धर्मराष्ट्र बनता कामा नये . मग तो धर्म कोणताही असो . धरमगिरी चालणार नाही . आपल्या देशाचे संविधान हीच आपली स्मृती आहे , कुराण आहे , बायबल आहे . आणि ते तसेच राहिले पाहिजे .

असो मला या वितंडवादात पडायची इच्छा नाही . धर्म म्हण्जे काय ? त्याची व्याख्या काय ? धर्माचे इंटर्प्रिटेशन कसे करावे ? यापेक्षा अनेक महत्वाची कामे अजून बाकी आहेत .

पण एक मात्र नक्की नास्तिक अभिरामला देव मान्य नाहित. धर्म हि नाही . (कम्युनिझम हा पण एक धर्मच आहे ). माझा देश हा माझ्यासाठी देव आहे . आणि भारताचे संविधान हा धर्म ग्रंथ .

परंपरेच्या जोखडातून मुक्ती मिळाली पाहिजे . आणि बौद्ध होऊन जर ती मिळणार असेल तर ते समर्थनीय ठरते . मात्र तो धम्मस्वीकार आहे का ?

७ डिसें, २०१३

चैत्यभूमी - शिवाजी पार्क . बाबासाहेबांना वंदन करायला

आज दादरला गेलो होतो . रमलो तिथे .

 चैत्यभूमी - शिवाजी पार्क . ६ डिसेंबर  

 बाबासाहेबांना वंदन करायला जनसागर लोटला होता . लाखोंचा . फ़ोटो विकले जात होतेच पण त्याहून महत्वाच म्हणजे शाहिरी जलसे करणार्या पाच दहा उत्साह मुर्तिंचे अनेक ग्रुप प्रबोधन जलसा - पथनाट्य करत हिंडत होते . यात बहुसंख्येने नवबौद्ध आणि मराठि असले तरी तामिलनाड , मध्य प्रदेश , गुजराथ आणि ऊत्तर प्रदेशातूनही सर्व जातीचे  लोक आले होते . पाहून बर वाटल . बाबासाहेबांचे व्यक्तित्व  आणि लहान  प्रमाणात का होईना पण  त्यांचा विचार भारतभर पसरतोय हे चित्र आशादायी आहे . भरपूर भटकलो . फेसबुकवरचे अनेक दोस्त प्रत्यक्षात भेटले … थोडेथोडके नाही … कमीत कमी साठ - सत्तर लोकांनी अभिराम म्हणुन हाक मारून बोलावलं . मी पण पाच पन्नास लोकाना हाक घातली . युवकांची पथनाट्य आणि गाणी ऐकली , सोबत आमचे बडे भाय मोहिते सर होतेच .

मी प्रत्यक्ष चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मृतीचे दर्शन घेऊ शकलो नाही. खच्चाखच जाम लाइन प्लाझा च्या पुढे होती म्हणे … युवराज सरांचा शिवसैनिक दोस्त आतपर्यंत व्ही आयपी गाडी ऑफर करत होता … पण स्मृतीशिल्पे पहाण्यात रस नव्हताच मला . तिथे तर लई वेळा गेलोय . पुन्हा जायला हा काही मुहूर्त नव्हता . आलेल्या जनासागाराच दर्शन अधिक महत्वाचे वाटत . 

व्ही आयपी गाडीतून दर्शनाला काही गेलो नाही . 

शाहिरी जलसे , गाणी , आलेली माणस पहात आणि त्यांचे संवाद ऐकत गर्दीतच रेंगाळत बसलो .बाबासाहेबांचे खरे दर्शन किंवा खरी भेट … खरी गळा भेट या गर्दीत असते . 




वैभव आमचा  जिगरी दोस्त मात्र गावला नाही कारण त्याची तब्येत बरी नव्हती . पण सिद्धार्थ भेटला - दाभोळकरांवर मस्त पथनाट्य बसवलं होत त्यांनी . एका चुणचुणीत पोरानि तर धमाल उडवून दिली . त्या आंबेडकरी गर्दीत अनेक ठिकाणी दाभोळकर - त्यांचे फ़ोटो दिसले … पण दाभोळकरांचे विरोधकही दिसले . सिद्धार्थ मोकळेच्या पथनाट्यावर टिका करायला     बामसेफी  आले होते . भट दाभोळकरांचे  नाव आंबेडकरांबरोबर घेणे हा त्यांना बाबासाहेबांचा अपमान वाटत असावा ! सिद्धार्थ ने सडेतोड समारोप केला ………… बाबासाहेब आंबेडकरांनि जातिअंताचा विचार दिला , विज्ञान निष्ठेचा विचार दिला …. या मार्गावर जे असतील ते आमचे आहेत .

महाराष्ट्रात घडलेल्या जातीय अत्याचारांचे -  एत्रोसिटिचे प्रदर्शन हि लावले गेले होते . आमचे  मित्र सुनील गजाकोशानी पोस्टर डिझाईन बनवले होते. पांढर्या पोस्टरवर काळी अक्षरे . बस्स … चाळिस  सनातनी खुनांचा आणि सरंजामी बलात्कारांचा पोस्टरवर उल्लेख होता . त्यात खैरलांजी असेल … वाल्मिकी समाजाच्या तीन तरुणांची केलेली हत्या असेल . 

का ? का? का? 

तर हुच्च वर्णिय मराठ्याच्या पोरीशी लग्न केले म्हणुन …कार्यकर्ते सगळीकडे भेट देऊन आलेले . आयटीत काम करणारे उच्च शिक्षित . त्यांच्या स्मार्ट फोन मध्ये घडलेल्या घटनांचे फ़ोटो होते. वर्तमान पत्रातील कात्रणे होती . 

मी विचारले " पोस्टर पांढर्या वर काळे का ? फोटो का नाही टाकले ?

उत्तर मिळाले…. त्या कार्यकर्त्यांनी दिलेले उत्तर होते …. .
भावना भडकावून काही होणार नाही . हे फ़ोटो प्रदर्शनात टाकायच्या लायकीचे नाहीत . आम्ही अत्याचारांचे फ़ोटो टाकणार नाही । पण त्याबाद्दल जागृती करूच करू … आम्हाला समाजाचा फ़ोटो बदलायचा आहे…आणि तेव्हा । त्यावेळी … तिथेच । मला बुद्ध दिसला .






शिवाजी पार्क ची स्थानिक हुच्चभ्रू जनता बहुतेक १ २ ते ३ … ३ ते ६ … ६ ते ९ चे पिक्चर बघायला गायब झाली होती . घरे आणि उरलेली रिकामी माणसे …हिंदु कोलनी  जराशी उजाड वाटत होती . शिवशक्ती - भीमशक्तीची  टेबली राजकीय घोषणा करणारे नेतागण फिरकले हि नाहीत

काही शिव सैनिक पण बाबा साहेबांचे पोस्टर आणि विचार बोलत होते .  कवीमित्र  तांबे डोक्क्टर , उकळता गणेश चव्हाण , गायकवाड , धमाल कांबळे आणि… ज्यांची मते पटत नाहीत अजाबात पण… माणुस म्हणुन दिलदार असलेले जमाते इस्लामीचे भाइजान … आमचे जुने दोस्त नौशाद उस्मान सुद्धा भेटले . ते त्यांना उपयुक्त ठरतील ती पुस्तके खरेदी करायला आले होते . गळाभेट घेतली. बाबासाहेब मेल्यानंतरहि अनेकांची गळाभेट मिठी घडवून आणतात .

 महामानवास अभिवादन श्रद्धांजली पुण्यस्मरण वगैरे म्हणणार नाही .
 कारण भीमराव माझ्यासाठी सुपर मेन नाही . रियल मेन आहे . 

बाबासाहेबांना गळाभेट . जय भीम !


.
अभिराम दीक्षित

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *