२८ डिसें, २०१२

गुंठा मंत्र्यास पत्र लिहिणेस कारण की,




गुंठा मंत्र्यास पत्र लिहिणेस कारण की,






राजश्रिया विराजित, अखंडित लक्ष्मी अलंकृत, सकल राजकार्य धुरंधर, प्रौढ़ प्रतापवंत, समरधुरंधर, सकल गुणऐश्वर्यसंपन्न, मोक्षश्रियाविराजित अर्थशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष ,सकल विद्यालंकृत, न्यायशास्त्रसंपन्न, राष्ट्रवादी विश्वासनिधि श्री श्री श्री भाउ यांस,

साष्टांग दंडवत,


पत्र लिहिणेस कारण की,

गेले काही दिवस आपली सुहास्य राष्ट्रवादी वदन भित्तिचित्रे पुण्यनगरीच्या कानाकोपर्‍यात झळकत आहेत. परंतु चित्रे पाहून आंम्हास भित्ती न वाटता अंमळ आनंद जाहला. पुण्यपत्तनास योग्य कारभारी मिळणार, मिळेल, मिळाला पाहिजे अशी चर्चा कैक दिवसांपासोन तारिके अहकामे सकाळगिरी मध्ये चालू होती. त्यामुळे पुण्यनगरीतील प्रत्येक चावडीवर आणी कित्येक ब्राह्मणभोजनातून कारभारी बदलाची गप्पाष्टके आणी खलबते चालू होती. आपल्या प्रकटनाने पुण्यनगरीची अवस्था अजि म्या ब्रह्म पाहिले ऐसी जाहली. पेशवाईचा सुवर्णकाळ पुन्हा येणार येणार ऐशी जोरदार चर्चा सुरू जाहली.


दुसर्‍या रावबाजीचा काळ ! काय तो वर्णावा ! मनगट बुडेल इतका भात पंगतीत वाढला जात असे. सकाळ सायंकाळ सोमरसाची आचमने चालत असत. नायकिणी, नाटकशाळा यांना उदार राजाश्रय असे. दक्षिणा गोळा करण्यासाठी दूर - दूर वरून ब्रह्मवृंद गोळा होत असे. टोपीकर आला आणी धर्म बुडाला. दक्षिणा मागावी तर लालतोंड्या टोपीकर म्हणतो कसा ? - फक्त विद्वान ब्रह्मणास दक्षिणा मिळेल. आता ब्राह्मण हा जन्मजात विद्वान अस्तोच ! हे त्या विलायती टोपीकरास कसे कळावे ? ब्राह्मणभोजने बंद झाली. पुण्यनगरीचा सत्यानाश झालान.





पुढे टोपीकर बुडाला. स्वकीयांचे राज्य आले. पुण्यपत्तन आनंदले. याव्वचंद्रदिवाकरौ नेहरूबाबाचे राज्य चालो ऐश्या गर्जना पेठा पेठातून घुमू लागल्या. पण चांडाळ नेहरू बिल्कूलच जातीला जागेना. स्वकीयांस ऐतखाउ म्हणू लागला. ब्राह्मणभोजनांस फुकट्चे देणार नाही म्हणून धिक्कारू लागला. त्यानंतर पुण्यनगरीची कळाच गेली. कोणी वाढपी झाला. कोणी कारकून झाला. कोणी दूरदेशी कळा बडवू लागला.

आज आपले ऐश्वर्य पाहिले; अन चौका चौकात उभे राहून ताम्बूलभक्षण करणारे पुण्यनगरीचे नवे राष्ट्रवादी कार्यकर्ते आनंदले. आपला राजबिंडा थाट आपल्या उमद्या स्वभावाची साक्ष देतो आहे. आपणास मोक्षश्रियाविराजित अर्थशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष ऐसे म्हटले ते त्यामुळेच. पुण्यनगरीची सांस्क्रुतिक संम्मेलने काव्य - शास्त्र - विनोद, सध्या पान टपरी या राष्ट्रवादी संगमस्थानी भरतात. भाउ आज तेथे आपल्या उदार आश्रयाला जाण्याची भावना सध्या रंगते आहे. रिकामटेकड्या कार्यकर्त्यांस आपुल्याकडे सढळ हाताने राष्ट्रवादी दक्षिणा मिळते ऐसी वदंता आहे.






पुण्यपत्तनाच्या आसपास धाकले राजे दादा साहेब ( जे की मंत्री महाराष्टर राज्य); यांनी सोन्याचा नांगर फिरवला. जमिनीचे भाव वाढले. त्यास आज गुंठा मंत्री नामक गोमटी फळे आली आहेत. ह्या मंत्रीगणांनी सैन्य जमविण्यासाठी पुनश्च ढाबाभोजनांस सुरवात केली आहे. आता ऐतखाउंचे काही चालत नाही. चौका चौकात सांस्क्रुतिक संगमस्थानी जमून काव्य - शास्त्र - विनोद करणार्या सकल विद्यालंकृत कार्यकर्त्यांसाठी ढाबाभोजने राखिव आहेत. येथेच सकाळ सायंकाळ विलायती सोमरसाची आचमने चालतात. आणी जुन्या पेशवाईच्या आठवणींनी आमुचे डोळे पाणावतात.

सोमरसाच्या कैफात काही प्रौढ़ प्रतापवंत, समरधुरंधर कार्यकर्त्यांकडून तुरळक घटना घडतात, पण आपल्यासारख्यांचे न्यायशास्त्रसंपन्न आशिर्वाद असताना कुणाची भिती ?
आपणास पुण्यनगरीच्या नूतन जाणत्या राजाचे आशिर्वाद अवश्य मिळोत; दादामहाराजांची क्रुपा आपल्यावर अखंड राहो; पेशवाईचे दिवस पुन्हा येवोत ही विघ्नकर्त्या गणेशचरणी प्रार्थना.
आपला क्रुपाभिलाशी,


वैद्यबुवा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *